आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिवचलेले उधाण (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोलकाता येथील ईडन गार्डनवर शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने आपला पारंपरिक कडवा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. अब्जावधी क्रिकेटप्रेमींच्या मनात भारताच्या विजयाची जी तीव्र इच्छा होती ती पूर्ण झाली, हे चांगले झाले. हा सामना सुरू असताना ईडन गार्डनमध्ये सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चनपासून अनेक नामवंत तसेच सामान्य प्रेक्षक भारतीय खेळाडूंनी षटकार, चौकार लगावले किंवा पाकिस्तानच्या एखाद्या खेळाडूला बाद केल्यानंतर राष्ट्रध्वज उंचावत आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन करीत होते. विजयानंतर तर या आनंदाला आणखी उधाण आले. ईडन गार्डनमध्ये जशा ‘भारतमाता की जय'च्या घोषणा दिल्या जात होत्या तशाच त्या देशातील कानाकोपऱ्यातही दिल्या जात होत्या. पाकिस्तानविरोधातील सामन्याच्या निमित्ताने अनेकांनी आपले राष्ट्रप्रेम दाखवण्याची संधी साधली! मात्र हे राष्ट्रप्रेमाचे भरते नव्हते, तर तो उन्माद होता! देशामध्ये अलीकडे ज्या घटना घडत आहेत आणि त्यावर ज्या अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया उमटत आहेत त्याचेच प्रतिबिंब हे या सामन्याच्या निमित्ताने दिसले.

१९४७ मध्ये झालेले फाळणीचे आघात, पाकिस्तानने सातत्याने केलेले भारतद्वेषाचे राजकारण व दहशतवादी कारवाया यांच्यामुळे ते शत्रुराष्ट्र आहे ही भावना बहुतांश सामान्य भारतीयांच्या मनात खोलवर रुजली आहे. पाकिस्तानमध्येही भारतद्वेष मोठ्या प्रमाणावर जोपासला जातो. सामान्य माणसांना राजकारणातले सखोल तपशील कळत नाहीत. दोन्ही देशांतील राजकारण्यांनी जे वातावरण नासवून ठेवले त्याचेच अस्तर खेळालाही लाभते. ईडन गार्डनवर झालेला सामना हा काही टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना नव्हता. तो या स्पर्धेतील अनेक सामन्यांपैकी एक होता, तरीही ज्या पद्धतीने विजयानंतर भारतामध्ये देशप्रेमाचे नारे देत जे कथित राष्ट्रभक्तीचे वातावरण तयार करण्यात आले ते चिंताजनकच आहे. कोणताही बहुसंख्याक जनसमूह असे का वागतो? याचे साधे उत्तर त्याच्या छोट्या-छोट्या श्रद्धांना, आदर्शांना जर कोणी सातत्याने डिवचत राहिले तर त्याची प्रतिक्रिया म्हणून जनसमूह अशा पद्धतीचे वर्तन करतो.

कोणत्याही देशात बहुसंख्याकांच्या भावनांना नेहमीच महत्त्व दिले जाते. अल्पसंख्याकांच्या श्रद्धा, भावनांनाही समान न्याय दिला गेलाच पाहिजे. परंतु अल्पसंख्याक वर्गाचेच सारे बरोबर आणि बहुसंख्याक म्हणतात ते बहुतांशी चूकच अशी जेव्हा मांडणी सातत्याने होऊ लागते तेव्हा बहुसंख्याक जनसमूह खवळणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. सतत डिवचले गेल्यामुळे दुखावलेल्या बहुसंख्याकांकडून होणाऱ्या उन्मादी कृतींमुळे देशभर हिंसाचार होण्याचाही धोका असतो. त्यात सामान्य माणसांचीच हानी होते. राजकारण्यांचे काडीचेही नुकसान होत नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना असो वा असे अन्य प्रसंग, त्या वेळी देशातील बहुसंख्याक वर्गाकडून देशप्रेमाचे जे अतिरंजित दर्शन घडवले जाते त्याचे रूपांतर भविष्यात अराजकी परिस्थितीत होऊ शकते. याचे भान सध्या धार्मिक राष्ट्रवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता अशी जंगी नुरा कुस्ती खेळणाऱ्या कोणत्याच राजकीय पक्षांना राहिले नाही.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्याचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. घाईघाईने केलेली ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या बराेबर हाेती का चूक हे लवकरच कळेल. मात्र कन्हैयाकुमारला मारहाण करणाऱ्या वकिलांना कायद्याचा कठाेर बडगा दाखवण्यात माेदी सरकारने हात अाखडता घेतला असे चित्र निर्माण झाले. दुसऱ्या बाजूला कन्हैयाकुमार हा किती सच्चा आहे व बाकीचे कसे लुच्चे आहेत हे सिद्ध करण्याचा अाटापिटा डावे पक्ष, काँग्रेसपासून सगळ्याच भाजपविरोधी पक्षांनीही केला. अाता तर भाजपविराेधाच्या नावाखाली जनसामान्यांच्या मनातील भारतमातेच्या चित्राचेही छिद्रान्वेषण सुरू झाले. ‘अायसीसी ट्वेंटी-२० : भारताचा पाणउतारा करण्याची पािकस्तानला सुवर्णसंधी’ अशी शीर्षके देण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानवरील विजयानंतर ‘भारतमाता की जय’चा नारा देशभर घुमला हे लक्षात घ्यावे. राष्ट्रप्रेमाच्या हेतुत: केल्या जाणाऱ्या अवमानाचा फायदा शेवटी संघ परिवाराला हाेताे, हे पुराेगाम्यांनी लक्षात घ्यावे.
बातम्या आणखी आहेत...