आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध वारशाचे स्मरण (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्माजींनी नेहरूंना 'राजपुत्र' म्हणून संबोधले तर रवींद्रनाथांनी "ऋतुराज' म्हणून. पौरुष, सौंदर्य, कला विज्ञान व मानवता यांचा गोफ नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्या काळाप्रमाणे आजही अशा सुसंस्कृत आदर्शाची गरज आहे.
‘राजकारणातील राजपुत्र’ अशा मार्मिक शब्दांत म. गांधींनी ज्यांचे वर्णन केले होते त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज १२५ वा जन्मदिवस! नेहरूंचे हे वर्णन शब्दश: खरे होते. राजकारणात नेहरू कायम राजपुत्रासारखेच वावरले. ते राजा झाले, स्वतंत्र, सार्वभौम भारताचे पंतप्रधानपद त्यांना मिळाले, तरी त्यांचे मन हे राजपुत्राप्रमाणेच होते. मनस्वी, रसिक, संवेदनशील, आग्रही, हळवे, निरागस अशा मनाच्या विविध छटा नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात खुलून येत. बुद्धिमत्ता, सौंदर्य आणि संवेदनशीलता याचा विलक्षण संयोग नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता. सम्राट होण्याचे सर्व गुण नेहरूंमध्ये एकवटलेले होते व कित्येक दशके भारतीय जनतेच्या, विशेषत: तरुणांच्या हृदयाचे ते अनभिषिक्त सम्राट होते. सुभाषचंद्र वगळता नेहरूंइतकी लोकप्रियता आणखी कोणाच्याही वाट्याला आली नव्हती. मात्र, या लोकप्रियतेचा वापर करून सर्वसत्ताधीश होण्याचे नेहरूंच्या स्वप्नातही कधी आले नाही. नेहरूंच्या स्वभावाची थोरवी या एका कृतीतून दिसून येते. आजकाल एखादी निवडणूक जिंकणारे ज्या तोऱ्यात वावरतात व जग बदलण्याची भाषा करतात, तसा तोरा, तितकी हिंमत व ताकद असूनही नेहरूंनी कधी दाखवला नाही. कारण त्यांचे मन मुळातच सुसंस्कृत होते. ब्रिटनमधील वास्तव्यात त्याला अनेक पैलू पडत गेले. बुद्धी, सौंदर्य, संपत्ती, लोकप्रियता यातून त्यांचे तेज प्रगट होणारे कायम शीतल राहिले. असे होण्यास नेहरूंच्या स्वभावाप्रमाणेच म. गांधींचा सहवास विशेष कारणीभूत होता. स्वतंत्र भारताला योग्य दिशा पकडायची असेल तर राजशकट नेहरूंच्या हाती गेला पाहिजे, हे त्या महात्म्याने जाणले. म्हणून १९२८ मध्ये गांधीजींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत जवाहरलाल, सुभाषचंद्र यांनी जाहीर आव्हान देऊनही, पुढील वर्षी हाच माझा राजकीय वारसदार, अशी स्पष्ट घोषणा गांधीजींनी केली.

ही निवड योग्य होती, हे इतिहासाने सिद्ध केले. नेहरूंच्या चुका सांगण्याचा खोड भारतात अनेकांना आहे. नेहरूंनी काही गंभीर चुका केल्या यात वादच नाही. त्याचे परिणाम आजच्या पिढीलाही भोगावे लागत आहेत. विशेषत: परराष्ट्र राजकारणात त्यांच्याकडून गंभीर प्रमाद घडले. मात्र, दोन मूलभूत गोष्टी त्यांनी भारतासाठी केल्या. इथे लोकशाही दृढमूल झाली ती नेहरूंमुळे आणि या देशात विज्ञानाला प्रतिष्ठा मिळाली तीही नेहरूंमुळे. भारताच्या आर्थिक विकासाला समाजवादाचा आशय मिळणे अनिवार्य झाले तेही नेहरूंमुळे आणि परराष्ट्र धोरणावर तटस्थ वृत्तीचा अंकुश राहिला तोही नेहरूंमुळे. नेहरूंची दिशा अत्यंत योग्य होती. मात्र, अंमलबजावणी तडफेने झाली नाही. अंमलबजावणीचे तंत्र नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात नव्हते. इथे त्यांचा स्वप्नाळू स्वभाव आड येत असे. तीव्र संवेदनशीलता माणसाला अनेकदा हतबल करते. नेहरूंच्या जीवनात याचे अनेक दाखले मिळतात. काय करावे वा करू नये, या पेचात ते अनेकदा सापडत. तशी कबुलीही त्यांनी दिली आहे. समाजवाद, मार्क्सवाद यांचा विलक्षण प्रभाव नेहरूंवर होता, तरीही ते व्यक्तिस्वातंत्र्याचा कायम गौरव करीत राहिले. व्यक्तिस्वातंत्र्यवाद, उदारमतवाद, राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, गांधीवाद आणि मानवतावाद यांचा अखंड संघर्ष नेहरूंच्या चैतन्यशील व्यक्तिमत्त्वात सुरू असे. मात्र, त्यातून सुसंगत तत्वज्ञान उभे राहिले नाही. ती मोठी उणीव नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात होती.

तथापि, विविध वैचारिक वादांच्या या कारंज्याला कला व साहित्य प्रेमाचे कोंदण होते. असे कोंदण मिळाले कारण नेहरूंची जीवनासक्ती अफाट होती. जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी त्यांचे शरीर व मन रसरसलेले असे. जीवनातील आनंदाचा भरभरून आस्वाद घ्यावा, असे त्यांना तीव्रतेने वाटे. ही रसिकता आजच्या तरुण युगाला शोभणारी आहे. आजच्या तरुणांनी नेहरू समजून घेतले पाहिजेत ते यासाठी. राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, विज्ञान आणि जगण्यातील आनंद याचा मनोहरी संगम पाहायचा असेल तर नेहरूंचे चरित्र वाचणे आवश्यक ठरते. मात्र, नेहरूंचा जीवनानंद हा भोगवादी नव्हता. तो तरल होता, सौंदर्याने ते लुब्ध होत, मात्र त्याला सवंगतेचा स्पर्शही नसे. काव्यात त्यांना रुची होती. निसर्गाचे वेड होते आणि म्हणूनच राजकारणाच्या स्वार्थी प्रांतात वावरणा-या नेहरूंची पत्रे ही रमणीय साहित्याचा आविष्कार होतात. आचार्य अत्र्यांच्या शब्दांत, "अनंत नक्षत्रांनी प्रज्वलित झालेल्या शारदीय पौर्णिमेच्या चांदण्यात व रातराणीच्या सान्निध्यात नेहरू बोलत आहेत असे वाटते' कोटावरील गुलाबाचे फूल हे त्यांचे स्टाइल स्टेटमेंट नव्हते, तर ती एक जीवननिष्ठा होती. विज्ञानाला सौंदर्यासक्तीची जोड, राजकारणाला नैतिकतेची जोड आणि संवेदनशीलतेला चिंतनशीलतेची जोड, यातून नेहरूंचे विलोभनीय व्यक्तिमत्त्व निर्माण झाले. अशा समृद्ध वारशाचे स्मरण म्हणूनच उचित ठरते.