आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मथुरेत गरिबांचे गोकुळ (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्यमशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदींनी मथुरेत गरिबांचे गोकुळ भरवलेले पाहून राहुल गांधींच्या गोटात आनंदाचे वातावरण असेल. राहुल गांधींच्या प्रचाराचा थेट परिणाम मथुरेतील मोदींच्या भाषणात पाहण्यास मिळाला. मोदींमधील आत्मविश्वास, धाडस, कल्पकता नाहीशी झाली काय, अशी शंका आली. अदानी-अंबानी अशा श्रीमंतांचे सरकार या प्रचाराने ते बुजले असावेत. वर्षभरापूर्वीचे मोदी हे तरुणांचे होते, उद्योजकांचे होते, महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या, स्वत:चे आयुष्य बदलू पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गाचे होते. बदल घडवण्याची ती ऊर्जा आजच्या भाषणात अजिबात दिसली नाही. उलट गरिबांसाठी माझ्या सरकारने काय केले याचा व केवळ याचाच जप मोदींनी केला. तेथे उपस्थित गरिबांनाही हे अपेक्षित नसेल. देशाला एक वेगळी दिशा देण्यासाठी मोदींच्या हाती देशाचे नेतृत्व जनतेने दिले आहे. त्यामध्ये तरुण, मध्यमवर्ग, उद्योजक यांच्याबरोबर शेतकरीही होते. या शेतकऱ्यांमध्येही उद्योजकता जागवण्याची संधी मोदी सरकारला होती व अजूनही आहे. ती उद्योजकता जागवण्याऐवजी, त्या भावनेला दृढ करण्याऐवजी मोदींनी काँग्रेसच्या पद्धतीने, गरिबांसाठी केलेल्या कामाची जनतेसमोर मोजदाद केली. हा काँग्रेसच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष विजय आहे. ‘सूट-बूट की सरकार' हा प्रचार वर्मी लागल्याचा प्रत्यय मथुरेमध्ये आला.

खरे तर काँग्रेसच्या प्रचाराची लक्तरे मोदींनी काढायला हवी होती. शेतकरी व गरिबांची सध्याची अवस्था हा काँग्रेसी राजवटीचा परिणाम होता. आधीच्या सरकारने किती घोटाळे केले होते याची यादी मोदींनी वाचली; पण शेतकऱ्यांच्या किती जमिनी लुटल्या ते का सांगितले नाही, याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या तुलनेत मोदी सरकारने अनेक योजना मार्गी लावल्या आहेत. १५ कोटी गरिबांना बँकेची खाती मिळाली आहेत. यामुळे दलालांचे काम बंद झाले आहे. कोळसा खाणींचा लिलाव पारदर्शी झाल्यामुळे कोट्यवधी रुपये सरकारच्या तिजोरीत आले आहेत. शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा कस किती हे शास्त्रोक्त कळणार आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत बँकेच्या खात्यात जमा होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. या लहानसहान गोष्टी महत्त्वाच्या असतात व त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. पण त्या मोदींनी सांगण्याची गरज नव्हती. एखाद्या आमदार-खासदाराने करावे तसे भाषण पंतप्रधानांकडून अपेक्षित नव्हते. पंतप्रधानांकडून दिशादर्शन हवे होते. भूसंपादन कायद्याचा अध्यादेश आणण्याची गरज का होती, परदेश प्रवासामागचे उद्देश काय होते, विरोधी पक्षांचा डाव काय आहे व त्याने कसे नुकसान होत आहे, अशा दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांबद्दल पंतप्रधानांनी बोलायला हवे होते. देशाला शेती आवश्यक आहेच; पण शेतीबद्दल उगाच भावनात्मक बोलून उपयोगी नाही. छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. देशातील कोट्यवधी अल्पभूधारकांना नव्या भूसंपादन कायद्याचा फायदाच होणार असल्याने वटहुकूम आणला, असे मोदींंनी आत्मविश्वासाने जनतेला सांगायला हवे होते. उद्योजकतेची कास धरलेले हे सरकार आहे व शेती हासुद्धा उद्योगच आहे, हा विचार स्पष्टपणे लोकांसमोर मांडण्याचे धाडस मोदींना झाले नाही.

एक वर्षाचा नि:पक्ष लेखाजोखा घेतला तर मोदींनी बरेच काम केले आहे, हे मान्य करावे लागते. विजेचे बिल कमी झाले की नाही, असा थेट प्रश्न केजरीवाल दिल्लीकर मतदारांना विचारतात व त्याचे उत्तर "होय' असे आले की स्वत:ची पाठ थोपटून घेतात. खरे तर तो दिवाळखोरीचा धंदा आहे; पण लोकांना असा थेट परिणाम आवडतो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा आला की नाही, असा प्रश्न विचारण्याचे धाडस मोदींनी करायला हवे होते. याउलट आपले सरकार फक्त गरिबांसाठीच आहे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ते ठीक आहे. पण भारतात फक्त शेतकरी नाहीत, तर मध्यमवर्गही मोठ्या संख्येने आहे. तो वर्ग मोदींचा मतदार नाही काय? त्या वर्गासाठी एक शब्दही मोदींच्या भाषणात नव्हता. लघुउद्योजकांसाठी सुरू केलेल्या मुद्रा बँकेचा उल्लेख त्यांनी केला असला तरी त्यावर ते विस्ताराने बोलले नाहीत. रोजगार निर्मितीमध्ये अनेक अडचणी येत आहेत, त्यावर मात कशी करणार, याचे विवेचन मोदींनी केले नाही. शेतकऱ्यांबद्दल ते बोलले; पण शहरी गरिबांबद्दल (यात मध्यमवर्गही आला) त्यांच्या भाषणात आश्वासक घोषणा नव्हत्या. उद्याचा भारत कसा असेल आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठी सरकार काय करणार आहे व जनतेने काय केले पाहिजे, याचा पूर्ण अभाव या भाषणात होता. ओबामांसमोर मिरवलेला सूट भलताच महागात पडला आणि मी सूटबूटवाल्यांचा नाही, गरिबांचा आहे हे सांगण्याची केविलवाणी धडपड मोदींना करावी लागली. विरोधी पक्षांतील एकजुटीचा हिसका मथुरेत चांंगलाच जाणवला. गुजरात व देश यामध्ये हा फरक आहे.
बातम्या आणखी आहेत...