आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे काँग्रेसीकरण (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनतेला मोदी व फडणवीस यांच्याकडून वेगळ्या वर्तणुकीची अपेक्षा होती. काँग्रेसमुक्त भारताची हाक मोदी यांनी दिली व त्यावर जनतेने विश्वास ठेवला तो काँग्रेसच्या भ्रष्ट कार्यशैलीकडे पाहून. तीच कार्यशैली वेगळ्या चेहऱ्याने पुन्हा अस्तित्वात यावी म्हणून नव्हे.
एकदा निवडणूक आटोपली की आपण मतदारांना कसेही उल्लू बनवू शकतो अशा घमेंडीमध्ये सध्या मोदी-शहा दुक्कल असली तरी जनता दुधखुळी नाही. ज्या सोशल मीडियाच्या भरवशावर मोदी-शहा दुकलीने भारताची सत्ता मिळविली तेथे भाजपचे वस्त्रहरण सुरू आहे. थोड्याच काळात ते जाहीरपणे होऊ लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने, विशेषत: नरेंद्र मोदी यांनी मिळविलेली विश्वासार्हता विधानसभेतील घडामोडींमुळे लयाला जाण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा की नाही हा पक्षाचा स्वतंत्र विषय आहे. तो घेतला असता तर फडणवीस सरकार पक्क्या पायावर उभे राहिले असते असे म्हणता येईल. मात्र, शिवसेनेची आजपर्यंतची पावले व वक्तव्ये पाहता शिवसेनेची संगत नको असे भाजपने ठरविले.
निवडणूकपूर्व काळात शिवसेनेने काही गंभीर चुका केल्या, तर निकालानंतर भाजपने शिवसेनेला खेळवीत ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचा परस्पर पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपला जोर चढला होता व सत्तेचा मोह टाळता येत नसल्यामुळे शिवसेनेचेही तळ्यात-मळ्यात सुरू होते. या दोघांमध्ये चाललेल्या घोळाचा जनतेला वीट आला होता. भाजपने शिवसेनेची साथ धरली असती तर जनतेला बरे वाटले असते, पण धरली नाही म्हणून जनतेचा फार आक्षेप होता असेही नाही. यामुळे प्रश्न शिवसेनेची साथ घेऊन विधिमंडळात विश्वास मिळवायचा की नाही हा नव्हता तर कोणाची साथ घेऊन भाजप स्वच्छ सरकार देऊ इच्छितो हा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हे त्याला भाजपचे उत्तर होते. मात्र, तसे जाहीर करणे राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरत होते. जनतेने नाकारून चौथ्या क्रमांकावर फेकलेल्या पक्षाला बरोबर घेऊन भाजपने सरकार चालवावे हे जनतेला पटणारे नाही. भाजपच्या नेत्यांना याची कल्पना असल्यामुळे काल दुपारपर्यंत शिवसेनेचे मन वळविण्याची धडपड भाजपकडून सुरू होती. ती सफल झाली नाही, कारण भाजपमधील दिल्लीश्वरांना विरोध करून सरकार वाचविण्याची हिंमत फडणवीस व अन्य नेत्यांमध्ये नव्हती. परिणामी गोंधळाच्या वातावरणात विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात आला व फडणवीस सरकारला सहा महिन्यांचे जीवदान मिळाले.
हे जीवदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर असल्यामुळे ते किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याची कळकळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने व्यक्त होत असली तरी त्यावर जनतेचा विश्वास नाही. जनतेला मोदी व फडणवीस यांच्याकडून वेगळ्या वर्तणुकीची अपेक्षा होती. काँग्रेसमुक्त भारताची हाक मोदी यांनी दिली व त्यावर जनतेने विश्वास ठेवला तो काँग्रेसच्या भ्रष्ट कार्यशैलीकडे पाहून. तीच कार्यशैली वेगळ्या चेहऱ्याने पुन्हा अस्तित्वात यावी म्हणून नव्हे. दुर्दैवाने सध्या तेच होताना दिसत आहे. डॉ. मनमोहनसिंग मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवर टीका करणाऱ्यांचे मंत्रिमंडळही तितकेच मोठे होत असल्याचे जनता पाहत आहे. हव्या असणाऱ्या नेत्याला कोणत्याही राज्यातून राज्यसभेवर निवडून आणण्याच्या काँग्रेसी शैलीवर आसूड ओढणारे आता आपल्या नव्या मंत्र्यांनाही सोयीस्कर राज्यांतून निवडून आणत आहेत. परदेशात गेलेल्या काळ्या पैशाबाबत तर काँग्रेसच्याच वक्तव्याचा पुनरुच्चार होऊ लागला आहे. गतिमंद, विकलांग, मख्ख सरकार अशा शब्दांत डॉ. मनमोहनसिंग यांना हिणवणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत सफाई अभियानाहून वेगळे असे काहीही केलेले नाही. कोणताही धोरणात्मक महत्त्वाचा निर्णय अद्याप झालेला नाही. गतिमान, स्वच्छ प्रशासन देऊ, अशी ग्वाही देणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात तीन आठवडे सरकार आणता आले नाही. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या राज्यात गेले बावीस दिवस सरकारचे अस्तित्व नाही व आताही आलेले सरकार हे अल्पमताचे वा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभे असलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार भ्रष्ट होता की नाही या टीकेतील खरेखोटेपणा तपासून पाहण्यासाठी जनतेने भाजपच्या हातात राज्याची सूत्रे दिली. जनतेची ही महत्त्वाची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आता दुरावली आहे. मागील सरकारच्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी एखादी समिती स्थापन होईल वा श्वेतपत्रिकाही निघेल; पण त्यातून भ्रष्ट कारभाऱ्यांना शासन होणे कदापिही शक्य नाही. चौकशीचा ससेमिरा थोडा जरी वाढला तरी राष्ट्रवादीचा रिमोट कंट्रोल काम करू लागेल. अशा परिस्थितीत अन्य पक्षातील आमदार फोडून संख्याबळ वाढविण्याशिवाय भाजपकडे गत्यंतर नाही आणि याच मार्गाने भाजप महाराष्ट्रात वाटचाल करणार अशी चिन्हे दिसतात. म्हणजे इथेही काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकून सत्ता टिकविण्यासाठी तोडफोडीचे राजकारण भाजप करणार. थोडक्यात एकाला झाकावा व दुसऱ्याला काढावा अशीच सध्या देशाच्या राजकारणाची स्थिती झाल्याने सभागृहात विश्वास मिळविला तर जनतेमध्ये गमावला आहे.