आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘...मुश्किल’ची मुश्किली (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ऐ दिल है मुश्किल’ या आज प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाची मुश्किली अद्याप कमी झाली नाही. दिग्दर्शक करण जोहरने माफी मागितल्यानंतरही चित्रपट पडद्यावर येण्यास होत असलेला विरोध थांबलेला नाही. जोहर यांच्या साथीला असलेल्या बॉलीवूडच्या कलाकारांनी गुरूवारी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेत संरक्षणाची मागणी केली. अर्थात मंत्री दिल्लीतले असो किंवा मुंबईतील, ते भाषा संरक्षण देण्याचीच करणार. कारण पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने आतापर्यंत तरी घेतलेला नाही. त्याउलट पाकिस्तान सरकारने मात्र भारतीय चित्रपट, वृत्तवाहिन्या पाहण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर या बंदीतून आकाशवाणी केंद्रही सुटलेले नाही. बंदीला पाकिस्तानी लोकांकडून साथ कितपत मिळेल याच्याही मर्यादा आहेतच. कारण बंदी घालणाऱ्यांपेक्षा तंत्रज्ञानाचा वेग, व्याप्ती आणि सहज उपलब्धता अधिक मोठी आहे. अर्थात ही बाब भारतातही लागू आहे. जोहरचा चित्रपट पडद्यावर दिसेल का नाही? दिसला तर तो देशात किती ठिकाणी दिसेल? या गोष्टी दोन-तीन दिवसांत स्पष्ट होतीलच. पण पायरसीच्या चोरवाटांद्वारे हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारा समांतर उद्योग हा पैशासाठी हपापलेला, काहीही करायला तयार आहेच. पाकिस्तानी सरकार भारतीय माध्यमांवर बंदी घालून मोकळे झाले. तरीही बॉलीवूडमधील काही कलाकारांची भाषा आजही दोन देशातील जनतेमध्ये पूल बांधण्याचे काम कलाकारांचे असल्याचे सांगते. त्या पुलाखालून वाहणारे शहीद जवानांचे रक्त त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही. मी देशभावनेबरोबर असल्याची व माफीची भाषा करण जोहर आज करताेय, पण बॉलीवूडमधल्या त्याच्यासारख्या लोकांना पैशापुढे काही दिसत नाही. वादग्रस्त चित्रपटाची तयारी करण्यापूर्वी पठाणकोटच्या लष्करी तळावर हल्ला झालाच होता. देशभावना त्याच्या अगोदरपासूनच पाकच्या विरोधात आहे. पाक कलाकारांना बरोबर घेऊन चित्रपटाची योजना अाखताना करण जोहरच्या लक्षात तेव्हा कसे आले नाही?

उरी लष्करी तळावरच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद््ध्वस्त केले. जे देशाच्या मनात होते ते लष्कराने करून दाखवले. त्यानंतर संयम पाळण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही त्यात दिसलेला अतिउत्साहाचा भाग सोडून द्या. पण आज तमाम हिंदुस्थानी नागरिकांच्या मनामध्ये जो सल आहे तो पाकिस्तानच्या विरोधातील आहे. त्याला सोडून बॉलीवूडच्या काही कलाकारांचे वागणे अजूनही पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण करणारे आहे. संतापाची गोष्ट म्हणजे ज्या कलाकारांनी भारतीय चित्रपटात काम केले, इकडचे भरपूर पैसे घेऊन पाकिस्तानी कलाकार तिकडे गेल्यावर हिंदुस्थानविरोधी सूर अाळवतात. पाक सरकार किंवा आयएसआयच्या विरोधात सूर काढायची त्यांची छाती नाहीच. पण बॉलीवूड कलाकार म्हणतात त्याप्रमाणे दोन देशांत, जनतेत पूल बांधण्याची ही भाषा त्यांची नाही. यानंतरही करण जोहरचा ‘एे दिल ...है मुश्किल’ आणि शाहरुख खानचा ‘रईस’ कोणाला पाहावा असे वाटत असेल तर तो निर्णय ज्याच्या त्याच्या विचारांवर साेडावा. आज मुंबईत काही थोडके लोक झुंडशाही पद्धतीने विरोध करतात, ते मात्र पूर्णपणे अयोग्य आहे. यामागे मनसेसारख्यांचे काही राजकीय हिशेब आहेत. पण त्यांचे कृत्य भारतीय लाेकशाहीला काळिमा फासणारे अाहे, हेदेखील करण जाेहरच्या निषेधाबराेबर लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना विरोध करायचा आहे, त्यांनी तो जरूर करावा; पण लोकशाहीच्या चौकटीत राहून, झुंडशाहीने नाही; यात भारताची शान अाहे. कायद्याने घालून दिलेली सगळीच बंधने झुगारायची आणि आम्ही सांगू तोच कायदा, तीच पद्धत असे एकेरीचे बोलणे आणि वागणे असेल तर पाकिस्तान व भारतात फरक काय राहील? काही प्रसारमाध्यमांची भूमिकादेखील वाहवत गेल्यासारखी आहे. काही जण झुंडशाहीचे समर्थन करणारी माहिती वारेमाप प्रसिद्ध करत आहेत, तर काही जणांची भूमिका ही पाक कलाकारांचे समर्थन करणाऱ्या बॉलीवूडमधल्या भावनेला फुंकर घालणारी आहे. देशभावनेचे प्रतिबिंब चित्रपटांच्या बाबतीत प्रगट होणे हे काही गैर नाही. कोणाला काही विरोधाचा सूर काढायचा आहे तो त्याने भारतीय लोकशाही, कायद्याच्या चौकटीत राहून काढला पाहिजे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे अावाहन करण्यात काही गैर नाही. त्यासाठी प्रचार करून लाेकांचे मन वळवण्यासही हरकत नाही, मात्र जर भारतीय जनतेला हा चित्रपट पाहायचाच असेल तर धाकदपटशाने जनतेला राेखणे हे अत्यंत चुकीचे अाहे. सरकारने याबाबत खंबीर भूमिका घेतली पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...