आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साक्षात्कारी अडवाणी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचेही वयोमान 87 वर्षे आहे. संघाच्या मुशीतून अडवाणी तयार झाले आणि संघाला आपल्या राममंदिर यात्रेतून त्यांनी भारतीय राज्यशकट हाती घेण्याची शक्ती मिळवून दिली. या देशाला हिंदू राष्ट्रात परावर्तित करणे हे समान उद्दिष्ट असताना अडवाणींच्या ‘ब्लॉग’च्या निमित्ताने असो, की भाजपच्या ‘कमल संदेश’ या मुखपत्राच्या निमित्ताने असो, आज संघ व अडवाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र जनतेत गेले आहे. काँग्रेसमध्ये जी सुंदोपसुंदी सुरू आहे ती पाहता आता 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातात हिंदुस्थानाचा लगाम आला, की हा लगाम नक्की कोणाच्या हाती असावा यासाठी पक्षांतर्गत तुंबळ असे युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या कर्माने गाळात जात असताना भारतीय जनता पक्षाला उभारी आणायची असेल तर ‘एक पक्ष’, ‘एक विचारधारा’, तसेच ‘एक नेता’ हे चित्र जनतेसमोर जाणे आवश्यक असल्याचा साक्षात्कार अडवाणी यांना झाला. एकूणच भारतीय परंपरेत साक्षात्कार झाला की तो स्वत:पुरता न ठेवता त्यातून परमार्थ साधण्याची थोर अशी शिकवण भारतीय परंपरा व संस्कृती देते. त्यानुसार अडवाणी यांनी तो साक्षात्कार तत्काळ ‘ब्लॉग’च्या माध्यमातून हिंदुस्थानातील तमाम जनतेला समजावून सांगितला. यातील ‘एक पक्ष- एक विचार’ हा निकष ठीक होता, मात्र ‘एक नेता’ हा नवा निकष अडवाणी यांनी जोडल्यामुळे संघनेतृत्वाची अडचण झाली आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काँग्रेसप्रमाणे घराणेशाहीवर विश्वास ठेवणारा नाही. परिवारातील जनसंघटनांचे नेतृत्व सरसंघचालक स्वत:च करत असल्यामुळे एक नेता वगैरे भानगडी संघाला मान्य होणे शक्यच नाही. त्यामुळेच लालकृष्ण अडवाणी असोत वा नरेंद्र मोदी किंवा फर्राटेदार इंग्रजी बोलणारे अरुण जेटली की सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास केशवपन करण्याची धमकी देणा-या सुषमा स्वराज, यांतील कुणाच्या हातात हिंदुस्थानचा लगाम द्यायचा हे शेवटी सरसंघचालक ठरवणार, हे सर्वच स्वयंसेवकांना माहीत असते. बरे वर नावे घेतलेल्यांपैकी सुषमा स्वराज सोडल्या तर बाकी सर्वच जण संघाच्या तीन ‘आॅफिसर्स ट्रेनिंग कोर्स’ची परीक्षा उत्तीर्ण झालेले स्वयंसेवक आहेत. मग इतके सर्व काही स्पष्ट असताना हे नेते आपापसात का भांडत आहेत, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात रुंजी घालणे स्वाभाविक आहे. अडवाणी, मोदी, जेटली, स्वराज व झालेच तर अगदी गडकरीही, या सर्वांनाच केवळ काँग्रेसमधील सुंदोपसुंदीमुळे अथवा दररोज सरकारच्या विरोधात निघणा-या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत नाहीत. या सर्वांना आपले घोडे पुढे दामटावेसे वाटते आहे ते भारतीय जनता पक्षाला कायमच सर्वोच्च स्थानी बसवण्यासाठी देशाला रुचेल-पचेल आणि शोभेल असा मुखवटा लागतो हे जगजाहीर असल्यामुळेच! 1979 मध्ये जनता पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांनी जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोहोंचेही सदस्यत्व ठेवता येणार नाही, असा दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पक्ष फुटला. पूर्वीचे जनसंघाचे नेते-कार्यकर्ते अलगद बाजूला होऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. मात्र 77 ते 79 या दोन वर्षांच्या कालावधीत अटलबिहारी वाजपेयींपासून अडवाणींपर्यंत सर्वांनाच एक गोष्ट समजली होती की भारतीय जनमानसात स्थान मिळवायचे असल्यास मध्यममार्गी व्यापक भूमिका घ्यावी लागेल. सत्तेचा सोपान या मध्यममार्गातूनच जातो हे लक्षात आल्यावर ‘गांधीवादी समाजवाद’ असा नवा शब्दप्रयोग करत या विचारधारेचा आम्ही स्वीकार केल्याचे त्यांनी जाहीर केले. संघ व गांधीवाद यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर असल्याने संघाने याला विरोध केला. पुढे 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्यावर संघाने भाजपवरील आपली पकड अधिक घट्ट केली आणि गांधीवादी समाजवादाला सोडचिठ्ठी द्यायला लावली. त्यानंतर भाजप अधिकाधिक आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करू लागला. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व भाजपच्या कार्यक्रमांमध्ये फरकच उरला नाही. बाबरी मशिदीचा विध्वंस व देशभरातील दंगे हा इतिहास सर्वांनाच परिचित आहे. या सर्व आक्रमक हिंदुत्वाच्या लाटेवर आरूढ झालेल्या अडवाणींना मात्र सत्ता हाती आल्यावर बाजूला सारून सर्वसमावेशक असलेल्या वाजपेयींचा चेहराच संघाने पंतप्रधानपदासाठी स्वीकारला. तेव्हापासूनच भाजपमधील प्रत्येक नेत्याला हे समजू लागले की, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आक्रमक चेहरा चालतो, मात्र सत्ता आल्यावर संघालाही सर्वसमावेशक चेहराच स्वीकारावासा वाटतो. त्यातूनच मग अडवाणी आपल्या गावी म्हणजे कराचीला गेले असताना जिनांच्या कबरीवर गेले, तर गुजरातमधील दंग्यात बदनाम झालेल्या मोदींनी अलीकडेच सद््भावना यात्रा सुरू केल्या. संघ ही सांस्कृतिक उत्थानासाठी तत्पर असलेल्या शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी आहे असे म्हणतात. नेमून दिलेल्या कामापलीकडे अक्कलहुशारी चालवणे शिस्तबद्ध संघटनेत खपवून घेतले जात नाही. ज्यांना विटा जमवायला सांगितल्या त्यांनी विटाच जमवायच्या. ज्यांना रथावर चढायला सांगितले त्यांनी रथावर आरूढ व्हायचे व ज्यांना पंतप्रधान व्हायला सांगितले त्यांनी पंतप्रधान व्हायचे, अशी शिस्तबद्ध संघटनेतील कार्यपद्धती असते. सध्या मात्र विटा जमवणा-यांपासून ते रथावर आरूढ होणा-यांपर्यंत प्रत्येकालाच बहुधा असे वाटू लागले आहे की, देशाचे पंतप्रधानपद मलाच मिळायला हवे, कारण मीच हिंदू राष्ट्राची निर्मिती करू शकतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी देशातील मुसलमानांना, ख्रिस्ती धर्मीयांना लक्ष्य करणा-यांनाही अचानक सद््भावना वगैरे शब्द समजू लागले. त्यातूनच मग अडवाणींच्या ‘ब्लॉग’पासून ते भाजपच्या ‘कमल संदेश’ या मुखपत्रापर्यंत सर्वच ठिकाणी ज्येष्ठ-कनिष्ठांचे हे अरण्यरुदन सुरू झाले आहे. मुळात भाजप ही आरएसएसची जनसंघटना आहे. अडवाणींपासून मोदींपर्यंत ज्या सर्व नेत्यांना आज संघाची पक्षावरील अतिरिक्त पकड ढिली व्हावीशी वाटते, त्यांना संघाच्या गुहेत केवळ शिरण्याचा मार्ग आहे; परतण्याचा नाही, हे समजायला हवे. 1984 मध्ये एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘संघाला दूर करून वेगळा मार्ग का पत्करत नाही’, या प्रश्नाला उत्तर देताना वाजपेयी म्हणाले होते, ‘जाये तो जाये कहां...’ पंतप्रधानपदासाठी आसुसलेल्या सर्व भाजप नेत्यांना संघ नेमका हाच इशारा देऊ पाहतो आहे.
भाजपमधील भुतावळ (अग्रलेख)
कुरघोडीचे राजकारण (अग्रलेख)