आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 21st April 2015

\'डेंजरस\' सीताराम (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची निवड झाली असून स्वागत करावे असा हा निर्णय आहे. याआधी करात यांनी तीन वेळा हे पद घेतले. करात यांची पक्षनिष्ठा व विचारनिष्ठा वादातीत असली तरी कडव्या धोरणामुळे पक्षाची बरीच वाताहत झाली. अणुकरारावेळी मनमोहनसिंग यांना कैचीत पकडण्याचा उद्योग करात यांनी केला व तेव्हापासून पक्षाच्या घसरणीला सुरुवात झाली. ती गेली दहा वर्षे वाढतच गेली. करात राजकीय अस्पृश्यता जपणारे असल्याने उजव्या व भांडवलशाही शक्तींच्या विरोधाला द्वेषाचे स्वरूप आले व जनतेपासून पक्ष दुरावला. आज सीताराम येचुरी यांच्यासमोर जी बरीच मोठी आव्हाने उभी आहेत, त्याला करात कारणीभूत आहेत.
सीताराम येचुरी यांचा ‘व्हेरी डेंजरस मॅन’ असा उल्लेख ज्योती बसू करीत. येचुरी भाषाकोविद आहेत. तामिळ, तेलगू, बंगाली, हिंदी व इंग्रजी या भाषा ते लीलया बोलतात. सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतरही त्यांनी तीन भाषांत भाषण केले. अशा भाषाप्रभुत्वामुळे प्रत्येक राज्यातील नेत्याशी हे काय बोलतात, अशी शंका अन्य राज्यांतील नेत्यांना सतावीत असल्याने, ‘सीताराम, यू आर व्हेरी डेंजरस मॅन’ असा उल्लेख बसू यांनी कौतुकाने केला होता. अनेक भाषांवरील प्रभुत्व ही त्यांच्या नेतृत्वगुणाची एकमेव कसोटी नाही. येचुरी अभ्यासू आहेत. माहितीचा पक्का साठा त्यांच्याकडे असतो व त्याचा उपयोग करून ते तर्कशुद्ध मांडणी करतात. मार्क्सवादाच्या वैचारिक चौकटीची मर्यादा असूनही राज्यसभेतील त्यांची भाषणे ही विचार करायला लावणारी असतात. भाषांच्या अभ्यासामुळे बुद्धीला लवचिकता येते. ती येचुरी यांच्याजवळ असल्याने सर्व पक्षांत ते प्रिय आहेत. भाषेचे वैविध्य त्यांनी पक्षाच्या विचारात आणले, पक्षीय विचारांंना जरा मोकळा श्वास घेण्याची संधी दिली तर ‘डेंजरस’ असूनही ते देशासाठी उपयुक्त ठरू शकतात. कारण मार्क्सवादी पक्षातील अनेक गुण हे देशात समतोल राखण्यासाठी अत्यावश्यक आहेत. या पक्षाची संसदेतील संख्या नगण्य असली तरी पक्षाचा प्रभाव हा खासदारांच्या संख्येवर नसतो, तर प्रभावी युक्तिवाद करणारे अभ्यासू खासदार किती यावर असतो. ही कसोटी लावली तर मार्क्सवादी हे भाजप-काँग्रेससह अन्य पक्षांच्या शेकडो मैल पुढे जातात. पक्षाच्या खासदारांची साधी राहणी हा आणखी एक गुण. पैशाचे खेळ या पक्षाच्या नेत्यांसमोर चालत नाहीत. वैचारिक युक्तिवाद करूनच त्यांचे मन वळवावे लागते, अन्य अामिषे तेथे कामी येत नाहीत. अणुकराराच्या वेळी काँग्रेसने हा अनुभव घेतला होता. अभ्यास, निष्ठा, साधी राहणी व तीन राज्यांतील प्रशासनाचा दीर्घकाळचा अनुभव असा भक्कम पाया माकपकडे आहे. असे असूनही पक्षाची अशी स्थिती का झाली?
याचे कारण सांस्कृतिक धोरणात दडलेले आहे. भारताची श्रद्धावान मानसिकता मार्क्सवादी नेत्यांनी कधी समजून घेतली नाही. युरोपातील पुस्तके वाचून देशी श्रद्धेवर वैचारिक प्रहार करण्यात त्यांनी वेळ फुकट घालवला. धर्मश्रद्धा म्हणजे पिळवणूक असे सोपे, पण फसवे गणित त्यांनी मांडले. मार्क्सवादी स्वत:च्या वैचारिक निष्ठेबद्दल भावनिक असतात, साहित्य, कला यात त्यांना विलक्षण गती असते; पण दुसऱ्याच्या भावनांचा ते विचार करू शकत नाहीत. धर्मप्रेरणा ही भारताची मूलभूत शक्ती आहे. तिचा आदर करून ती अधिकाधिक शुद्ध कशी होत जाईल याकडे मार्क्सवाद्यांनी लक्ष दिले असते तर बजरंग दल, विहिंप अशांना या समाजात महत्त्व मिळाले नसते. बुद्धिनिष्ठ धर्मदर्शनाच्या अभावी समाजात कर्मकांड्यांचे फावले. पक्षाने आर्थिक हक्कांची भाषा नेहमी केली, पण हक्क जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपत्ती निर्माणाकडे लक्ष दिले नाही. देशाची श्रीमंती वाढवण्याऐवजी गरिबांची संख्या वाढवण्याकडे कल गेला. पश्चिम बंगालचे आर्थिक चित्र हेच दाखवते. आजच्या तरुणांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा समजून घेण्यात मार्क्सवादी नेते कमी पडले. आर्थिक अभ्युदयाच्या संधी असल्याने तरुण अमेरिकेकडे आकृष्ट होत असताना मार्क्सवादी मात्र पोथीनिष्ठ अहंकाराने अमेरिकी भांडवलशाहीला झोडत राहिले. नागरिकांच्या हक्कांबाबत ते जागरूक होते; पण आर्थिक सबलता व आत्मविश्वास ते देऊ शकले नाहीत.

हा वारसा बदलण्याचे आव्हान येचुरी यांच्यासमोर आहे. भारत कसा समजून घ्यावा, याचा सल्ला स्टॅलिन याने रणदिवे आदी नेत्यांना दिला होता. अखंड भारताचा विषय हाती घेण्यास सांगितले होते. अर्थातच त्या नेत्यांनी तो धुडकावला, पण स्टॅलिनने मांडलेल्या आडाख्यानुसारच भारतातील घटना घडत गेल्या. येचुरी यांना त्याची आठवण करून द्यावीशी वाटते. ‘राम व सीता यांचा संगम माझ्या नावात असल्यामुळे माझ्यावर टीका केल्याने भाजपला शांती मिळते’, असे येचुरी म्हणाले होते. यातील मार्मिकता दाद देण्यासारखी असली तरी राम-सीता नावातील शांती देण्याचे सामर्थ्य मार्क्सवाद्यांनी कधी तरी गंभीरपणे समजून घ्यावे, अशी विनंती करावीशी वाटते.