आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजांसाठी पर्वणी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट हा खेळ फलंदाजधार्जिणा आहे, ही भावना क्रिकेट रसिक आणि गोलंदाजांमध्ये भिनत असतानाच आयसीसीने गोलंदाजांना दिलासा मिळेल, असे निर्णय कालपरवा घेतले आहेत. अर्थातच याचे मुख्य कारण आहे, एक गोलंदाज आयसीसीच्या क्रिकेट तांत्रिक समितीचा अध्यक्ष आहे. आतापर्यंत या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा बहुतांश माजी फलंदाजांनीच वाहिली होती. त्यामुळे गोलंदाजांचे दु:ख त्यांना कदाचित दिसले नसेल. अनिल कुंबळे स्वत: एक उत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज होते. कारकीर्दीत त्यांना पदोपदी या फलंदाजधार्जिण्या नियमांची जाणीव झाली असेल. त्याचाच परिणाम म्हणून एकदिवसीय व ट्वेंटी-२० क्रिकेटसाठी त्यांनी सुचवलेले अनेक बदल अमलात आणले गेले आहेत. मर्यादित षटकांच्या झटपट क्रिकेटचे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना धावांचा वर्षाव हवा आहे. पटापट बाद होणारे फलंदाज पाहणे त्यांना रुचणार नाही. प्रेक्षक गॅलरीतील उपस्थिती आणि क्रिकेट व्यवसाय यांची सांगड घालू पाहणाऱ्या आयसीसीने अलीकडे फलंदाजांना पोषक असे अनेक नियम केले होते. फलंदाजांना चेंडू फटकावण्यासाठी मोकळे मैदान मिळावे यासाठी खेळपट्टीनजीक किती खेळाडूंनी उभे राहावे ही संख्या वारंवार निश्चित केली जात होती. मैदानात झेल टिपण्यासाठी अथवा फटका अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक उभा करण्याची इच्छा असूनही कप्तानाला नियमांच्या बंधनामुळे तसे करता येत नव्हते. म्हणजे पहिल्या १० षटकांत फक्त २ खेळाडूच ३० यार्डांच्या वर्तुळाबाहेर असायचे. त्याचा लाभ अर्थातच फलंदाजांना व्हायचा. यापुढे तसे होणार नाही, १ ते १० षटकांतील ३० यार्ड वर्तुळाबाहेरील २ खेळाडूंची मर्यादा जाऊन आता खेळपट्टीनजीक किती क्षेत्ररक्षक असावेत यावर बंधन नसेल. त्यामुळे कप्तानाला मैदानात कुठेही क्षेत्ररक्षक ठेवता येतील. संख्येवरही बंधन नसेल. १५ ते ४० षटकांदरम्यान फलंदाजी करणाऱ्या संघालाही ‘पॉवर प्ले’ घेण्याची, अर्थात फटके खेळण्यासाठी मैदान मोकळे करून घेण्याची मुभा होती. ती यापुढे मिळणार नाही. ४१ ते ५० षटकांमध्येही क्षेत्ररक्षकांची बाह्य वर्तुळातील संख्या कमी होती. त्यामुळे त्या कालखंडात चौकार-षटकारांचा पाऊस पडायला लागला. एवढेच नव्हे तर ४०० धावसंख्येचा टप्पादेखील गाठला जाऊ लागला. वैयक्तिक पातळीवरदेखील शतक-दीडशतकापलीकडे फारशी मजल जात नव्हती तेथे द्विशतके काढणारे फलंदाजही वाढायला लागले. गोलंदाजांवर, क्षेत्ररक्षकांचे बंधन घालून सुरू असलेली फलंदाज आणि गोलंदाजांमधील ही लढाई असमतोल वाटत होती. गोलंदाज असलेल्या कुंबळंेनी तो विचार सर्वप्रथम केला आणि फलंदाजांच्या वाढत्या लाडांवर बंधने आणली. मैदानावर प्रेक्षक चौकार, षटकारांची बरसात पाहायला येतात हे मान्य आहे. मात्र संघर्ष हा दोन्ही पक्षांना समान संधी देऊन केला गेला तर पाहण्याची गोडी अधिक असते. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमान देश आणखीही काही चलाखी करतात. म्हणजे सीमारेषा ७५ यार्डांपर्यंत ठेवण्याची सोय व तरतूद असूनही, काही ज्येष्ठ फलंदाजांच्या आग्रह व हट्टामुळे ती चक्क ५५ यार्डांपर्यंत मागे नेली जाते. त्यामुळे वैयक्तिक व सांघिक धावांचे डोंगर मोठमोठे होत जातात. कधी कधी तर ही परिस्थिती, फलंदाजाची ‘नेट प्रॅक्टिस’ तर सुरू आहे, असे वाटावी इतपत जाते.

१९७१ च्या विंडीज दौऱ्यात ७७४ धावांचा रतीब टाकणारी सुनील गावसकरांची बॅट पुण्यात एका संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. ती छोटीशी बॅट पाहिल्यानंतर हीच का ती ‘भीमपराक्रमी बॅट’ असा प्रश्न पडतो. आज जमाना बदलला आहे. आजच्या बॅटचे, आकार, वजन आणि लाकडाची गुणवत्ता एवढी उंचावली आहे की फलंदाजाचा चुकलेला (मिस टाइम) फटकाही स्टेडियमच्या गॅलरीत जाऊन षटकार म्हणून पडतो. आता तर अशा बॅटचाही शोध लागला आहे की फलंदाजाने फटका खेळताना चूक केली तरीही त्याच्या बॅटची कडा घेतलेला चेंडू स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकांच्या हातापर्यंत पोहोचणार नाही. हळुवार हाताने चेंडू तटवल्याप्रमाणे फटका जवळच खाली पडेल. हे सारे बदल फलंदाजधार्जिणे आहेत. आयसीसीने प्रथमच गोलंदाजांच्या बाजूने निर्णय घेऊन समस्त गोलंदाज जमातीला दिलासा दिला आहे. नव्या बदलांमध्ये आयसीसीने गोलंदाजांनाही चाप लावला आहे. आतापर्यंत फक्त ‘फुट फॉल्ट’वर फ्री हिट दिली जायची. यापुढे सर्व प्रकारच्या नो बॉलवर फ्री हिट दिली जाणार आहे. बॅटीवरील निर्बंधही सध्या विचाराधीन आहेत. एवढेच नव्हे तर चेंडूची शिवण किंवा ‘सीमा’ याबाबतही अभ्यास केला जात आहे. चेंडूच्या सांध्यावरील शिवणीची जाडी (थिकनेस) आणि खोली (डेप्थ) याबाबतही सारखेपणा असायला हवा. याबाबत आयसीसी गांभीर्याने विचार करीत आहे. जाड व खोलवरच्या शिवणीचे चेंडू अधिक स्विंग होतात. तसेच अशा चेंडूवर पकड (ग्रीप) बसवणे फिरकी गोलंदाजांनाही सोपे जाते. गोलंदाजांचे हे फायदे कमी करण्याचा आयसीसी विचार करीत आहे, हीदेखील स्वागतार्हच गोष्ट आहे.
बातम्या आणखी आहेत...