आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे आत्मपरीक्षण (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात एक वर्ष व राज्यात सहा महिने पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे आपल्या कामगिरीबाबतचे आत्मपरीक्षण गरजेचे होते. केंद्रातल्या मोदी सरकारच्या एककेंद्री कारभारावर नाराजीचे स्वर उमटू लागले असले तरी राज्यात वेगळे वातावरण आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीमधील वादविवाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत असले तरी मध्यावधी निवडणुका व्हाव्या अशा राजकीय घडामोडी फारशा दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली एककल्ली अशी नाही. ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपुढे, मीडियापुढे सातत्याने जाताना दिसतात. सहा महिन्यांत त्यांची प्रशासनावरची पकडही चांगली बसलेली दिसत आहे. मात्र, सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना या मित्रपक्षाचे रुसवेफुगवे त्यांना अद्याप काढता आलेले नाहीत. कोल्हापुरात दोनदिवसीय भाजप कार्यकारिणी बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे आमची खरी ताकद कळली, असे जे वक्तव्य केले आहे, तो प्रत्यक्षात शिवसेनेवर प्रहार आहे. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याच मागण्यांना भाजपने भीक घातलेली नाही. अगदी सत्तेत सहभागी झाला नाही तरी बेहत्तर; पण राज्यात भाजपचे सरकार असेल, अशी भूमिका या पक्षाने ठामपणे घेतली होती. हा ठामपणा फडणवीसांनी वेळोवेळी दाखवून दिला आहे. कोल्हापूरमधील त्यांच्या या वक्तव्यामध्ये हा ठामपणा कायम आहे. शिवसेनेने त्यांच्या रुसव्याफुगव्यांना आवरते घ्यावे व गंभीरपणे राज्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे त्यांना सूचित करायचे आहे. या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीसुद्धा भाजप यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार, अशी घोषणाच केली आहे. त्यांनी तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढलेली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावेत, असा आदेशच दिला आहे. या आदेशाचा रोख काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नसून शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेने सत्तेत राहायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याबाबतचा निर्णय त्या पक्षाच्या प्रमुखांनी घ्यावा, असे भाजपचे दबावाचे राजकारण आहे.
भाजप शिवसेनेच्या विरोधात इतके दबावाचे राजकारण करू लागला याचे कारण त्यांची गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत झालेली दमदार कामगिरी. केंद्रातल्या यूपीए-२ सरकारच्या नाकर्तेपणाचा फायदा, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा भ्रष्टाचार व मोदींचा झंझावाती प्रचार या बळावर भाजपने निवडणूक प्रचारावेळी युती तुटूनही शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली नाही; पण या पक्षाचे वाढलेले मताधिक्य निश्चितच शिवसेनेला आव्हान देणारे होते. राज्यात सत्ता स्थापन केल्यास आपलेच राजकीय रंग दिसून यावेत म्हणून भाजप अधिक आक्रमक होता. म्हणून केंद्रातल्या मोदी सरकारच्या कारभाराचे प्रतिबिंब राज्यात दिसावे असाच प्रयत्न पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रातल्या पीएमओसारखे राज्यात सीएमओ स्थापन करून शिवसेनेला त्यापासून बाजूला ठेवले. अगदी महत्त्वाची कॅबिनेट खाती भाजपने स्वत:कडे ठेवली. ज्या उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आपली ताकद पणाला लावली तेथेही भाजपने शिवसेनेची डाळ शिजू दिली नाही. विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीत तर त्यांनी राष्ट्रवादीची मदत घेतली. शिवसेनेने ६३ जागा मिळवल्या असल्या तरी व त्यांचा पारंपरिक मतदार भाजपला फोडता आला नसला तरी शिवसेनेची असलेली थोडीथोडकी राजकीय ताकद त्यांनी पहिल्या दिवसापासून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली. जैतापूरच्या प्रश्नावर शिवसेनेच्या खासदारांना दिल्लीतून हात हलवत परत यावे लागले व त्यांना जैतापूर प्रकल्पाविषयी आपल्या भूमिकेत घूमजाव करावे लागले, याचा सर्वाधिक आनंद भाजपला झाला. शिवसेनेला मात्र मतदारांच्या सहानुभूतीचा राजकीय फायदा उचलता आलेला नाही. एकंदरीत शिवसेनेचे मनोबल खच्ची होताना दिसत असल्याने फडणवीसांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढू लागला नसता तर नवलच होते. म्हणून भाजपने राज्यात ‘एकला चलो रे’ची घेतलेली भूमिका ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घेतली आहे. मुंबईतल्या पालिका निवडणुकीत युती झाल्यास भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत हे स्पष्ट आहे. एकदा अधिक जागा मिळाल्यास मुंबईचा महापौरही भाजपचा होईल, अशी रणनीती भाजपची आहे. एकंदरीत युतीविषयीचा कोणताही निर्णय शिवसेनेनेच घ्यावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील भाजप कार्यकारिणीची बैठक ही एकाअर्थी भाजप-शिवसेना युतीच्या भविष्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा, असे सांगणारी घटना आहे. शिवसेनेला नामोहरम करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असला तरी त्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यात आत्मविश्वासही दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...