आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागतार्ह "ब्रेन ड्रेन' (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील नेमका कोणता समूह चांगले जीवन जगतो आहे, या प्रश्नाची उत्तरे वेगवेगळी असली तरी जगातील बहुतांश लोकांना अमेरिकन समाजजीवन चांगले वाटते. त्यामुळेच अमेरिकेत जाण्यासाठी तरुण पिढीत जगभर स्पर्धा दिसून येते. भारतातील तरुणही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर पर्यटनासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या सारखी वाढतेच आहे. तेथील भारतीय समूह २० लाखांच्या घरात गेला असून त्याची वाढ भविष्यात वेगाने होणार आहे, अशीच सर्व लक्षणे सध्या दिसू लागली आहेत. भारतातील प्रज्ञावंत तरुणांनी अमेरिकेत जाऊ नये, त्यांनी मायभूमीतच शिक्षण घ्यावे आणि येथेच संशोधन करावे, असे व्यासपीठांवरून कितीही म्हटले जात असले तरी अमेरिकन दूतावासासमोर दररोज लागणाऱ्या रांगा कमी झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालाने त्यावर आणखी प्रकाश टाकला आहे. भारतातील एक लाख ३४ हजार २९२ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असून त्यात गेल्या वर्षभरात २८ टक्के इतकी प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. चीनला वगळल्यास जगातील इतर एकाही देशाचे एवढे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत नाहीत! पण केवळ संख्या हे भारतीय विद्यार्थ्यांचे भांडवल नाही. जगाला पुढे नेणाऱ्या अभियांत्रिकी, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान अशा शाखांत त्यांचे प्रमाण ६५ टक्के इतके प्रचंड आहे. या शाखांत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना अमेरिकेत करिअरच्या उत्तम संधी मिळतात आणि साहजिकच भारतीय मुले तेथेच राहणे पसंत करतात. त्याचाच परिणाम म्हणजे उच्च शिक्षण घेतलेला, श्रीमंत, मालमत्ता बाळगणारा आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेला समूह अशी तेथे भारतीय समूहाची ओळख झाली आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. हा दर तेथे गंभीरपणे घेतला जातो आणि त्यावर शेअर बाजारही डोलतो. गेले काही दिवस तो दर १० वरून ६ टक्के खाली आल्याने अर्थव्यवस्था सुधारल्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे अमेरिकेत भारतीय मुलांचे पुन्हा स्वागत केले जाते आहे. या सर्व अहवालात एक उणी बाजूही समोर आली आहे, ती म्हणजे भारतात स्त्री-पुरुष शिक्षणात जी विषमता आहे, ती प्रतिबिंबित झाली आहे. अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांत दोन तृतीयांश मुले तर एक तृतीयांश मुली असे व्यस्त प्रमाण आहे. ही उणीव दूर करण्याचे काम अर्थातच भारतीय पालकांनी करावयाचे आहे.

अमेरिकेखालोखाल ब्रिटन, ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. ब्रिटनने गेली काही वर्षे परदेशी विद्यार्थ्यांवर निर्बंध लागू केल्याने तसेच शिक्षण महाग केल्याने तेथे जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण तब्बल ४४ टक्क्यांनी घटले तर ऑस्ट्रेलियामध्ये वर्णभेदावरून भारतीय विद्यार्थ्यास झालेल्या मारहाणीमुळे तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले होते. पण चांगले शिक्षण देऊन जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या देशात बोलावून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली अर्थव्यवस्था भक्कम करून घेण्याचा व्यावसायिक शहाणपणा या देशांत चांगलाच रुजला आहे. त्यामुळेच ब्रिटनने आता या प्रश्नावर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत, चीन आणि दक्षिण कोरिया या आशियाई देशांचेच उदाहरण घ्यायचे तर या देशांच्या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला शैक्षणिक शुल्कापोटी एक लाख ३२ हजार कोटी रुपये मिळतात, तर ते तेथे करत असलेल्या दैनंदिन खर्चाचा विचार केल्यास ७५ हजार कोटी रुपयांचे व्यवहार त्या देशात होतात. या व्यावसायिक बाजूपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे तो अमेरिकेतील शिक्षणाचा उत्तम दर्जा. जगात सर्वाधिक चांगली विद्यापीठे असो, पेटंट, संशोधने असो, खेळांच्या स्पर्धा असो की सार्वजनिक सेवासुविधा असो, अमेरिकेने त्यात अव्वल स्थान मिळवले आहे. जगातील जे जे चांगले असेल त्याचा खुल्या मनाने स्वीकार करून अमेरिकेने साऱ्या जगाला आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले आहे आणि त्यामुळेच अमेरिका आज संधी देणारी भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीला जगातल्या प्रज्ञावंतांनी मायभूमी करावे, असे प्रयत्न जाणीवपूर्वक करते. अशा अमेरिकेत केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर राहण्यासाठी जाता यावे, यासाठी जगभर स्पर्धा असणे, हे साहजिकच आहे. या स्पर्धेत भारतीय मुले कोठे कमी पडत नाहीत, ती अमेरिकन शिष्यवृत्त्या मिळवून, कर्ज काढून आणि तेथे जे प्रमाण मानले जाते, त्याचा स्वीकार करून तेथे जाण्यात आघाडीवर आहेत, याचे म्हणूनच स्वागतच केले पाहिजे. अमेरिकेत फक्त श्रीमंतांची मुले जातात, हा गैरसमजही मनातून काढून टाकला पाहिजे. कारण अमेरिकेत जाणाऱ्या मुलांत मध्यमवर्गातील मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. अर्थात अमेरिकेसारखे चांगले शिक्षण आणि चांगली व्यवस्था आपल्या देशात का निर्माण होत नाही, असा नेहमीचा प्रश्न विचारलाच पाहिजे आणि ती तशी निर्माण व्हावी म्हणून प्रयत्नही केले पाहिजेत. मात्र ही एक प्रक्रिया आहे याचेही भान ठेवले पाहिजे.