आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial On Bacha Khan University Terrorists Attack

कारस्थानी हल्ले! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या चारसड्डा येथील बाचा खान विद्यापीठाच्यासंकुलात घुसून बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका प्राध्यापकासह सुमारे २१ जण ठार झाले. या अतिरेक्यांच्या क्रौर्याची परिसीमा इतकी की त्यांनी बेछूट गोळीबार करताना एका विद्यार्थ्यालाही सर्वांसमक्ष डोक्यात गोळी घालून ठार मारले. बाचा खान विद्यापीठावर झाले तसे हल्ले झाले की दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा, नाही तर मदत रोखू, असे इशारेही अमेरिका पाकिस्तान सरकारला देत राहते; परंतु पाकिस्तानने अमेरिकेचे पाणी जोखले आहे. आशियामध्ये अमेरिकेला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पाकिस्तानचा व्यवस्थित वापर करून घ्यायचा असतो त्याची पुरेपूर किंमत पाकिस्तान वसूल करीत राहतो. बाचा खान विद्यापीठावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-पाकिस्तान या बंदी घातलेल्या संघटनेच्या गिदर गटाने स्वीकारली आहे. तो हल्ला याच संघटनेच्या दहशतवाद्यांनी केला काय हे पुढे तपासात उघड होईलच; पण यानिमित्ताने पुन्हा एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली की, इस्लामी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवरच हा भस्मासुर आता उलटत आहे. याचे कारण पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांमध्ये आपापसात तीव्र स्पर्धा आहे. ज्या दहशतवादी गटांना आयएसआयचा पाठिंबा आहे त्यांचा द्वेष करणारे इतर दहशतवादी गट जगाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सशस्त्र हल्ले चढवतात. कधी ते सीमा ओलांडून भारतात हल्ले करतात, तर कधी पाकिस्तानच्या आदिवासी भागातील वस्त्या किंवा शिक्षण संस्थांना लक्ष्य बनवले जाते. बाचा खान विद्यापीठाच्या हल्ल्याच्या निमित्ताने स्मरण झाले ते पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर १६ िडसेंबर २०१४ रोजी तेहरिक-ए-तालिबानच्याच दहशतवाद्यांनी चढवलेल्या सशस्त्र हल्ल्याचे. आठ ते सतरा वर्षे वयोगटातील १३२ विद्यार्थ्यांसह १४१ निरपराध व्यक्तींची या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. पेशावरच्या शाळेवर हल्ला करणारे सगळे दहशतवादी हे विदेशी (अरब देश, चेचेन्या अफगाणिस्तानचे रहिवासी) होते. बाचा खान विद्यापीठावर हल्ला करणारे दहशतवादीही विदेशीच असावेत, असाच पाकिस्तानी तपास यंत्रणांचा कयास आहे. भारतव्याप्त काश्मीरमधील पठाणकोट हवाई दल तळावर पाकिस्तानातील जैश-ए-मोहंमद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी गेल्या दोन जानेवारी रोजी जो सशस्त्र हल्ला चढवला होता त्यामुळे भारत पाकिस्तान संबंधात अजून कटुता आली आहे. पठाणकोट हल्ल्यामागे मौलाना मसूद अझर हाच सूत्रधार असल्याचा भारताचा दावा असून त्याला अटक करण्याची कारवाई अद्यापही पाकिस्तानने केलेली नाही. मसूदला आमच्या ताब्यात द्यावे, अशी भारताची कधीपासूनची मागणी आहे; पण पाकिस्तान दाद लागू देत नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लाहोर येथे दाखल झाले. या मोदींच्या भेटीमुळे पाकिस्तान-भारत संबंधात थोडासा गोडवा निर्माण होईल, अशी अपेक्षा असतानाच त्यानंतर लगेचच पठाणकोटवर दहशतवादी हल्ला झाला. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. पूर्वी वाजपेयी शरीफ यांची सदिच्छा भेट होत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसवत होते. त्यातूनच पुढे कारगिलचे युद्ध भडकले होते. या सगळ्या घडामोडींमध्ये आयएसआय पडद्याआडून महत्त्वाची भूमिका बजावत असते. बाचा खान विद्यापीठावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाचेही गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान सरकारशी फाटलेले आहे. असे अनेक नाराज दहशतवादी गट पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांना सक्रिय पाठिंबा देणाऱ्या आयएसआयने त्या देशात तसेच काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी मुजाहिदीनांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे पैसा पुरवणे सुरूच ठेवले आहे. काबूल येथे जुलै २००८ रोजी भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आयएसआयच्या पाठिंब्यानेच झालेला होता. भारत, रशिया, चीन, इस्रायल, अमेरिका, ब्रिटन नाटोचे इतर सदस्य देश यांच्या भूभागात सक्रिय असलेल्या इस्लामी दहशतवाद्यांना आयएसआयची छुपी मदत मिळते, असे अमेरिकेच्या एका अहवालातच म्हटले आहे. काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया करता येणे शक्य नाही हे पाहून आयएसआयने पंजाबमधील फुटीर शक्तींना पुन्हा पंखाखाली घेतले आहे. पाक लष्कर आयएसआयवर तेथील सरकार अंकुश ठेवू शकत नाही. त्यातूनच मिळालेल्या मोकळ्या रानातच वणवा पेटला आहे. शेजारी राष्ट्र म्हणून त्याची झळ भारतालाही बसणे अटळ आहे.