आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Militants Shot Her Nine Times, Asam, Bodo Terrorist

शांतता, अन्याय चालू आहे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-भूतान सीमेनजीक पश्चिम आसाममधील द्विमुगिरी गावातील २० ऑगस्ट रोजी घडलेली एक अत्यंत अमानुष घटना. या घटनेकडे देशाच्या सर्व मीडिया हाऊसकडून दुर्लक्षच झाले. साेळा वर्षाच्या प्रिया बासुमात्रे नावाच्या निरागस मुलीला जिने भविष्यात सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते, तिची नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या फुटीरवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दहशतवाद्यांनी पहिले प्रियाला बांबूने मारहाण केली. नंतर एका दहशतवाद्याने पाठीमागून प्रियावर दोन गोळ्या झाडल्या. नंतर पुढून दोन गोळ्या झाडल्या व नंतर तिच्या तोंडात गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांचा असा दावा होता की, प्रिया पोलिसांची खबरी असल्याने तिला ठार मारण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने पाच बोडो दहशतवाद्यांना ठार मारले होते. त्याचा बदला म्हणून दहशतवाद्यांनी ही कारवाई केली असे सांिगतले जात आहे. या दहशतवाद्यांनी प्रियाच्या मृत्यूची खबर पोलिसांपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून तिचे प्रेतही गावकऱ्यांना उचलण्यास मनाई केली होती. दहशतवाद्यांनी या संपूर्ण घटनेची व्हिडिओ क्लिप चित्रित करून नंतर ती स्थानिक वृत्तवाहिन्यांकडे पाठवली. दुसऱ्या दिवशी गावातल्या काही लोकांनी दहशतवाद्यांच्या दहशतीला न जुमानता प्रियाचा मृतदेह बैलगाडीतून रुग्णालयात नेला व नंतर पोलिसांपर्यंत या प्रकरणाची माहिती गेली. आसामच्या सरकारने प्रियाच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली व प्रियाला शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली असली तरी या घटनेमुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यात सरकारी यंत्रणांमध्ये ताकद नाही हे पुन्हा दिसून आले. आसाम गेल्या ३० वर्षापासून स्वतंत्र बोडोलँड चळवळीमुळे अशांत आहे. २००८ मध्ये बोडो दहशतवाद्यांनी रेल्वे, बस व बाजारपेठांमध्ये साखळी बाँबस्फोट घडवून १०० निष्पाप नागरिकांचे बळी घेतले होते. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या ३० वर्षांत बोडो दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सुमारे २०० नागरिकांचा बळी गेला आहे व ही समस्या स्थलांतर वन जमिनीवरच्या अतिक्रमणामुळे अधिक बिकट होत चालली आहे. प्रियाचे कुटुंब छोट्याशा वनजमिनीवर शेती करून आपली गुजराण करणारे एक गरीब कुटुंब होते. पण हे कुटुंबही दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरले.