आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial On Australia V New Zealand: Historic Pink ball Test

गुलाबी रंगत (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कला आणि क्रीडेचा आस्वाद हाच मुळी तृप्त पोटांचा आणि फावल्या वेळचा विषय. त्यात पुन्हा खेळ क्रिकेटचा असेल तर मग बोलायलाच नको. हाताशी वेळच वेळ हवा. एखाद्या निवांत शनिवारी किंवा रविवारी तुडुंब इंग्लिश ब्रेकफास्ट करावा. डोक्यावर हॅट, डोळ्यावर सनग्लासेस, टाय-कोट आणि त्यावर स्वेटर चढवून मैदान गाठावे. कोवळ्या उन्हात बियर किंवा वाइनचा चषक हाती असू द्यावा; मग दिवसभर कशाचीही चिंता न करता क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटावा. क्रिकेटला असा साहेबी थाट यावा यात नवल नाही. कारण त्याचा शोधच मुळी ब्रिटनमध्ये लागला. हा खेळ साहेबांचाच असल्याने त्याला आपसूक ‘जंटलमन्स गेम’ अशी प्रतिष्ठाही मिळाली. तेव्हा खेळाचे व्यावसायिकीकरण झाले नसले तरी हार-जितीची खुन्नस होतीच. कोणत्याही खेळाचा आत्माच तो असतो. इंग्लंडच्या पंखाखाली असणाऱ्या सर्वच ‘कॉमनवेल्थ’ देशांमध्ये क्रिकेटने हातपाय पसरले आणि चुरस वाढली. इतकी की दोन देशांमधल्या वर्चस्वाचा फैसला बावीस यार्डांच्या खेळपट्टीवर होऊ लागला. खेळाचे नियम ठरले. ब्रिटिश जन्मदाते असल्याने या नियमांना परंपरेचे कोंदण लाभले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला अधिकृत कसोटी सामना सन १८७७ मध्ये खेळला गेला. दोन महायुद्धांचा काळ वगळता सत्तरच्या दशकापर्यंत कसोटी क्रिकेटची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच गेली. पाच दिवसांचे सामने मैदानावर ज्या उत्साहात पाहिले जात तितक्याच उत्साहात त्यांची रेडिओ कॉमेंट्री आणि वर्तमानपत्रांतली वर्णनेसुद्धा जगभर चवीने ऐकली-वाचली जाऊ लागली. यानंतर टप्पा होता क्रिकेट संथ झाल्याचा.फुटबॉल, टेनिस या दोन-तीन तासांत संपणाऱ्या खेळांची स्पर्धा क्रिकेटला जाणवू लागली होती. अनिर्णित राहणाऱ्या सामन्यांमुळे क्रिकेट रटाळ ठरू लागले होते. बदल आवश्यक होता. सत्तरचे दशक उजाडताना पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला गेला. चार दशकांतच हे दिवसभराचे क्रिकेटसुद्धा कंटाळवाणे वाटू लागले आणि ट्वेंटी-ट्वेंटीचा जमाना आला. दरम्यान, खेळाडूंचे रंगीबेरंगी कपडे, रंगीत स्टंप, दिवस-रात्रीचे क्रिकेट, मैदानात चिअर लीडर्स असा सगळा मसाला वेगवेगळ्या टप्प्यांवर क्रिकेटमध्ये येत गेला. केवळ बॅट-बॉलमध्ये रंगणारी चुरस प्रेक्षकांना मैदानात बांधून ठेवेलच याची खात्री न उरल्याने हे बदल होत गेले. श्रोते-प्रेक्षकांचा आश्रय नसेल तर कला-क्रीडेचे मरण निश्चित असते. हल्लीच्या ‘फास्ट’ युगात पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटसाठी वेळ काढणे क्रिकेटच्या सच्च्या चाहत्यालासुद्धा जमेनासे झाले आहे. विशेषतः भारतीय उपखंडाबाहेर कसोटीच काय, एकदिवसीय सामनेसुद्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जाऊ लागले आहेत. साहजिकच प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी काही क्लृप्त्या आवश्यक होत्या. प्रेक्षकांची संख्या रोडावू लागल्याने जाहिरातदार-प्रायोजकांनीही काढता पाय घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये बदल झाला पाहिजे, हा आग्रह बाजारपेठीय अर्थव्यवस्थेकडून लादला जात होता.

यावर दोन-तीन वर्षांचे मंथन झाले. अखेरीस क्रिकेटच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील मजेदार बदल पाहण्यास मिळाला. पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट चक्क दिव्यांच्या प्रकाशाखाली खेळले जाऊ लागले आहे. हा बदल क्रिकेट रसिकांसाठी आनंददायी आहे. दिवसभराचे कामधाम संपवून संध्याकाळी मैदानात सहकुटुंब बसून क्रिकेटचा आनंद लुटावा, अशी व्यवस्था आता झाली आहे. दुपारच्या भोजनानंतर हे सामने सुरू होणार असल्याने पहिला ‘ब्रेक’ चहापानाचा असणार आहे. हा बदलसुद्धा आरामशीर क्रिकेटसाठी सुखदच आहे. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये मध्यमवर्गीय, नोकरदारांची संख्या सर्वाधिक आहे. या मंडळींसाठी प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट सोयीचे आहे. त्यांच्याकडून या बदलाचे स्वागत कसे होते हे पाहावे लागेल. कसोटी क्रिकेटची वेळ बदलल्याने काही तांत्रिक बदलही करावे लागले. लाल किंवा पांढऱ्या रंगाचा चेंडू जुना झाल्यानंतर कृत्रिम प्रकाशात नीट दिसत नसल्याची खेळाडूंची तक्रार होती. म्हणून चेंडूचा रंग गुलाबी झाला. यामुळे क्रिकेट अधिक देखणे झाले आहे. खत्रुड चेहऱ्याने फलंदाजाच्या अंगावर वेगाने धावून जाणारे गोलंदाज आता गुलाबी चेंडूमुळे काहीसे प्रेमळ वाटू लागतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘रिकामटेकड्यासारखं दिवसभर आपलं क्रिकेट,’ या कुचाळकीतूनही क्रिकेट रसिकांची सुटका होणार आहे. दुपारच्या चहानंतर क्रिकेटचे मैदान गाठायला सहसा कोणी आक्षेप घेणार नाही. संध्याकाळी घरात बसून टीव्हीच्या पडद्यावर आनंद लुटण्याची सोयही दिवसरात्रीच्या सामन्यांमुळे मिळते. कसोटी क्रिकेटचे तारुण्य कायम ठेवण्यात ही ‘गुलाबी’ टवटवी यशस्वी ठरली तर क्रिकेटवरचे बाजारपेठेचे प्रेमही टिकून राहील. क्रिकेटच काय, पण कोणताच खेळ आता मनोरंजनापुरता उरलेला नाही. खेळाचे रूपांतर ‘इंडस्ट्री’त झाले आहे. परिणामी ज्याच्यामुळे गर्दी खेचली जाईल, गर्दी टिकेल ते-ते बदल अनिवार्य आहेत. गुलाबी गोंडसपणामागचे सत्य हे आहे.