आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’चे भूत (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे अवघे विश्व पंचमहाभूतांनी व्यापलेले आहे, या चिरंतन सत्याचा साक्षात्कार गेल्या काही दिवसांत दिल्लीकरांना झाला. येत्या लोकसभा निवडणुकीत तो साक्षात्कार सर्व देशाला होईल. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही ती पंचमहाभूते. परंतु ‘भूत’ ही संज्ञा लोकमानसात आणि लोकभाषेत अनेक अर्थांनी रूढ झाली आहे. ‘भूतदये’मधील भावना प्रेम, करुणा - आणि तीही सर्व प्राणिमात्रांबद्दल - अशी आहे. ‘भूतखेत’ या संज्ञेतील भूत मात्र मानगुटीवर बसणारे आणि आपल्याला दरडावणारे असते. पंचमहाभूतांतील ‘भूत’ म्हणजे मूलतत्त्व. त्यापैकी एक आप. म्हणजे पाणी. मात्र, दिल्लीच्या आणि देशाच्या मानगुटीवर ‘आप’च्या अवतारात बसलेले भूत आपल्याला मदत करण्यासाठी आले आहे की दरडावण्यासाठी, हे सांगणे कठीण आहे. बहुधा त्या भुतालाही नक्की माहीत नाही की त्याची नक्की भूमिका काय आहे! एक मात्र नक्की की, या ‘आप’रूपी भुताटकीने भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसलाही पूर्णपणे पछाडलेले आहे. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ‘घोस्ट स्टोरीज’ म्हणजे भूतकथा असतात. प्रेक्षकांना थरार आवडतो, त्यामुळे ते चित्रपट चालतात. त्याच सूत्रांना अनुसरून रामगोपाल वर्मांनी आपल्याकडे ‘भूत’ नावाचा भयपट काढला होता. आता अरविंद केजरीवाल यांनी आणलेले राजकीय भूत ‘आप’ - हे आपल्यावर दया करू शकते वा आपल्याला घाबरवूनही टाकू शकते. गेले काही दिवस या भुताने दिल्लीच्या हमरस्त्यावर जो थयथयाट केला, त्यामुळे केंद्र सरकारचेही हातपाय गळून गेले; परंतु या भुताचा खरा धसका घेतला आहे नरेंद्र मोदी व भाजपने.
तसे पाहिले तर भुताला परतवून लावण्याची शक्ती देवाच्या नावात असते. नरेंद्र हा तर देवरूप आणि भाजप तर वेदमंत्र जपणारा. लहानपणी भूत दिसले (वा तसा भास झाला) की रामाचे नाव घ्यायची आपल्याकडे प्रथा आहे. भित्र्या माणसाला नेहमी भुताचा भास होतो. म्हणूनच बहुधा भाजप रामनामाचा जप करीत असतो. भव्य राममंदिर बांधून भुताला कायमचा धडा शिकवण्याची ‘आयडिया’ त्यातूनच संघाला सुचली असावी. असो; पण भूत विविध अवतार घेऊ शकते. एकदा तर या भुताने लालूप्रसाद यादव यांच्या रूपाने रामाची रथयात्राच अडवली होती. आता ‘आप’च्या आकस्मिक राजकीय ‘अवतीर्णते’मुळेही संघ परिवाराच्या तंबूंमध्ये घबराट उडाली आहे. नरेंद्राने सोडलेल्या अश्वमेधाला या भुताने दिल्लीतच रोखले. डिसेंबरच्या आठ तारखेपर्यंत मोदींना वाटत होते की, 15 ऑगस्ट 2014 रोजी तेच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार. त्याचा सराव करण्यासाठी मोदींनी त्यांच्या काही व्यासपीठांची नेपथ्यरचना लाल किल्ल्याप्रमाणे करून घेतली होती. त्या नाटकाच्या रंगीत तालमी यशस्वी झाल्या होत्या. मुख्य प्रयोगाला काही महिने उरले होते; परंतु एकदम ‘आप’ नावाचे भूत अवतीर्ण झाले आणि त्याने दिल्लीच्या रस्त्यांवर थयथयाट सुरू केला. खरे म्हणजे असा थयथयाट, धिंगाणा, हैदोस घालून व्यवस्थेला वेठीस धरण्याची कला भाजपला जेवढी अवगत आहे, तेवढी कुणालाच नाही. संसदेत असो वा रस्त्यावर, मीडियासमोर असो वा नोकरशाहीत; संघ परिवार नेहमी त्यांची भूतनृत्ये सादर करीत असे. त्यात परिवार इतका तरबेज होता की ‘नच बलिये’ असो वा अन्य कोणतीही स्पर्धा; संघ सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणार, हे आता निश्चित झाले होते; परंतु ‘आप’चा भूतनृत्य संच एकदम स्पर्धेत उतरल्यामुळे मोदी संघ भयचकित झाला.
‘आप’चा संच नियमभंग करून नृत्यनियोजन करतो, संकेत पाळत नाही, नृत्यमंचाची जागा, नेपथ्य सर्व काही बदलतो; त्यामुळे त्याला बाद करावे, अशी मागणी मोदी संघ करू लागला. वस्तुत: संघ परिवाराचा विस्तार व विकास सर्व नियम व संकेत मोडूनच झाला होता. रथयात्रा असो वा बाबरी मशिदीचा विध्वंस करणारे तांडव असो, संसदेतून सभात्याग असो वा अध्यक्ष व सभापतींसमोर चालणारे हैदोस - गोंधळी नृत्य असो, संघाने कोणतेच नियम, संकेत कधीच पाळले नव्हते. तसे पाहिले तर केजरीवाल त्याच तालमीत तयार झाले होते. त्यांच्या रंगीत तालमी जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर झाल्या होत्या. बिरजू महाराज वा उदय शंकर यांच्याहीपेक्षा नृत्यपारंगत अशा अण्णा हजारे यांच्या पाठशाळेत केजरीवालांनी नृत्याने धडे घेतले होते. सुषमा स्वराज आणि किरण बेदी अशांनी तर त्या मैदानावर त्यांचे नृत्य दोन वर्षांपूर्वी सादर केले होते. असे सहशागीर्द आणि अण्णांसारखे उस्ताद असल्यावर केजरीवालांना कसलीच धास्ती नव्हती. विद्यार्थी असताना केजरीवाल व त्यांच्या चमूने पथनाट्य-नृत्याचे अनेक प्रयोग केले होते. ते त्यात इतके पारंगत झाले की बिचारे डोंबारी- ज्यांचे पोट अशा नाट्य-नृत्य-कसरतींवर अवलंबून असते - त्यांना धास्ती वाटू लागली. पुढे तर हा पथनाट्य-नृत्य गट ‘आप’ नावाचा पक्ष स्थापून थेट सत्तेच्या राजकारणातच उतरला. त्यांच्याही अपेक्षेबाहेर त्यांना यश प्राप्त झाले; पण त्या यशाला थोडी काळी जाळी लागली. ती कवचकुंडले होती काँग्रेसची; परंतु ती कवचकुंडले लावली तरच सरकार बनवणे शक्य होते. जर काँग्रेसने ती कवचकुंडले काढून घेतली तर ‘आप’ पंचमहाभूतांत विलीन होणार.
पुन्हा होणा-या निवडणुकांत इतक्या जागा मिळायची शाश्वती नाही. सरकार बनवले नाही तर ठपका येईल, जबाबदारी टाळण्याचा. जर सरकार बनवले तर काँग्रेसची कवचकुंडले घ्यावीच लागणार! अशा पेचात सापडलेल्या ‘आप’ने गेम करायचे ठरवले. काँग्रेसला अशा रीतीने अडचणीत आणायचे की ते कवचकुंडले काढून घेतील. मग सरकार पडेल; पण सरकार पडल्याचे ‘पाप’ मग ‘आप’वर येणार नाही. बदनाम काँग्रेस होईल आणि पुढील निवडणुकीत ‘आप’ स्वत:च्या जोरावर बहुमत प्राप्त करून निवडून येईल. म्हणून काँग्रेसला व केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेला स्वायत्तता मिळवून देण्याच्या मुद्द्यावरून केजरीवाल व त्यांचा पथनाट्य चमू रस्त्यावर उतरला. थंडी-पाऊस-वारा झेलून त्यांनी अराजक करायची धमकी दिली. प्रजासत्ताकाचे संचलन विसकटून टाकण्याचे इशारे दिले; पण काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नाही. माघारही घेतली नाही. दोन पोलिसांना रजेवर पाठवू, असे सांगितले आणि त्या काडीचा आधार घेऊन हा गटांगळ्या खाऊ लागलेला गट तरंगू शकला. आता आव्हान आहे ते नाट्य-नृत्य करण्याचे नाही, तर सरकार चालवण्याचे. ख-या नाटकाची सुरुवात आता होणार आहे!