आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्के आणि बुक्के! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या देशात अच्छे दिन आज येतील, उद्या येतील याची जनतेला प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. तिची आशा अजूनही संपलेली नाही. तसेच गेल्या दोन वर्षांपासून मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा िवस्तार कधी करतील याची भाजपतील व केंद्र सरकारमधील मित्रपक्षांतील अनेक इच्छुक चातकासारखी वाट पाहत होेते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. काहींच्या आशा फळाल्या आल्या, तर काहींच्या विझल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या विस्तारात स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेऊन ते खाते कॅबिनेट मंत्रिपदी बढती देऊन प्रकाश जावडेकरांना देण्यात आले, हीच मोठी घडामोड होती. गेल्या दोन वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने नेमकी कामगिरी काय केली यापेक्षा स्मृती इराणी मनुष्यबळ विकास खात्याचा कारभार कसा चालवत आहेत, यावर उदंड चर्चा होत होती. हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित वेमुला प्रकरण घडल्यानंतर मोदी सरकार तसेच स्मृती इराणींवर विरोधकांनी इतकी आरोपबाजी केली की त्यामुळे मोदी सरकारच्या प्रतिमेच्या पार चिंधड्या उडणे शिल्लक राहिले होते. वेमुला प्रकरण स्मृती इराणींनी नीटपणे हाताळले नाही. त्यांनी वादंगाला चोख प्रत्युत्तर देण्याचा संसदेत प्रयत्न केला; पण त्यामुळे त्यांच्या घसरत्या कारभाराची गाडी काही सावरू शकली नाही. ऐन वादंग भरात असताना स्मृती इराणींना मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी विरोधक रोज करत असत; परंतु त्या वेळी मोदींनी त्यांना दाद लागू दिली नाही. आता सारे वातावरण निवळले असताना मोदींनी धक्कातंत्र देत स्मृती इराणींना थेट मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता न दाखवता त्यांना वस्त्रोद्योग खाते दिले आहे. त्यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाही कायम आहे. म्हणजेच स्मृती इराणींच्या कार्यक्षमतेबद्दल मोदींना शंका नाही; परंतु त्यांच्यामुळे आपले सरकार यापुढे अडचणीत येणार नाही, असेही त्यांनी पाहिले आहे. स्मृती इराणींच्या जागी मनुष्यबळ विकासमंत्री झालेले प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री म्हणून जे काम केले त्यावर मोदी प्रसन्न असावेत. प्रकाश जावडेकरांनी उद्योगपतींच्या बाजूने िनर्णय घेतले, अशी टीका होत असली तरी त्यात किती तथ्य आहे किंवा नाही हे काळ ठरवेलच. प्रकाश जावडेकरांना जे मनुष्यबळ विकास खाते मिळाले आहे, त्यात कारभार करताना त्यांनी शिक्षणाचे भगवेकरण करण्याची पावले उचलू नये. रा. स्व. संघाचे छुपे कार्यक्रम राबवण्यासाठी मंत्रिपदाचा वापर होता कामा नये याचे तारतम्य प्रत्येक मंत्र्याने बाळगण्याची गरज आहे.

स्मृती इराणी वादंगातून किमान इतका धडा प्रकाश जावडेकरांनी घ्यायला हरकत नाही. प्रकाश जावडेकर हे थेट निवडणूक लढून लोकसभेत निवडून गेल्याची उदाहरणे खूप कमी आहेत. ते दरबारी राजकारणी आहेत. असे असूनही त्यांची मंत्रिपदाची कामगिरी चांगली मानून जावडेकरांना जी संधी मिळाली त्याला अजून एक वेगळी किनार आहे. या वेळच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळणारच, असे छातीठोकपणे सांगितले जात होते ते राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांना मोदींनी बाजूला ठेवले. सहस्रबुद्धे हे मंत्रिमंडळात आता संधी मिळालेल्या अनेक व्यक्तींपेक्षा अधिक कार्यक्षम व कुशाग्र असूनही मोदींनी केवळ राजकीय गणितांमध्ये वजनदार ठरतील असे मोहरे मंत्रिमंडळ विस्तारात पुढे केले. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्या राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या मंत्र्यांची संख्या आता १५ झाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास, सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री, नितीन गडकरी भूपृष्ठ वाहतूकमंत्री, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले हे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री, हंसराज अहिर हे गृह खात्याचे, तर डॉ. सुभाष भामरे हे संरक्षण खात्याचे राज्यमंत्री बनले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशाबरोबर महाराष्ट्रालाही जे प्राधान्य दिले आहे त्यामुळे कोणीही समाधानाची ढेकर देण्याची गरज नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात विशिष्ट राज्यांचे मंत्री जास्त असल्याने त्या राज्यांच्या हिताचे अधिक निर्णय घेतले जातात, अशी टीका आजवर महाराष्ट्रातूनही केली जात असे. महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेतून पुरता बाहेर आलेला नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न अजूनही धगधगताच आहे. मराठवाड्यात आयअायएमसारख्या संस्था येणार अशा फक्त घोषणा झाल्या; पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही. आता मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले महाराष्ट्रातील मंत्री आपल्या राज्यासाठी किती भरीव मदत केंद्रातून आणतात, महाराष्ट्राचा विकास कसा घडवतात, याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...