आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसलेले पुनरागमन (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजकारणात पुनरागमन करणाऱ्या राहुल गांधींचे आक्रमक व नावीन्यपूर्ण बोल ऐकण्यास जनता, नेते, पत्रकार उत्सुक होते. त्यांची निराशा झाली. अपवाद फक्त काँग्रेसप्रेमी पत्रकारांचा. अन्य लोकांना मात्र दोन महिन्यांत युवराजांंनी आत्मचिंतन केले की फक्त उनाडक्या करण्यात दिवस घालवले, असा प्रश्न पडला. या भाषणात ना नावीन्य होते, ना तळमळ. सुटी मात्र त्यांना मानवलेली दिसली. चेह-यावर टवटवी होती, हालचालीत आवेश होता. मनमोहनसिंग, दिग्विजयसिंग, अँटनी अशा वडीलधाऱ्यांच्या सान्निध्यात ते रमले होते. सोबतीला आईची माया होती. शाळेतील पालक सभेत बाळे जशी बागडतात तसे ते व्यासपीठावर बागडत होते. सर्व वडीलधाऱ्यांना बाळाचे कौतुक होते. परदेशी शिकून आलेल्या मुलाकडे ज्या आशेने पालक पाहतात तशी आशा काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर ओघळत होती. सत्ता मिळण्याची आशा काँग्रेसला सध्या नाही. पण निदान विरोधी पक्षात तरी आब राहावा अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षांचे नेतृत्वही मुलायम, लालू अशांकडे जाते आहे काय, ही धास्ती काँग्रेसला पडली आहे. आत्मचिंतन करून तरतरीत झालेले राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळतील व काँग्रेसमध्ये चैतन्य आणतील या आशेवर गर्दी जमवण्यात आली; परंतु घरी घोकलेले पुस्तकी भाषण मुलगा पालक सभेत वाचून दाखवतो तोच प्रकार या कौतुकमेळ्यात घडला. मोदींवर त्यांनी काही तिखट शाब्दिक हल्ले केले असले तरी त्यामध्ये अभ्यासाचा अभाव होता. उद्योगपतींकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मोदी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यात तथ्य असेल तर रॉबर्ट वद्रा यांना मिळालेल्या जमिनीचे काय? उद्योगपतींवरील कृपादृष्टीचे अनेक दाखले काँग्रेसच्या दप्तरात सापडतील. जमीन अधिग्रहण विधेयकातील मोदी सरकारचे बदल शेतकऱ्यांसाठी कसे मारक आहेत हे त्यांना जनतेला पटवून द्यायचे होते. मात्र, याबाबत त्यांनी पुरेसा अभ्यास केला नसल्याने त्यांच्या युक्तिवादातील बरेच मुद्दे सरसकट चुकीचे होते. शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही असे ते म्हणाले. नव्या कायद्यात भरपाईमध्ये काहीच बदल नाहीत. शेतकऱ्यांची मान्यता घेण्याची अट काढली असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी ही अट फक्त सरकारी प्रकल्पांसाठी काढली गेली आहे. खासगी कंपन्यांसाठी नाही. इतरही काही मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक प्रचारासारखे भाषण केले. त्यापेक्षा मनमोहनसिंग यांचे भाषण मुद्देसूद होते. शेतकऱ्यांबद्दल बोलतानाच, त्याच आवेशात राहुल गांधी यांनी उद्योग क्षेत्राचेही गुणगान सुरू केले व मेक इन इंडियाची आवश्यकता असल्याचेही सांगितले. त्याआधी सकाळी पंतप्रधान मोदी यांचे भाजपच्या खासदारांसमोर भाषण झाले होते. मोदींचे भाषण बचावाचे होते; कारण राहुल गांधींच्या आगमनाची धास्ती त्यांना असावी अशी टिप्पणी, काँग्रेसच्या वळचणीला बुद्धी टांगलेल्या काही संपादकांनी केली होती. मोदी बचावात्मक असतील तर राहुल गांधींचे काय? त्यांच्या भाषणाला तर फोकसच नव्हता असे म्हणावे लागेल. भावनिक शब्दांची आतषबाजी करून शेतकऱ्यांचा कैवारी केवळ आपणच असल्याचा डांगोरा पिटण्याचा खटाटोप या मेळाव्यातून केला गेला. जमिनी गेल्या तर शेतकरी नक्षलवादी बनतील अशी धास्ती त्यांनी व्यक्त केली. राहुल यांचा देशाचा अभ्यास खरोखरच थिटा असावा. कारण पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याचे दु:ख सध्या नक्षलवादी नेते करीत आहेत, याची राहुल गांधींना कल्पना नाही.

मुळात राहुल गांधींना, म्हणजेच काँग्रेसला स्वत:च्या भूमिकेबद्दल खात्री नाही. सरकारमार्फत अल्पकिमतीत जमिनी बळकावून गब्बर झालेले अनेक नेते काँग्रेसच्या मेळाव्यात बसले असताना जमिनीवरील युक्तिवादात जिवंतपणा कसा येणार? शिवाय राॅबर्ट वद्रांच्या जमीन व्यवहाराचे काय करणार? शेतकऱ्यांबद्दल खरी कणव असेल आणि त्यांच्या बाजूने लढा द्यायचा असेल तर प्रथम वद्रा यांची जमीन राहुल व सोनिया गांधींनी परत करावी. तो व्यवहार कायदेशीर असेल, पण शेतकऱ्यांची त्यात फसवणूक झाली आहे. विविध मार्गांनी लाखो हेक्टर जमिनी काँग्रेस नेत्यांच्या घशात गेल्यानंतर ६० वर्षांंनी जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची उपरती काँग्रेसला झाली हे वास्तव आहे. ते जोरकसपणे शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देण्याची हिंमत मोदी सरकारमध्ये नाही. कारण त्यांच्याही अनेक नेत्यांना त्यामध्ये फायदा मिळालेला आहे. एकीकडून सत्ता राखण्यासाठी तर दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये प्रमुख स्थान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेतला जात आहे. राहुल गांधींच्या आगमनाने शक्तिवर्धन होईल अशी काँग्रेस नेत्यांची अपेक्षा होती व मोदींना आव्हान देण्याची शक्ती पक्षात येईल असे जनतेला वाटत होते. सशक्त विरोधी पक्ष जनतेलाही हवा असतो. तथापि, राहुल गांधींनी ना नेत्यांची अपेक्षा पुरी केली, ना जनतेची. पालक मेळावे असेच सुरू राहिले तर देश काँग्रेसमुक्त करण्यासाठी मोदींना वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही.
बातम्या आणखी आहेत...