आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वस्थ बांगलादेश (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशमधील सध्याची राजकीय अस्थिरता येत्या चार महिन्यांत (जेव्हा भारतामध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा) अराजकाचेही रूप धारण करू शकते. कदाचित या देशामध्ये यादवीही होऊ शकते. या अस्थिरतेला तेथील इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना जमात-ए-इस्लामीचे खूनसत्र आणि या कट्टरतावादाला राजकीय बळ देणा-या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) विखारी राजकारणही मुख्यत: कारणीभूत आहे. दोन दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन या निवडणुकीत सत्ताधारी शेख हसीना यांच्या अवामी लीगने 147 जागांपैकी 104 जागांवर विजय मिळवला व उरलेल्या 127 जागांवर विरोधी पक्ष नसल्याने या जागाही जिंकल्या, पण या निवडणुका हंगामी सरकार स्थापन करून घ्याव्यात; अन्यथा या निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल, अशी धमकी बेगम खालेदा झिया यांच्या बीएनपीने दिली होती, पण शेख हसीना यांनी हंगामी सरकारची मागणी धुडकावत निवडणुका घेतल्या. या निवडणुकीवर अर्थातच बीएनपीचा बहिष्कार असल्याने राजकीय अस्थिरता पसरत गेली. या निवडणुका शांततेत होऊ नयेत, म्हणून बीएनपीने जमात-ए-इस्लामीच्या मदतीने देशभर हिंसाचार, रक्तपाताचे राजकारण सुरू केले होते. गेले दोन महिने बीएनपीचे हजारो समर्थक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून देशाच्या कानाकोप-यात जाणारी रसद रोखून धरत होते.
शेख हसीना यांच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचे हे प्रयत्न होतेच; पण या अस्थिरतेच्या वातावरणात त्यांनी कट्टरतावादी जमात-ए-इस्लामी या पक्षालाही सक्रिय केले. गेल्या वर्षीच शेख हसीना यांनी 1971 च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान तत्कालीन पाकिस्तान लष्कराला मदत करणा-या व हिंसाचाराला जबाबदार असणा-या जमात-ए-इस्लामी पक्षाच्या बड्या नेत्यांवर खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ही घटना बांगलादेशच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. कारण जमात-ए-इस्लामीने आपल्या नेत्यांना शिक्षा झाल्यानंतर देशभर खूनसत्र आरंभले होते. जाळपोळ, हिंसाचार आणि दहशतवाद यांच्या जोरावर या पक्षाने सामान्य बांगलादेशी नागरिकांचे जीवन हैराण केले होते. जमात-ए-इस्लामीच्या या दहशतबाजीला आवर घालावा म्हणून व या संघटनेच्या नेत्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून गेल्या वर्षी ढाक्याच्या ऐतिहासिक शाहबाग चौकात सुमारे 25 लाखांहून अधिक नागरिकांनी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनात सामील झालेले बहुसंख्य तरुण होते व 90 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सेक्युलर राजवट असावी, अशी मागणी ते करत होते. तसेच या ऐतिहासिक आंदोलनात बांगलादेशमधील मध्यमवर्ग, साहित्य-कला-चित्रपट क्षेत्रातील कलावंत, मजूर, कष्टकरी आणि शेतकरी स्वयंस्फूर्तीने सामील झाला होता. हे आंदोलन ख-या अर्थाने बदलत्या बांगलादेशचे चित्र होते. सामान्यांच्या निर्भयपणे जगण्याच्या अपेक्षा त्यातून व्यक्त झाल्या होत्या. त्यामध्ये राजकारण्यांविषयी तुच्छता नव्हती, तर विश्वास होता. राज्यघटना बरखास्त करावी, अशी मागणी नव्हती, तर ही राज्यघटना अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षा होती. बांगलादेशच्या मीडियानेही जमात-ए-इस्लामीच्या राजकारणाच्या विरोधात संघटित भूमिका घेतल्याने हे आंदोलन पुढे देशभर वणव्यासारखे पसरत गेले.
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळून 40 वर्षे झाली असताना तेथे गेल्या दोन-तीन वर्षांत निर्माण होणारा फॅसिझम अर्थातच चिंतेचा विषय होता. (भारतातही मोदींच्या रूपाने फॅसिझम याच काळात मूर्त रूप घेऊ लागला.) बांगलादेशची सेक्युलर वीण जमात-ए-इस्लामीच्या विखारी राजकारणामुळे उद्ध्वस्त होत असताना त्यात आणखी आग ओकण्याचे काम बेगम खालेदा झिया यांच्या बीएनपीने सुरू केले, हा बांगलादेशच्या एकात्मतेला जबर धक्का होता. त्यातच खालेदा झिया यांच्या पक्षाची भूमिका नेहमीच भारतविरोधी राहिलेली आहे. या विरोधासाठी त्यांचा पक्ष जमात-ए-इस्लामी पक्षाला हाताशी धरतो. याअगोदर झिया यांच्या कारकीर्दीत जमात-ए-इस्लामी त्यांच्या आघाडीत सामील झाला होता; पण या पक्षाचे राजकीय बळ फारसे नव्हते. आता मात्र या संघटनेचे तरुण कार्यकर्ते गावागावांत लोकांना धमकावण्याचे काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांत जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी निल्फामारी, रंगपूर, दिमाजपूर, चितगाव, जेस्सोर या महत्त्वाच्या शहरांत आपला प्रभाव प्रस्थापित करून सुरक्षा दलांवरही हल्ले केले होते. हे सर्व राजकीय वातावरण वेगाने तापवण्यासाठी बेगम खालेदा झिया यांनी सातत्याने शेख हसीना यांच्या राजवटीवर भ्रष्टाचार, घराणेशाही, प्रशासनाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले. या कोंडीचा आणखी एक प्रयत्न म्हणजे निवडणुकांवर बहिष्कार. आता सत्तेवर पुन्हा निवडून आल्यानंतरही शेख हसीना यांनी झिया यांच्याशी चर्चेला येण्याचे आवाहन केले आहे.
बेगम खालेदा झिया दहशतवाद व हिंसेचा मार्ग सोडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही जाहीर आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी ही चर्चा सफल झाल्यास पुन्हा निवडणुका घेण्याचीही तयारी दाखवली आहे, पण हे राजकीय नाट्य लगेच शमेल, अशी परिस्थिती बांगलादेशमध्ये दिसत नाही. कारण शेख हसीना यांना सेक्युलर बांगलादेश निर्माण करायचा आहे व तेथे त्यांना इस्लाम धर्माचा हस्तक्षेप नको आहे. बांगलादेशची न्यायालयेही हसीना यांच्या बाजूची आहेत, पण झिया यांना इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे. शेजारील भारताला बांगलादेशमध्ये अस्थिरता नको आहे व तेथील जातीयवादी शक्तींचा उदय भारताच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू शकतो. भारतामध्ये येत्या चार महिन्यांनी लोकसभा निवडणुका होणार असल्याने नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यास हे वातावरण अधिकच तापू शकते. पाकिस्तान निदान वरवर तरी शांत होत असताना भारत व बांगलादेशमधील राजकीय वातावरण मात्र अधिक स्फोटक होत चालले आहे.