आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीमधील सुस्ती! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कुस्ती’ महाराष्ट्राची शान आहे. या कुस्तीचा मानाचा मापदंड म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’. हा किताब मिळाला की कुस्तीगिरांना खऱ्या अर्थाने पूर्णत्व येते. मात्र यापलीकडे जाऊन आपले क्षेत्र, क्षितिज मोठे करण्याची वेळ आली आहे. मातीच्या आखाड्यातील कुस्तीची झिंग आगळीच असली तरीही आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या मॅटवरील कुस्तीलाही पर्याय उरला नाही. मातीच्या आखाड्यात सराव करून मॅटवरही आपले कौशल्य वादातीत सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्राच्या अनेक मल्लांपैकी विजय चौधरी हाही एक. दादू चौगुले, गणपत खेडकर, लक्ष्मण वढार, चंद्रहार पाटील, नरसिंग यादव (तीन वेळा महाराष्ट्र केसरी) या दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या मल्लांच्या पंक्तीत विजय चौधरीही जाऊन बसला. माजी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, रोहित पटेल यांचा पठ्ठा विजयने काका पवार यांच्या विक्रांत जाधवला नागपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीतपट केले. या स्पर्धेत काही वेळा नियोजनातील गोंधळामुळे खेळाचा बेरंग होतो की काय, अशी स्थितीही निर्माण झाली होती. मातीतली कुस्ती हा बाज असलेल्या महाराष्ट्र केसरी पदासाठीच्या कुस्तीचा अंतिम सामना मात्र आता रंगतो मॅटवर. मातीत आणि मॅटवर दोन्हीकडे सराव करून वर्चस्व राखण्याची परंपरा आता महाराष्ट्रात सुरू झाली, हे चांगले आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्यांपैकी नरसिंग यादवचा अपवाद वगळता इतरांनी ऑलिम्पिकच्या प्रांतात आपला ठसा का उमटवला नाही? मात्र सुदैवाने आज मतप्रवाह बदलताना दिसत आहे. राहुल आवारे, त्यांचा भाऊ गोकुळ आवारे, उत्कर्ष काळे, विजय चौधरी, किरण भगत, महेश मोहोळ, खानेकर यांच्या गुरूंनाही मॅटवरील कुस्तीचे महत्त्व पटले आहे. महाराष्ट्र केसरी पदापलीकडचे ‘व्हिजन’ त्यांनीही दाखवले आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, मॅटवरील कुस्ती यापुढे अनिवार्य आहे. मात्र ही सारी मंडळी मॅटवर खेळताना आपल्या मातीच्या आखाड्यांनाही विसरली नाहीत, हे वैशिष्ट्य. सध्या कुस्तीला, मातीतून मॅटवर येण्याचे आव्हान होते, त्यापेक्षाही मोठे आव्हान आता उत्तेजकांनी दिले आहे. महाराष्ट्र केसरीचा फेटा बांधला की बऱ्याच मल्लांना जत्रेतल्या, राजकीय पुढाऱ्यांच्या नावाने होणाऱ्या फडांचे आमंत्रण मिळते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रसिद्धीचे वलय आहे. या वलयाच्या आधारेच पैलवान पुढे स्वत:ला ठेकेदारीच्या कुस्त्यांच्या घाण्याला जुंपून घेतो. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रीय स्पर्धा त्याला भुलवू शकत नाहीत. वर्षाचे ३६५ दिवस चालणाऱ्या कुस्तीफडाचे आकर्षण त्याच्यासाठी मोठे असते. प्रत्येक कुस्ती मारली की लाख-सव्वा लाख बिदागी मिळवण्याच्या मोहाच्या दलदलीत तो फसत जातो. दिन-प्रतिदिन कुस्त्या खेळल्यामुळे त्याची ताकद कमी होत असते. ती झीज भरण्यासाठी त्याच्याकडे शरीराला विश्रांती देण्याची उसंत नसते. आहार, खुराक घेण्यासाठी अवधी नसतो. अशा वेळी त्याला ताकद, जोश ताबडतोब मिळवून देणारी उत्तेजके जवळची वाटायला लागतात. तो पुरता त्यांच्या विळख्यात सापडतो. कारण कुस्त्या मारण्यासाठी तात्पुरती हवी असलेली, जोम, शक्ती, ताकद ही उत्तेजके देतात. त्यांची सवय त्याला जडते. मोठ्या स्पर्धेत उत्तेजक चाचण्यांमध्ये पकडले जाण्याचा धोकाही स्पष्ट दिसत असल्याचे त्याची धाव तेथेच खंुटते. हे दुष्टचक्र अद्यापही सुरू आहे. उत्तेजकांचा प्रभाव किंवा उत्तेजकांचे सावट महाराष्ट्राच्या कुस्तीवर सध्या एवढे प्रचंड आहे की कुस्ती संघटना आणि सरकारला एकत्र येऊन त्यांना या अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

उत्तेजकांचे एकवेळ राहू द्या, आज कुस्ती संघटना खेळाच्या संवर्धनासाठी गावागावात जातात का, हादेखील संशोधनाचा विषय आहे. खेळाच्या प्रसारासाठी आधुनिक आव्हानांचा विचार करून प्रयत्न होत नाहीत. आज गावाकडे तालीम, आखाडे फारसे उरले नाहीत. मल्लांसाठी लागणारा खुराक, आहार महाग झाला आहे. महागड्या खेळाडूंना पोसणारी राजघराणीही राहिली नाहीत. शाळांमध्ये कुस्ती खेळाकडे येण्यासाठीचे आकर्षण दिसत नाही. त्यासाठी आवश्यक असलेली रांगडी देहयष्टीही अभावाने दिसते. अशा वेळी कुस्ती संघटनेने पुढाकार घेऊन नवयुवकांना या खेळाकडे आकर्षित केले पाहिजे. कोल्हापूर, सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्र, पुण्यापुरतीच दर्जेदार मल्लांची परंपरा मर्यादित राहते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मराठवाडा, विदर्भ मागे पडत चालला आहे. हरियाणातल्या छोट्या गावातून आलेला सुशीलकुमार भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक देऊ शकला. महाराष्ट्रातून असा एकही ऑलिम्पिक विजेता खाशाबा जाधव यांच्यानंतर तयार करता आला नाही. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीच्या कौतुकाचा धुरळा खाली बसल्यानंतर अंतर्मुख होऊन कुस्तीगीर संघटना आणि राज्य सरकारने विचार करावा. प्रत्येक महाराष्ट्र केसरीच्या वेळी त्याच विचारांचे दळण दळू नये.
बातम्या आणखी आहेत...