आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 11th Jan 2016 About Air Travelling

आरामदायी आणि वेगवान ! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला प्रवास आरामदायी आणि वेगवान असावा, असे कोणाला वाटणार नाही? ते सर्वांनाच वाटते, पण तसा प्रवास देशात फार कमी नागरिकांना करायला मिळतो. देशातील मुख्य रस्त्यांची स्थिती आता बरीच बरी आणि काही ठिकाणी ती अतिशय चांगली झाली आहे. सर्वांनाच परवडत नसल्या तरी त्यावरून आत बसलेल्या प्रवाशाला फार त्रास होणार नाही, अशा व्होल्व्हो बस धावू लागल्या आहेत. महानगरांत वातानुकूलित बस प्रवास सुरू झाला. प्रवासाचे दुसरे साधन आहे ते भारतीय रेल्वे. रेल्वेच्या माध्यमातून ब्रिटिशांनी हा महाकाय देश बांधला; पण ते गेल्यानंतर तिचा विस्तार फार झाला नाही, असे आपण म्हणत असलो तरी ते तेवढे खरे नाही. जेवढे व्हायला पाहिजे होते, तेवढे झाले नाही, हे मात्र खरे आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतोसारख्या आरामदायी आणि वेगवान गाड्या आणि मोजक्या मोठ्या शहरांत एक गरज म्हणून वातानुकूलित मेट्रो, मोनोरेल धावू लागल्या. हे सगळे होते आहे, मात्र त्याची गती जनतेच्या अपेक्षा ज्या वेगाने वाढत आहेत, त्याच्याशी आज स्पर्धा करू शकत नाही. म्हणूनच आम्हाला अधिक आरामदायी आणि वेगवान हवे आहे, याचा एक रेटा देशभर तयार होऊ लागला आहे. हा रेटा हे चांगले लक्षण यासाठी आहे की तो वाढल्याशिवाय काहीच बदलत नाही; पण गेल्या काही वर्षांत त्या रेट्यानेच बरेच काही बदलू लागले आहे. रेल्वेच्या त्याच त्या राखाडी आणि निळ्या रंगांचे डबे आणि लालपिवळ्या रंगांच्या त्या बस पाहिल्या की प्रवास हमखास वाईट होणार, अशीच मनाची तयारी होते, असा एक काळ होता. पण गेल्या २०-२५ वर्षांत त्यात मंदगतीने का होईना पण बदल होत गेले. रेल्वेगाड्यांचा वेग वाढला तसे खासगीकरणाच्या माध्यमातून तिच्यात मिळणाऱ्या सोयीही वाढल्या. एशियाड आणि शिवनेरीसारख्या बस काही मार्गावर दिमाखात धावू लागल्या. त्या मोजके थांबे घेत वेगवान तर झाल्याच, पण चांगल्या खासगी हॉटेलांवरही थांबू लागल्या. सरकार आणि खासगी यांच्यात स्पर्धा सुरू झाली आणि तिचा लाभ प्रवाशांना मिळू लागला आहे. त्याचा फायदा अर्थकारणाला होईलच. त्याशिवाय जागतिक दर्जाच्या वाहतूक यंत्रणेचा भारतात जसजसा प्रसार वाढत जाईल, त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील प्रगतीसाठीही हातभार लागणार आहे.

परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचा परिणाम असेल कदाचित; पण आता त्याहीपुढे आणखी आरामदायी आणि वेगवान प्रवास हवा, असे म्हणणारा वर्ग तयार होऊ लागला आहे. त्यांचे म्हणणे सरकारला ऐकणे भाग आहे म्हणूनच प्रवासाचे असे पर्याय दिसू लागले आहेत. विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक वेगाने भारतात वाढते आहे आणि त्या प्रवासाशी स्पर्धा करावी लागेल, याची जाणीव रेल्वेलाही होऊ लागली आहे. त्यामुळेच प्रतितास १६० ते २०० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना करड्या, निळ्या आणि पिवळ्या रंगांचे (सर्वात वेगवान प्राणी चित्त्याचा रंग) चकचकीत नवे डबे लागणार असल्याची चांगली बातमी आली आहे. कपूरथळा येथील कोच कारखान्यात हे डबे तयार होत आहेत. दिल्ली-आग्रा, दिल्ली-कानपूर, चेन्नई-हैदराबाद, नागपूर-सिकंदराबाद आणि मुंबई-गोवा अशा मोजक्या मार्गांना सुरुवातीस त्याचा लाभ होणार आहे. तर भोपाळच्या कारखान्यात अधिक आरामदायी आणि अधिक सुरक्षित असे डबे तयार केले जात आहेत. रेल्वे डब्यातील सध्याचे दृश्य बदलून जाईल आणि प्रवासाचे समाधान मिळेल, असे हे डबे असणार आहेत. म्हणजे आसनांची सुबक रचना, बायो टॉयलेट, प्रकाशमान चिन्हे, वरील बर्थवर जाण्यासाठी चांगल्या शिड्या असा हा चांगला बदल असणार आहे. रेल्वे प्रत्येक कोचवर १४ लाख रुपये खर्च करणार आहे. रस्ता वाहतूकही कोठे कमी पडू नये, याचीही तयारी सध्या सुरू असून महामार्ग टाकण्याचा वेग दररोज १६ वरून १७ किलोमीटरपर्यंत गेला असून तो पुढील दोन वर्षांत दररोज ३० किलोमीटरपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१२-१३ मध्ये असे विक्रमी ५ हजार ७०० किलोमीटरचे महामार्ग पूर्ण झाले होते, तो वेग या आर्थिक वर्षात सहा हजार किलोमीटरपर्यंत जाईल! गेल्या आर्थिक वर्षात आठ हजार किलोमीटर रस्ते प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, ती या आर्थिक वर्षात १० हजार किलोमीटरपर्यंत झेप मारणार आहे. देशातील मोठी, मध्यम शहरे आणि शिर्डीसारखी धार्मिक ठिकाणे हवाई मार्गांनी जोडणे, ही आपली मोठीच गरज असून त्याचीही तयारी सध्या सुरू आहे. ही कामे पूर्ण होतील तेव्हा कोट्यवधी नागरिकांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. भारतीय नागरिकांना आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित प्रवास हवा आहे. एवढ्या महाकाय देशात हे काम आतापर्यंत वेगाने होऊ शकले नाही. कारण आपण भांडवलाने अडलो होतो. पण क्रयशक्ती वाढलेल्या ग्राहकांनी तो प्रश्न सोडविला असून भारतीय नागरिकाला हवाहवासा तो प्रवास लवकरच प्रत्यक्षात येण्याची ही सुरुवात आहे.