आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 25th April 2015

असंवेदनशील व बेजबाबदार (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण तीन-साडेतीन वर्षांपूर्वी यूपीए सरकारच्या विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शन या एनजीओच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली रामलीला व जंतरमंतर मैदानावर लोकपाल व भ्रष्टाचाराबाबत मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहून त्या वेळी अरविंद केजरीवाल म्हणत होते की, जमावाच्या संख्येवरून सरकारने निर्णय घ्यायला हवेत. केजरीवाल त्या वेळी संसदेतील खासदारांना रस्त्यावर आणण्याची भाषा करत होते. राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष समाजकारणाशी संबंध तुटला असल्याने क्रांतीची व व्यवस्था परिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन केजरीवाल जागोजागी करत होते. केजरीवाल यांच्या त्या भूमिकेवर देशभर परस्पर टोकाची मते उमटत होती. गदारोळ उडत होता. केजरीवालच आता देशाची आशा आहेत, अशी प्रतिमा माध्यमेही गिरवू लागली होती. केजरीवाल यांच्या राजकारणाची जादू उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग व तरुणांवर नंतर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आली. दिल्लीवासीयांनी केजरीवाल यांना राक्षसी बहुमताने निवडून दिले. पण समाजाच्या प्रश्नांविषयी प्रत्यक्ष रस्त्यावर लढताना जे काही आक्रीत घडते, तेव्हा त्याला सामोरे जाताना प्रामाणिकपणा न दाखवता ज्या काही कोलांटउड्या राजकीय नेते करताना दिसतात, तसे वर्तन केजरीवाल व त्यांचे सहकारी दिल्लीतील घडामोडींबाबत करत आहेत. तीन दिवसांपूर्वी रामलीला मैदानावर राजस्थानमधील गजेंद्र सिंह या शेतकऱ्याने केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या केली व ही घटना देशाने टीव्हीवर पाहिली. आम आदमी पार्टीच्या नेत्यांचे प्रत्यक्ष घटना घडतानाचे वर्तन व नंतर जबाबदारी ढकलण्यामध्ये या पक्षाने सुरू केलेले युक्तिवाद एकंदरीत सामान्य माणसाच्या दृष्टीने क्लेशदायक आहेत. अवकाळी पाऊस व भूसंपादन विधेयक यामुळे देशभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असताना आपने त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या महिन्यात अण्णा हजारेंच्या भूसंपादनविरोधी आंदोलनात केजरीवाल हजेरी लावून गेले होते. नंतर काँग्रेसने आंदोलन केले. आता आपण मोदी सरकारच्या विरोधात नाही, अशी प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचू नये, म्हणून आपनेही या विषयात स्वत:ची भूमिका घेण्यासाठी पावले उचलली. एक राजकीय पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे; पण आपल्याच मेळाव्यात समोर शेतकरी गळफास लावून घेत असताना "आप'चा एकही नेता ते रोखण्यासाठी पुढे सरसावला नाही, हे संतापजनक आहे. घटनास्थळी आंदोलकांची गर्दी पाहता पोलिस व्यवस्था दिल्ली प्रशासनाने ठेवली नसल्याने ही घटना घडल्याचा केजरीवाल व त्यांच्या पक्षांचा आरोप हा सरळसरळ आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न आहे.
गजेंद्र सिंह झाडावर चढत असतानाच त्याला रोखण्याचे प्रयत्न होण्याची गरज होती व तेथे मोठा जमाव उपस्थित होता. त्या वेळी "आप'चे मंत्री मनीष शिसोदिया हे एका शेतकरी कुटुंबातून आले आहेत व त्यांना आंदोलनाविषयी किती कळकळ आहे हे सांगण्यात या पक्षाचे एक नेते कुमार विश्वास गुंतले होते. हा सगळा कौतुक सोहळा पुढे सुमारे अर्धा तास सुरू होता व त्यात शिसोदिया, केजरीवाल यांची सुमारे २० मिनिटे भाषणबाजी सुरू होती. केजरीवाल यांनी माइक घेताना सांगितले होते की ते फक्त दोन मिनिटे बोलणार आहेत आणि जे काही घडलेय ते दु:खदायक असून ते लगेचच शिसोदियांसह रुग्णालयात जाऊन गजेंद्र सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. पण केजरीवाल यांनी स्वत: १० मिनिटे भाषण केले. हे भाषण लांबले नसते तर गजेंद्र सिंह यांची आत्महत्या निश्चितच रोखली गेली असती व पुढचे आरोप-प्रत्यारोपांचे किळसवाणे राजकारण झाले नसते. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जाणूनबुजून हे घडवून आणल्यापासून हे राजकीय कटकारस्थान असल्याचा "आप'ने दावा करण्यास सुरुवात केली. जेव्हा मीडियाने हा घटनाक्रम मिनिटागणिक उलगडून दाखवला, तेव्हा "आप'चे नेते निरुत्तर झाले. आता मृत गजेंद्र सिंह यांच्या भावाने "आप'वर ही आत्महत्या घडवून आणल्याचा आरोप केला आहे. याची उत्तरे "आप'कडे आहेत का? दोषींना फाशी द्या, ही केजरीवाल यांची प्रतिक्रिया अजून गोंधळात टाकणारी आहे. केजरीवाल आता म्हणताहेत की, माझे भाषण लवकर आवरायला हवे होते. पण ही उपरती त्यांना व त्यांचे नेते आशुतोष यांना घटनेचे गांभीर्य पाहून पहिल्या तासातच यायला हवी होती. टीव्हीच्या पडद्यावर टीआरपी मिळवण्याचा "आप'चा नेहमीच प्रयत्न असतो, हा या पक्षावरचा आरोप गजेंद्र सिंह यांच्या दुर्दैवी आत्महत्येने अधिक पुष्टी देणारा ठरतो. देशातला सर्वसामान्य शेतकरी अवकाळी पाऊस, दुष्काळामुळे मरणासन्न अवस्थेपर्यंत आला आहे. ही जाण ज्यांच्या मतांवर निवडून येतात, त्या राजकीय नेत्यांनी किमान ठेवायला हवी. नेत्यांचा हा कृतघ्नपणा मोठ्या असंतोषाचे बीज ठरू शकेल.