आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचोटीची कसोटी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे राहील यावरून भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडवण्याचा मार्ग नैतिकतेच्या कसोटीत कसा बसेल, हा प्रश्न आहे.

लोकहितकारी, सचोटी व साधनशुचितेचे राजकारण कोणाला नको असते? काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत संसदीय लोकशाहीची एेशी की तैशी केल्याच्या गर्जना करत भाजपने केंद्रातील सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातही त्यांच्या हातात तात्पुरती का असेना सत्ता आली आहे. पण काळाचा सूड म्हणा, राजकारणात नैतिक आदर्शाचा पाठ दाखवण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. राज्यातल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून या पक्षापुढे उभा ठाकलेला नैतिक पेच भाजपच्या भविष्यकालीन राजकारणाचा मार्ग दाखवणारा आहे. पण भाजपचे राजकारण काँग्रेसपेक्षा भिन्न असेल का, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होताना दिसतो आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपचा उमेदवार हरल्यास साहजिकच सरकार नैतिकदृष्ट्या पडणार. पण हा पेच सोडवण्याचे सर्व मार्ग राजकीयदृष्ट्या तडजोडीचे, आपल्या विचारधारा-राजकारणाशी विसंगत, एकमेकांवर कुरघोडी करणारे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आज विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे गेल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमुळेच मिळणार हे स्पष्ट आहे. पण त्या बदल्यात त्यांना राष्ट्रवादीच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडावे लागणार हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षपदावरून भाजपच्या पाठीशी उभे राहताना स्वत:चा उमेदवार जाहीर केलेला नाही, पण त्यांना त्या बदल्यात विधान परिषदेतील सभापतिपद व विरोधी पक्षनेतेपद हवे आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक असे २८ आमदार आहेत व त्याखालोखाल २१ आमदार काँग्रेसचे आहेत. विधान परिषदेतील मोक्याची पदे एकदा हाती पडल्यास सरकार पडले तरी ती आपल्याकडेच राहतील, अशी राष्ट्रवादीची व्यूहनीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुन्हा आपला सरकारला पाठिंबा असेल, पण तो सर्वच मुद्द्यांवर नाही, असे सांगून भाजपवर टांगती तलवार ठेवली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार पाहून मतदान करू, अशी त्यांची भूमिका भाजपसाठी अधिक धोकादायक आहे. म्हणजे शिवसेनेचा उमेदवार पसंत पडल्यास राष्ट्रवादीची मते शिवसेनेकडे जाऊन भाजपला फटका बसू शकतो. राष्ट्रवादीला आपल्याकडे कसे झुकवायचे यासाठी भाजपला मते फोडावी लागतील व हे ते करणार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपले मतदान भाजपविरोधी असेल, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने त्याचा फायदा साहजिकच शिवसेनेला अधिक होऊ शकतो. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे सरकार कसे जेरीस येईल व ते नाक घासत कसे "मातोश्री'वर सेटलमेंटसाठी येतील याची शिवसेना वाट पाहत आहे. त्याची सुरुवात म्हणून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेचा गेल्या दोन-चार दिवसांत वाढलेला आवाज हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कूटनीतीचा भाग म्हणावा लागेल. त्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा देत मोदींच्या हिंदुत्वाला आव्हान देऊन राज्यातल्या भाजपपुढे अडचण तयार करून ठेवली आहे. सोमवारी मुंबईतील रंगशारदात उद्धव ठाकरेंचे झालेले भाषण व रविवारची त्यांची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेनेने भाजपविरोधात दंड थोपटल्याचे द्योतक होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपली भूमिका समजावून सांगताना स्वत:ची असहायताही विशद करण्याची गरज होती, ते काम त्यांनी केले. भाजपच्या कुरघोडीत आपली अवस्था ना घर का ना घाट का होऊ नये म्हणून शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचे त्यांचे म्हणणे सामान्य शिवसैनिकाला पटेल असेच आहे. त्यातच केंद्रात बिनमहत्त्वाचे एकच कॅबिनेट खाते व दोन-तीन राज्यमंत्रिपदांची लालूच दाखवत त्यांची करण्यात आलेली बोळवण शिवसेनेच्या जिव्हारी लागण्यासारखीच होती.

हा अपमान होत असताना भाजपच्या धुरीणांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही, हे महत्त्वाचे आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल १९ ऑक्टोबरला स्पष्ट आले होते व त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. या एकूण कालावधीत भाजपने राष्ट्रवादीच्या तथाकथित पाठिंब्यावर जनतेपुढे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादी आपल्या मूळच्या भूमिकेहून वळत असताना भाजप नेमक्या कोणत्या भूमिकेसाठी सरकार तगवणार आहे हे त्यांनीच स्पष्ट केलेले नाही. कोट्यवधी रुपये उधळून थाटामाटात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, त्या वेळी या राजकीय अडचणी त्यांना दिसत नव्हत्या असे म्हणता येत नाही. गंमत म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते पाच वर्षे सरकार कसे चालवणार यावर मूग गिळून गप्प आहेत. पण प्रसारमाध्यमांपुढे शिवसेनेला बळी देण्याचे भाजपचे राजकारण कोणत्या आदर्शात बसवायचे? भाजपचे राजकारण काँग्रेसच्या दिशेला जात असल्याचे हे निदर्शक आहे.