आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial In Dainik Divya Marathi For 3rd November 2015

कौल युती टिकविण्याकडेच! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांमध्ये सततची स्पर्धा लागलेली आहे. दिसायला दोन मित्रांच्या दोन जोड्या आहेत. स्वाभाविकपणे ही मैत्री राजकीय असल्याने ती निकोप असण्याची अपेक्षा धरता येत नाही. मुख्य विरोधकांचे पाय खेचत असतानाच मित्राची उंचीसुद्धा आपल्यापेक्षा न वाढू देण्याची काळजी राजकारणात घ्यावी लागते. म्हणूनच शिवसेनेचे पंख छाटत राहणे ही भाजपची गरज आहे. काँग्रेसला रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ला कष्ट करणे भाग आहे. सत्ता संपादनाशिवाय राजकारणाचे दुसरे मुख्य उद्दिष्ट असूच शकत नाही. सत्तेसाठी स्वबळ आणि स्वबळासाठी स्वतःच्या पक्षाचा पसारा वाढवणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे केंद्रात-राज्यात एकत्र असलेले पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधात का, हा प्रश्न बालिश ठरतो. पुरेशी ताकद नसते तेव्हा किमान मतैक्य होणाऱ्याशी तह करून पुढे जाण्याची सोय राजकारणात पाहावी लागते. एकदा युती-आघाडी केल्यानंतर कोणामुळे कोणाचा फायदा होतो किंवा दोघांत मोठा कोण, हे प्रश्न फिजूल ठरतात. दोन राजकीय गरजवंत लाभापोटी एकत्र आले, एवढाच त्याचा अर्थ असतो. कल्याण-डोंबविली आणि कोल्हापूर महापालिकेतल्या निकालांचे ठळक वैशिष्ट्य हे की, जनतेने सगळ्याच राजकीय पक्षांना जमिनीवर आणून ठेवले. कल्याणमध्ये शिवसेना वरचढ ठरली असली तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत मोठी नाही. भाजप पाचपटीने वाढूनही शिवसेनेला मागे टाकू शकला नाही. कोल्हापुरात अनपेक्षितपणे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांच्या मागे जाण्यावाचून ‘राष्ट्रवादी’पुढे पर्याय नाही. असदुद्दीन ओवेसींच्या ‘एमआयएम’ला कल्याणमध्ये लक्षणीय यश मिळाले. मुंबईत ते रंगत आणणार हे यातून स्पष्ट झाले. वास्तविक कल्याणचा निकाल पक्षीय पातळीवर भाजप आणि शिवसेना या दोघांनाही सुखावणारा आहे. कल्याण-डोंबिवलीकरांनी १२२ नगरसेवकांच्या महापालिकेत या दोघांना मिळून ९० पेक्षा अधिक जागा दिल्या. केंद्रात, राज्यात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या या दोन्ही पक्षांनी महापालिकेच्या आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटले. याचा फायदा दोघांना झाला. युती झाली असती तर साहजिकच दोघांचीही आताएवढी वाढ झाली नसती. भाजप-सेनेच्या वर्चस्वामुळे दोघांचे प्रमुख विरोधक काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’ कल्याणमध्ये पुरते बेदखल झाले. भाजप-सेनेवर जनतेने एवढा विश्वास टाकला की सत्तेसाठी दोघांना पुन्हा एकत्र यावे लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर जे राज्यात घडले त्याची पुनरावृत्ती आता कल्याणमध्ये होईल. फरक इतकाच की, येथे शिवसेनेचा वरचष्मा राहील. दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून कल्याण-डोंबिवलीकडे पाहिले जात होते. कल्याणमध्ये ज्या पक्षाला निर्भेळ सत्ता मिळाली असती त्याने मुंबईत युती तोडण्यासाठी पुढाकार घेतला असता. याच तीव्र चुरशीतून प्रचाराच्या पातळीचा स्तर घसरला होता. मात्र, दोघांनाही लोकांचे जवळपास सारखेच समर्थन मिळत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे मुंबई निवडणुकीतील युती तोडताना भाजप-सेनेला दहादा विचार करावा लागेल. कल्याणवर भगवा फडकावल्याचा आनंद उपभाेगण्याचा अवसर उद्धव ठाकरेंना मिळाला नाही, व जबड्यात हात घातला तरी वाघाला लोळविण्याचे श्रेय फडणविसांना मिळणार नाही.
कोल्हापुरातले यश काँग्रेससाठी संजीवनी देणारे. अर्थात याचा लाभ घेण्याइतपत उत्साह किती काँग्रेसजनांमध्ये आहे, हे काळच सांगेल. सर्वाधिक नुकसान झाले ते राज ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी’चे. राज यांच्या विश्वासार्हतेच्या घसरगुंडीने आणखी तळ गाठला. कल्याणमध्ये नगण्य झालेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नशिबी काँग्रेसमागे जाण्याची फरपट आली. नगर परिषदांचे निकाल मात्र भाजपसाठी चिंताजनक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य आणि केंद्राच्या कामगिरीचे मूल्यमापन होत नसते, असे म्हणण्याचा प्रघात आहे. भाजपला भरभरून साथ देणाऱ्या विदर्भात भाजपची पीछेहाट होत असेल तर त्याकडे डोळेझाक करणे सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री, देशाचे दळणवळण मंत्री एवढी सत्तास्थाने असूनही विदर्भातल्या स्थानिक नगर परिषदांमध्ये भाजप वर्चस्व गाजवू शकला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष, ग्रामविकास मंत्र्यांच्या मराठवाड्यात भाजपला जनतेने नाकारले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीचा पुरेसा प्रभाव ग्रामीण भागावर नसल्याचे हे द्योतक आहे. सरकारवर लोक खुश नसल्याचा संदेश सत्ताधाऱ्यांना टिपून घ्यावा लागेल. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ यांच्यातला कलगीतुरा पाहण्याची सवय गेली पंधरा वर्षे तमाम महाराष्ट्रवासीयांना होती. आगामी काळात फडणवीस विरुद्ध ठाकरे हा संघर्ष दिसेल. कोणी पंजा उगारेल, कोणी जबड्यात हात घालेल. परंतु, मतदारांचा विश्वास तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा सगळ्यांना जमिनीवर आणण्याचा सुज्ञपणा मतदारांकडे असतोच. हा सुज्ञपणा लक्षात घेऊन युतीने सहकार्याने काम करावे.