आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 22nd April 2015

चिनी ठणका (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग गेल्या वर्षी भारत दौ-यावर आले होते तेव्हा भारत-चीन सीमेवर चिनी सैनिक भारतावर सतत दबाव आणत होते आणि शी यांच्या ते लक्षात आणून दिल्यावर चिनी सैनिक हटण्यास वेळ लागला होता. ‘दात ठणकत असतील तर सा-या शरीरात वेदना होत असतात,’ असे विधान त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावे लागले होते. एक प्रकारे दोन नेत्यांत काहीशी कटुता आली होती. मात्र, तीवर मात करत शी यांचा तो दौरा यशस्वी मानला गेला. चीनसारख्या शक्तीने मोठ्या असलेल्या शेजारी देशाला शांत ठेवणे भारताला भागच आहे. त्यामुळे चीनशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागतच केले पाहिजे. मात्र, चीनचा एकूण अनुभव लक्षात घेता भारताला हा ठणका कधीही त्रास देऊ शकतो, हेच शी यांच्या ताज्या पाकिस्तान दौ-यावरून स्पष्ट झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून शी यांनी त्या वेळी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. मात्र आता म्हणजे केवळ सहा महिन्यांनी केलेल्या दौ-यात शी यांनी पाकिस्तानमध्ये गुंतवणुकीची जी उधळण केली आहे, ती लक्षात घेता भारताला चीनवर फार विसंबून राहता कामा नये, असेच म्हणावे लागेल. पाकिस्तानची आर्थिक काळजी करणा-या अमेरिकेने तेथे २००२ पासून ३१ अब्ज डॉलर दिले आहेत, तर चीनने सोमवारी ४६ अब्ज डॉलरच्या तब्बल ५१ करारांवर सह्या केल्या आहेत! अर्थात अमेरिकेप्रमाणे ही लष्करी मदत नसून त्यातून चीनला पाकिस्तानची बाजारपेठ मिळणार आहे, तर पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीसाठीचे रस्ते मोकळे होणार आहेत. विशेषत: पाकिस्तान वीज संकटाने कोलमडला असून ही गुंतवणूक त्यासाठी वापरली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये दारिद्र्य आणि धर्मांधता यामुळे दहशतवाद पोसला गेला असून तो सरकारच्या डोक्यावर बसला आहे आणि आता त्याचा वापर तेथील सरकार भारतासारख्या देशांशी लढताना करते. चीनलाही त्याचा फटका बसला आहे. या मदतीतून पाकिस्तान जगासोबत चालण्यास तयार झाले तर ते जगाला हवेच आहे. मात्र तसे होईल याची खात्री द्यावी, अशी स्थिती आज तरी नाही.

अध्यक्ष शी यांचा आणि चिनी अध्यक्षांचा नऊ वर्षांतील पाकिस्तानचा हा पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांनी जी उधळण केली आहे, तिच्याशी भारताचा काही संबंध नाही, त्यामुळे भारताने काही चिंता करू नये, असे चीनने म्हटले आहे. पण चीन-पाकदरम्यान तीन हजार किलोमीटरचे आर्थिक क्षेत्र विकसित करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती पाहिल्यास शेजारी भारत त्याच्या परिणामापासून दूर राहू शकत नाही. १९७९ ला चीनने काराकोरम महामार्ग तयार करून पाकिस्तानशी व्यापार वाढवला होता, आताच्या करारानुसार पाकिस्तानच्या ग्वादार बंदराच्या मार्गे अरब देशांतून चीन तेलाची आयात करू शकेल. त्यामुळे आयातीचा मार्ग १२ हजार किलोमीटरने कमी होईल! भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब ही की पाकव्याप्त काश्मीरमधून हा महामार्ग होणार आहे. तसेच अरबी समुद्रातील या बंदरामुळे चीनला हिंदी महासागरात थेट प्रवेश मिळणार आहे. चीनने मध्यंतरी श्रीलंकेशी व्यापारी करार करून अरबी समुद्रातून चालणा-या व्यापारावर आपला दबाव टाकला होताच. चीनला मोठ्या पायाभूत प्रकल्पांतून भौगोलिक पातळीवर राजकारण खेळायचे असते म्हणून काराकोरम महामार्ग ही ‘भविष्य योजना’ असे वर्णन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले, ते उगाच नव्हे. तर दौरा पहिलाच असला तरी तो आपण आपल्या भावाच्या घरी जाण्यासारखा आहे, असे शी यांनी म्हटले आहे. यावरून उभय देशांनी या दौ-याला दिलेले महत्त्व लक्षात येते. अर्थात, दहशतवादात होरपळून निघालेल्या पाकिस्तानला यातून शांतता, स्थैर्य आणि आर्थिक विकासाचे महत्त्व कळले तर भारत त्याचा थेट लाभार्थी असेल. कारण पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य आणि दहशतवाद ही भारताची डोकेदुखी झाली असून तिच्यावर उपाय म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. भारताचा संरक्षण खर्च सतत वाढण्याचे ते प्रमुख कारण आहे. शत्रुराष्ट्राला शांत करण्याचा मार्ग म्हणजे त्या देशात गुंतवणूक वाढवणे होय, हा नव्या जगाचा मंत्र आहे. ‘साम्यवादी’ चीन हा मंत्र गेली ३० वर्षे जपत आहे आणि त्याआधारेच जगात दुस-या क्रमांकाची महासत्ता म्हणून त्याचा उदय झाला आहे. नव्या चीनला ही आर्थिक भाषा चांगली कळते आहे. म्हणूनच त्याचे भारतातील संधीकडे लक्ष आहे. पाकिस्तानने भारताशी संबंध सुधारावेत यासाठी चीन पाकिस्तानवर दबाव टाकत आहे, असे चीन म्हणतो आहे. याचा सरळ अर्थ काढायचा तर चीन भारताला मदत करू इच्छितो, असा होतो. मात्र, पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात चीनला भेट देत आहेत, तेव्हाच चीनचे खरे दात दिसतील. ते जर आर्थिक विकासाचे असतील तर चांगलेच आहे. मात्र ते तसे नसतील तर दाताचा हा ठणका जाण्यासाठी भारताला जालीम उपायांचे पर्याय खुलेच ठेवावे लागतील.