Home | Editorial | Agralekh | editorial m f hussain

अनवाणी अवलिया

divya marathi | Update - Jun 09, 2011, 11:29 PM IST

शृंगाराचे प्रतीक बनलेली स्त्री आणि वेग-ऊर्जेचे प्रतीक असलेला अश्व यांच्या एकत्रित परिणामातून साधलेला ‘हुसेन इफेक्ट’ भल्या-भल्यांना भुरळ पाडायचा.

 • editorial m f hussain

  शृंगाराचे प्रतीक बनलेली स्त्री आणि वेग-ऊर्जेचे प्रतीक असलेला अश्व यांच्या एकत्रित परिणामातून साधलेला ‘हुसेन इफेक्ट’ भल्या-भल्यांना भुरळ पाडायचा.
  ज्या लंडन शहराने वैश्विक प्रवाहांना जन्माला घालणा-या विविध विचारप्रवृत्ती आणि प्रतिभांना उदार मनाने आश्रय दिला, ज्या लंडन शहराने चार्ल्स डार्विनपासून कार्ल मार्क्सपर्यंत आणि आल्फ्रेड हिचकॉकपासून अ‍ॅना एरीपर्यंतच्या जगावर छाप सोडणा-या प्रतिभावंतांचा प्रेमाने सांभाळ केला, त्या दोन हजार वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या, वृत्ती-प्रवृत्तीने लिबरल अशा लंडन शहरातच चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी अखेरचा श्वास घ्यावा, हे हुसेन यांनी आयुष्यभर जपलेल्या बंडखोर नि मुक्त अशा प्रतिमेला साजेसेच होते. संतांची भूमी असलेल्या पंढरपूरच्या मातीत जन्मलेला, जगातल्या पाचशे प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींमध्ये समावेश झालेला, बंडखोरी आणि कला हे दोन्ही परस्परपूरक गुण अंगी असलेला हा अवलिया लौकिकार्थाने चित्रकार होता, पण त्याच्या विरोधात पोलीस दप्तरी, न्यायालयात दाखल गुन्हे आणि खटल्यांची यादीही तितकीच मोठी होती. ही विसंगती जितकी त्यांच्याशी जोडलेल्या घटना-प्रसंगांमध्ये होती, तितकीच ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही होती. उजळ कांती, सफेद दाढी, हातात मोठासा पेंट ब्रश अशी ओळख आणि ‘पिकासो आॅफ इंडिया' अशा शब्दांत गौरव झालेल्या हुसेन यांनी ९६ वर्षांच्या आयुष्यात जितकी वादळे स्वत:हून निर्माण केली, त्याहून अधिक अंगावरही घेतली. परंपरा, चौकटी मान्य नसलेला हा कलंदर मुळापासूनच इतरांपेक्षा वेगळा होता. म्हणूनच तो साहेबी आब-रूबाब आणि तोरा असलेल्या पंचतारांकित महालांतून अनवाणी वावरण्याची हिंमत दाखवायचा.
  सर्वसाधारणपणे चित्रकार चेहºयापासून चित्र रंगवण्यास प्रारंभ करतात. हुसेन मात्र करंगळीच्या नखापासून सुरुवात करून शोल्डर लाइन, हेड असे करत उजवीकडून सुरू केलेले चित्र डाव्या बाजूने येत पूर्ण करत असे. दाढी वाढवून खांद्याला झोळी लावून फिरणारा उपेक्षित अशीच चित्रकाराची प्रतिमा १९४०च्या दशकापर्यंत समाजात रूढ होती, पण हुसेन यांनी त्याला छेद दिला. त्यांनी स्वत:ची चित्रशैली निर्माण केली तसेच या झोळी लावून फिरणाºया, उपेक्षित वर्गात मोडणाºया चित्रकाराला प्रतिष्ठा, पैसा आणि प्रसिद्धीची दारेसुद्धा खुली करून दिली. त्याच सुमारास रझा, सुझा हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपमधील समवयस्क चित्रकार आपापला ठसा उमटवण्यास उत्सुक होतेच, पण भारतीय चित्रकलेला आणि चित्रकारांना जगभरात मान-मरातब आणि मान्यता मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला, तो हुसेन यांनीच. चित्रकार हा घोड्यावर स्वार होऊन नवनवीन क्षितिजे धुंडाळणाºया योद्ध्यासारखा असतो. कुणीही त्याला रोखू शकत नाही, याचे हुसेन हे मूर्तिमंत उदाहरण होते. कोणी कितीही टीका केली, तरीही भारतीय चित्रकलेच्या क्षेत्राला उद्योगाचे स्वरूप येण्यामागेही त्यांचे योगदान नाकारता येण्यासारखे नव्हते.
  एक चित्रकार म्हणून स्त्री प्रतिमांचे-शृंगाराचे हुसेन यांना असलेले आकर्षण विलक्षण असे होते. किंबहुना स्त्री हीच त्यांच्या चित्रांमागील प्रेरणा आणि ऊर्जा असल्याचेही त्यांनीच वारंवार जाहीर केले होते. हे स्त्री प्रतिमांचे आकर्षण जितके त्यांच्या चित्रांमधून दिसत होते, तितकेच त्यांच्या चित्रपटांमधूनही झळकत होते. आधी मॅडोना, माधुरी दीक्षित, मग तब्बू आणि अलीकडच्या काळात अमृता राव आदी अभिनेत्रींनी जणू त्यांना भुरळ घातली होती. ‘म्हातारवयात हे कसले उद्योग', या छद्मी टीकेकडे लक्ष न देता रंगांचे फटकारे मारणे त्यांनी थांबवले नव्हते. स्त्री प्रतिमेसोबतच अश्वांचाही त्यांनी प्रतीक म्हणून आपल्या चित्रांत मुक्तहस्ते वापर केला. शृंगाराचे प्रतीक बनलेली स्त्री आाणि वेग-ऊर्जेचे प्रतीक असलेला अश्व यांच्या एकत्रित परिणामातून साधलेला ‘हुसेन इफेक्ट' भल्या-भल्यांना भुरळ पाडायचा. हुसेन यांच्या अंगात बंडखोरी, बेफिकिरी आणि बेपर्वाई ठासून भरलेली असली तरी त्याला निश्चित अशा विचारांचे अधिष्ठानही असायचे. त्यातूनच चौकटीबाहेरची चित्रे-चित्रप्रदर्शने आकारास यायची. वादग्रस्त बनायची. कट्टरपंथीयांचा निषेध आणि रोष ओढवून घ्यायची. त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायची. परंतु विरोध झाला, हल्ला झाला, खुनाच्या धमक्या मिळाल्या म्हणून हुसेन आपल्या शैलीपासून ढळल्याचे एकही उदाहरण नाही. देशात भीषण दुष्काळ पडला होता. अमेरिकेतून अन्नधान्य आयात करण्याची नामुष्की ओढवली होती. शासकीय-प्रशाकीय यंत्रणा कोलमडली होती. राजकीय दिवाळखोरीला उधाण आले होते. समाजात अनागोंदीचे वातावरण तयार झाले होते. हे सगळे व्यक्त करण्यासाठी हुसेन यांनी अब्रू गेलेली भारतमाता चितारली. पण या चित्रामुळेच गदारोळ माजला.
  कट्टरपंथी धर्मांध संघटनांकडे त्यांचा चित्रांमागील विचार जाणून घेण्यासाठी वेळ नव्हता. पात्रताही नव्हती. त्यांच्याकडे होती ती केवळ हिंसेची भाषा. हुसेन जन्माने मुस्लिम असले तरीही त्यांचा खरा धर्म चित्रकला हाच होता. परंतु बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या आक्रस्ताळी हिंदुत्ववादी संघटनांसाठी त्यांचे मुस्लिम असणेच पुरेसे होते. चित्रांमागील विचार जाणून न घेता नव्वदी पार केलेल्या हुसेन यांना धमक्या देण्यातच खरा पुरुषार्थ असल्याचा त्यांनी स्वत:चा समज करून घेतला होता. उतारवयात नाइलाजाने देश सोडण्यास हुसेन यांना भाग पाडले होते. चित्रविषयक अज्ञान असलेल्या मायदेशातली सामाजिक-सांस्कृतिक असंवेदनशीलता सहन न झाल्याने कुवेतसारख्या मुस्लिम राष्ट्रांच्या आश्रयाला पुढे ते गेले.
  भारतीय सरकारला आणि कलाविश्वाला ही गोष्ट लांच्छनास्पद होती. अर्थात, कुवैतने आश्रय दिला तरीही लंडन-पॅरिससारख्या जागतिक कलापंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया शहरांकडेच त्यांचा अधिक ओढा होता. ते त्यांच्या कलास्वभावाला धरूनही होते. मात्र तेथेच त्यांचे अखेरचा श्वास घेणे हे सच्च्या भारतीय कलाप्रेमींच्या खºया अर्थाने जिव्हारी लागणारे आहे.

Trending