आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 24th April 2015

गड राखले, पण… (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काल झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर महापालिका निवडणुका या तशा पक्षीय अस्मितेच्या होत्या. मतदारांनी औरंगाबाद व नवी मुंबईत कोणत्याच पक्षाला बहुमत न देऊन सरकार अधांतरी राहील, असा कौल दिला आहे. औरंगाबाद शहरातील निवडणूक ही शिवसेना-भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. कारण तेथे एमआयएमचा प्रभाव वाढत असल्याने युतीच्या हिंदुत्व राजकारणापुढे आव्हान उभे राहिले होते. एमआयएमच्या इतिहासापासून या पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्या वादग्रस्त चिथावणीखोर भाषणांपर्यंत सर्वच मुद्द्यांवर शिवसेनेने मोठ्या प्रमाणात वातावरण तापवले होते, तरीही मतदारांनी एमआयएमला पदार्पणातच २५ जागा देत या पक्षाचे हात बळकट केले. या पक्षाने चांगले संख्याबळ मिळवताना काँग्रेस-राष्ट्रवादीला पुरते मागे फेकले हीसुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहे. अल्पसंख्याक ही काँग्रेसची व्होटबँक असल्याचा मुद्दा या निवडणुकीत साफ पुसला गेला. मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याने एमआयएमला सेनेपेक्षा केवळ चार जागा कमी आहेत व ते पालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून यापुढे असतील, तर शिवसेना-भाजप युतीला सत्ता मिळवण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. आपल्यावर अशी नामुष्की का आली याची चिंता युतीच्या नेत्यांना करावी लागेलच. युतीच्या कारभारावर शहरातील मतदार मोठ्या प्रमाणात नाराज होते. ही नाराजी ओळखून शिवसेनेने "बाण हवा की खान हवा', असा मुद्दा पेरून निवडणुकीत ध्रुवीकरण केले. हिंदू मतदारांनी अनिच्छेने युतीच्या पारड्यात मते टाकली आहेत, तर एमआयएमच्या यशात केवळ मुस्लिम मतदारांचा वाटा नाही, तर दलित व अन्य वर्गानेही काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष अशा सर्वांना नाकारून एमआयएमला जवळ केले आहे. शहरातल्या सुमारे ३५ दलित-मुस्लिम बहुसंख्य प्रभागांत एमआयएमचाच प्रभाव दिसला. काँग्रेसची व रिपब्लिकन पक्षाची मते या पक्षाने मोठ्या प्रमाणावर खेचून घेतली. ज्या शहरात आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे तेथे रिपब्लिकन पक्षाकडे दलित मतदारांनी दुर्लक्ष करणे हे या पक्षाच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी पक्षातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. लोकांची नाराजी खैरे यांचे पुतणे ज्या गुलमंडी भागातून उभे होते तेथे त्यांना भोवली. एकंदरीत औरंगाबादचे राजकारण अधिक आक्रमक होईल, अशी शक्यता आहे.

औरंगाबादेसारखी नवी मुंबईत जातीय समीकरणे नसली तरी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांपुढे आव्हान उभे केले होते. म्हात्रे व नाईक यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांपासून संघर्ष सुरू आहे. म्हात्रे यांनी नाईकांच्या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश मिळवून विधानसभा निवडणुकीत त्यांना धूळ चारली होती. त्यामुळे पालिका निवडणुका या नाईक व म्हात्रेंसाठी प्रतिष्ठेच्या होत्या. राष्ट्रवादीच्या कारभारावर लोकांची नाराजी असली तरी गेल्या चार महिन्यांत नाईकांनी मतदारांशी संपर्क साधण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. शिवसेनेची नाईकांशी जुनीपुरानी दुष्मनी असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जातीने प्रचारात उतरले होते. वांद्ऱ्यात नारायण राणे यांना जशी धूळ चारली तशी धूळ नाईकांना चारा, असे आवाहन करून त्यांनी सेना कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला होता. मतदारांनी गेल्या निवडणुकांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला जिंकून दिल्या; पण भाजपला ठेंगा दाखवला. भाजपला असे अपयश मिळण्याचे कारण म्हणजे या पक्षाची प्रचारसूत्रे केवळ म्हात्रे यांच्या हातात दिली गेली होती. प्रत्यक्ष तिकीट वाटपादरम्यान बराच घोळ झाल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. याचा भाजपला जोरदार फटका बसला. भाजपने वेळीच बंडखोरीवर नियंत्रण आणले असते तर त्यांच्या जागा वाढल्या असत्या. एकंदरीत नाईक घराणेशाहीला मुळापासून धक्के देण्याचे युतीचे प्रयत्न प्रभावशाली ठरले नाहीत. आता नाईकांनी काँग्रेसच्या मदतीनेच सत्ता स्थापन करू, असे म्हटले आहे. अंबरनाथ व बदलापूरमधील निवडणुका या वास्तविक सेना-भाजप व राष्ट्रवादी यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. बदलापूरमध्ये शिवसेना व भाजप असाच संघर्ष उभा होता. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी आपले पूर्ण वजन वापरले होते; पण पांढरपेशा समाज भाजपच्या मागे उभा राहील, असे वातावरण दिसत असताना मतदारांनी सेनेला जवळ केले, तर अंबरनाथमध्ये भाजप व सेना वेगवेगळे लढले होते. या निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या होत्या, कारण केंद्रात व राज्यात सत्ता असताना स्थानिक पातळीवरही चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी मिळाली होती; पण लोकांनी भाजपच्या एकंदरीत राजकारणाकडे दुर्लक्ष केलेले दिसले. काँग्रेसचा तर या निवडणुकांमध्ये कुठेच प्रभाव दिसत नव्हता.