आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञ नव्हे, कृतघ्न(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलबिहारी वाजपेयींच्या 89व्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, भाजपच्या ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांना त्यांची आठवण झाली! डॉ. मनमोहन सिंग यांनी वाजपेयींची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, हे रीतिरिवाजानुसार झाले. नाही तरी पंतप्रधान जितक्या वेळा वाजपेयींचा आदरयुक्त नामोल्लेख करतात, तितक्या वेळा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीसुद्धा करीत नाहीत. वाजपेयी पंतप्रधान असताना 2001मध्ये 13 डिसेंबर रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या अगोदर दोनच वर्षे, डिसेंबर महिन्यातच (24 डिसेंबर 1999) इंडियन एअरलाइन्सचे विमान (आयसी-814) पाकिस्तानच्या हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाने हायजॅक केले होते. एकूण 176 प्रवासी सात दिवस यमाच्या दरबारात हजर होते. एक जण ठार मारला गेल्यानंतर उरलेल्यांनी जगण्याची आशा सोडून दिली होती. त्या भीषण घटनेची आठवण सध्या कुणालाच नाही. साधारणपणे अशा भीषण घटना वारंवार लहान पडद्यावर दाखवून टीव्ही चॅनल्स आक्रोश करतात; पण वाजपेयींच्या 75व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या त्या 1999च्या दहशतवादी हल्ल्याचीही कुणाला (इंग्रजी-हिंदी व मराठी चॅनल्सना) आठवण झाली नाही.
ज्याप्रमाणे 2001च्या डिसेंबरमधल्या संसदेवरच्या हल्ल्याचे विस्मरण गळेकाढू आणि ऊरबडव्या मीडियाला झाले; तसेच या हायजॅकचेही! ते विमान हायजॅक करणा-या तीन नामचीन दहशतवाद्यांना- मुश्ताक अहमद झरगार, अहमद ओमर सयीद शेख आणि मौलाना मसूद अझर- (अर्थातच) पंतप्रधानांच्या आदेशावरून भाजपचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग यांनी स्वत: कंदहार येथे नेऊन तालिबान्यांच्या स्वाधीन केले. याच दहशतवाद्यांनी पुढे डॅनिएल पर्ल या अमेरिकन पत्रकाराचा शिरच्छेद केला आणि अमेरिकेच्या 9/11च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर/ पेंटगॉनवरील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रसंचालन केले. हे हायजॅकिंग आणि त्यानंतरचा संसदेवरचा हल्ला हा काँग्रेसच्या राजवटीत झाला असता तर नरेंद्र मोदींनी आणि संघ परिवाराने त्या हिंस्र घटनांना वारंवार लोकांच्या नजरेसमोर आणले असते. सीमेवर ‘नेमेचि’ होणा-या चकमकींवर केवढा उन्मादी मेलोड्रामा भाजपवाले आणि मीडिया करतो, हे आपण गेल्या तीन वर्षांत पाहिले आहे. मग या दहशतवादी घटनांचे विस्मरण मोदींच्या राष्ट्रभक्त अनुयायांना का होते? कुणी म्हणेल, की वाजपेयींच्या 89व्या वाढदिवशी या अभद्र घटनांची आठवण कशाला काढायची? परंतु त्याचे कारण हे की, ते हायजॅकसुद्धा वाजपेयींना वाढदिवशीच ‘भेट’ द्यायचे म्हणून दहशतवाद्यांनी ठरवले होते. त्या विमानाचे कॅप्टन देवी शरण आणि मुख्य फ्लाइट अ‍ॅटेंडंट कॅप्टन अनिल शर्मा या दोघांच्या मुलाखती घेण्याची ‘आयडिया’ कोणत्याही मीडियाला सुचली नाही? कॅप्टन देवी शरण यांनी त्या भीषण प्रसंगावर ‘फ्लाइट इनटू फिअर- अ कॅप्टन्स स्टोरी’ हे पुस्तक लिहिले आहे. कोणत्याही वृत्तपत्राला वा चॅनलला त्यांची मुलाखतही का घ्यावीशी वाटली नाही? हे प्रश्न कदाचित अप्रस्तुत वाटतील; परंतु मीडियाला व भाजपला त्या घटनांचे विस्मरण व्हावे, याचे राजकीय कारण आहे. सीमेवर चकमक होताच तमाम मीडिया आणि भाजप तारस्वरात मागणी करू लागतात की, ‘पाकिस्तानबरोबरच्या चर्चा-वाटाघाटी बंद करा, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, घनघोर युद्ध करावे लागले तरी हरकत नाही; पण आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा सवाल आहे’ वगैरे वगैरे.
अटलबिहारी वाजपेयींनी त्या हिंस्र घटनांची पार्श्वभूमी असतानाही पाकिस्तानच्या जनरल मुशर्रफ यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू ठेवल्या. भारत-पाकिस्तानमध्ये संवादाचे व सौहार्दाचे वातावरण राहील, अशी वारंवार ग्वाही दिली. लाहोर बस यात्रा अगोदर झालीच होती, त्यात सौहार्दाचा धागा वाजपेयींनी मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी वापरला. वाजपेयींच्या या भूमिकेमुळे उग्र हिंदुत्ववादी (ज्यांच्यात नरेंद्र मोदी, प्रवीणचंद्र तोगडिया आदीही होते) संतप्त झाले. त्यांनी वाजपेयींना ‘बोटचेपे’, ‘धर्मद्रोही’ अशी शेलकी विशेषणे कधी खासगीत, कधी जाहीरपणे वापरायला सुरुवात केली. अप्रत्यक्षपणे लालकृष्ण अडवाणीही वाजपेयींच्या बदनामी मोहिमेत सामील झाले. गुजरातमध्ये 2002मध्ये जे मुस्लिमांचे हत्याकांड झाले, त्याचा वाजपेयींनी ‘देशाला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला. नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा; कारण त्यांनी ‘राजधर्माचे’ पालन केले नाही, असे वाजपेयी जाहीरपणे म्हणाले. ‘राजधर्मा’त सर्व धर्म-जातींच्या माणसांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावर असते, असे वाजपेयींचे म्हणणे होते. जेव्हा वाजपेयी हे मोदींच्या प्रशासनाला ‘कलंक’ म्हणून संबोधत होते, तेव्हा अडवाणी मात्र मोदींना ‘सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री’ असा किताब देत होते. पुढील दोन वर्षे संघ परिवाराने वाजपेयींविरोधात कुजबुज आघाडी उघडली होती; पण वाजपेयी लोकप्रिय होत होते ते त्यांच्या संयमामुळे.
मोदी हे या संयमी धोरणाच्या विरोधात होते आणि म्हणून वाजपेयींच्याही विरोधात. त्याच गुजरातच्या दंगलीच्या उग्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तोगडिया प्रभृतींनी अयोध्या येथे एक लाख कारसेवक जमा केले. 6 डिसेंबर 2002रोजी त्यांना बाबरी मशिदीचा विध्वंस केल्याचा दिवस साजरा करायचा होता. परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. पक्षात आणि संघात वाजपेयींविरोधात कारस्थान सुरू होते. वाजपेयींचा राजीनामा घेऊन अडवाणींना पंतप्रधान करायचे, ते कारस्थान होते. ते कारस्थान वाजपेयींच्या लोकप्रियतेमुळे फसले; पण संघाच्या अंतर्गत झालेल्या तहानुसार अडवाणींना उपपंतप्रधान केले गेले- वाजपेयींवर ‘अंकुश’ ठेवण्यासाठी. तेव्हापासून अडवाणी हे भाजपचे 2004चे पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाऊ लागले; पण 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. आता अडवाणींची अडगळ नको आणि वाजपेयींचे तर नावही नको, असा पवित्रा संघाने व पक्षाने घेतला; परंतु आता पाच महिन्यांनी निवडणुका होणार, हे लक्षात घेऊन भाजपचे तमाम ज्येष्ठ-कनिष्ठ पुढारी वाजपेयींना कुर्निसात करायला गेले. तो कुर्निसात कृतज्ञतेचा नव्हता, तर 1999 ते 2004 या काळात त्यांच्याशी केलेल्या कृतघ्नतेचा चेहरा लपवण्यासाठी होता.