आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडची दवंडी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूड हे बोलूनचालून प्रचारावर तगलेले क्षेत्र आहे. बदललेली आर्थिक गणिते, मल्टिप्लेक्स संस्कृतीचा उदय, मीडिया आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव या बाबी जमेस धरता येथे प्रचार केला तर मातीसुद्धा सोन्याच्या भावाने विकली जाते, नाही तर चोवीस कॅरेट सोन्याला मातीचीही किंमत येत नाही. या बदलत्या परिस्थितीत ‘शोले’ नावाचे रुपेरी पडद्यावरचे अस्सल सोने थ्री-डी रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तुम्ही नुसते ग्रेट असून चालत नाही; तर तुम्ही ग्रेट आहात, हे जगाला ओरडून सांगावे लागते.’ या तत्त्वावर (?) विश्वास ठेवणा-यांचा हा काळ आहे. किंबहुना, हे वास्तव ओळखूनच बॉलीवूडने अलीकडच्या काळात आक्रमक प्रचारतंत्र विकसित केले आहे. काळानुरूप बॉलीवूडमध्ये असाही एक वर्ग आता उदयास आल्याचे संकेत मिळत आहेत, जो एकाधिकारशाही आणि दबावतंत्राच्या बळावर यशही विकत घेऊ पाहत आहे.
अस्तित्वाच्या संघर्षात यश विकत घेण्याचा हा धोकादायक फार्म्युला विकसित करण्याचे श्रेय या क्षेत्रातले जाणकार यशराज फिल्म्सला उघडपणे देऊ लागले आहेत, ही अर्थातच बॉलीवूडचे स्वास्थ्य जपणारी नव्हे, तर बिघडवणारी घटना आहे. ‘धूम-3’ चित्रपटाचे यश पदरात पाडून घेण्यासाठी या निर्मिती संस्थेने पडद्यामागे काही करामती, कसरती केल्याची कुजबुज ऐकता, येणारा काळ तीव्र गळेकापू स्पर्धेचा असणार, हे उघड आहे. हे खरे की, देशात मल्टिप्लेक्सची रुजुवात झाल्यापासून बॉलीवूडचे अर्थगणित बदलले आहे, तसेच यशाची परिमाणेही बदलली आहेत. पूर्वी म्हणजेच आजपासून 25 वर्षांपूर्वी कोणत्याही हिंदी चित्रपटाचे यश प्रदर्शनाच्या कालावधीवर ठरत असे. 25 आठवडे, 50 आठवडे, 100 आठवडे ही त्या वेळच्या चित्रपटाच्या यशाची परिमाणे होती. थोडक्यात, आमचा चित्रपट किती आठवडे चालला, हे सांगण्यात बहुतांश निर्माता-दिग्दर्शक आणि कलावंतांना अभिमान वाटत असे. प्रेक्षकांनाही अमुक चित्रपट तमुक आठवडे चालला, याच गोष्टीचे कोडकौतुक असे. याउपर चित्रपटाने किती व्यवसाय केला, त्यातल्या स्टारमंडळींनी किती मानधन घेतले, यात ना चाहत्यांना रस होता ना चित्रपटसृष्टीला या गोष्टी उघड करण्याची हौस होती. कथेचा आशय, कलावंतांचा अभिनय, गीत-संगीत हेच चित्रपटांचे युनिक सेलिंग प्रपोजिशन ठरत होते. यशराज फिल्म्सचा ‘धूम-3’ हा मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शित झाला.
चोखंदळ, विचारी अशी प्रतिमा असलेला आमिर खान हा या चित्रपटाचे आकर्षण होता. त्याच्या प्रतिष्ठेला शोभेलसे प्रचारतंत्र प्रदर्शनपूर्व राबवण्यात आले, पण प्रदर्शनानंतर कलावंतांचा अभिनय, आशय-विषयाची मांडणी, गीत-संगीत आदींची चर्चा सफाईने टाळत दरदिवशी उत्पन्नाचे आकडे जाहीर करण्यावर तेवढा भर दिला गेला. चित्रपटाची हवा व्यवस्थित तापती ठेवली गेली. या घटकेला, ‘केवळ 10 दिवसांत जगभरात 450 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला चित्रपट’ अशी वर्तमानपत्रांमधून जाहिरात करून ‘धूम-3’च्या यशाची जोरजोराने दवंडी पिटली जात आहे; पण दहा दिवस म्हणजे जेमतेम दोन आठवडे, या कालावधीत चार-पाचशे कोटी कमावले म्हणून चित्रपटाला आर्थिकदृष्ट्या यश मिळालेही असेल; पण तो लोकप्रिय ठरला, असे कसे म्हणता येईल? पूर्वी चित्रपट 50-100 आठवडे चालत होते, म्हणजे ते पुन:पुन्हा बघितले जात होते, असे ‘धूम-3’च्या बाबतीत घडत आहे का? किंवा यापूर्वी ‘सुपरड्युपर हिट’ म्हणून मिरवणा-या चित्रपटांच्या बाबतीत घडले आहे का? असे प्रश्न या क्षणी गौण ठरले आहेत. आम्ही यशस्वी झालो; तुम्ही हे मान्य करा, जणू असेच काहीसे संबंधितांना यातून सुचवायचे आहे. अर्थात, गेल्या दोन-तीन वर्षांत प्रदर्शित झालेल्या बड्या बॅनर्सच्या चित्रपटांचे यश अधोरेखित करताना हाच फॉर्म्युला वापरला गेला आहे. त्यातूनच ‘हंड्रेड करोड क्लब’, ‘टू हंड्रेड करोड क्लब’ अशा संकल्पना बॉलीवूडमध्ये जन्माला आल्या आहेत. म्हणजे, या पटीत कमाई केली तरच तुम्ही यशस्वी, असा त्याचा अर्थ यापुढे लावला जाणार आहे. परंतु, यश पदरात पाडून घेताना एकगठ्ठा मल्टिप्लेक्स थिएटर ताब्यात घेणे, तिकिटांचे दर वाढवणे, इतर चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे, असेही प्रकार घडले आहेत.
गेल्या वर्षीच्या दिवाळीत थिएटर बळकावण्यावरून ‘अजय देवगण फिल्म्स’ने यशराज फिल्मच्या विरोधात केलेली कोर्टबाजी हा त्याचा पुरावा आहे. आतासुद्धा मुंबईतील एकेका मल्टिप्लेक्समधल्या चार-पाच थिएटरमध्ये अर्ध्या तासाच्या फरकाने ‘धूम-3’ दाखवला गेल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील जाणकारांनी नोंदवले आहे. धूमच्या प्रदर्शनानंतर पुढचे 14 दिवस नवा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘धूम-3’च्या यशाला सर्व बाजूंनी पोषक वातावरण मिळणे हा एक योगायोग आहे, यावर विश्वास ठेवण्यास हे निरीक्षक तयार नाहीत. या बदलत्या पार्श्वभूमीवर एकेकाळी मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये तब्बल साडेपाच वर्षे (286 आठवडे) चाललेला आणि त्या काळी जवळपास 15 कोटी रुपये इतकी भरभक्कम कमाई केलेला, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वार्थाने लोकप्रिय म्हणता येईल, असा रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (या चित्रपटावरील रसग्रहणात्मक लेख आम्ही 5 जानेवारी रोजीच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध करत आहोत.) हा चित्रपट थ्री-डी अवतारात प्रदर्शित होत आहे. ‘शोले’ची कथा-पटकथा, पात्रे, दृश्ये, गाणी, संवाद, पार्श्वसंगीत, छायांकन सगळेच ‘अजरामर’ श्रेणीत मोडणारे आहे. म्हणजेच नव्याने सिद्ध करावे, असे ‘शोले’च्या बाबतीत तरी काही शिल्लक राहिलेले नाही. थ्रीडी तंत्राच्या वापरामागे, आजच्या आक्रमक प्रचारतंत्राला अनुसरून यश ‘मॅनेज’ करण्यापेक्षा ‘शोले’ नावाचा अद्भुत चित्रपटानुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा बहुधा निर्मात्यांचा उद्देश आहे. तो सफल झाला, तर व्यावसायिक यशही आपसूक पदरात पडणार आहे. पण तसे नाही घडले आणि ‘शोले’ला थिएटरमधून ‘धूम’ ठोकावी लागली, तर यात नुकसान निर्मात्यांबरोबरच सोने समजून माती विकत घेणा-या प्रेक्षकांच्या पिढीचेही असणार आहे.