आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोस्टन ते बंगळुरू (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादाच्या जागतिक आवर्तनातील ‘बॉम्बस्फोट पर्व’ पुन्हा सुरू झाले आहे की काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. बोस्टनला ऐन मॅरेथॉन धाव चालू असताना झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर दोन दिवसांत बंगळुरूला स्फोट व्हावेत, हा योगायोगही असेल आणि दोन्ही बॉम्बस्फोटांचे सूत्रधार पूर्णपणे वेगळेही असतील; पण त्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढणार हे उघड आहे. अमेरिकेत ‘9/11’ नंतर म्हणजे 11 सप्टेंबर 2001 नंतर प्रथमच असा दहशतवादी हल्ला झाल्यामुळे अमेरिकेचा आत्मविश्वास ढासळला आहे. गेली 12 वर्षे अमेरिका आणि अमेरिकेचे स्वयंभू भाट एकाच चालीवर असे सूर आळवत होते की, तो देश इतका कमालीचा सुरक्षातत्पर, कार्यक्षम आणि विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगत आहे की, तिकडे आता दहशतवादी हल्ला शक्य नाही! त्यांच्या दुर्दैवाने ते मिथक या बॉम्बस्फोटांनी उधळून लावले आहे. भारतात मात्र 21 फेब्रुवारीच्या हैदराबादमधील बॉम्बस्फोटांनंतर आता बंगळुरूला धमाका झाला आहे. अमेरिकेतील ‘9/11’ आणि भारतातील ‘26/11’ या तारखा आता अर्वाचीन इतिहासातील महत्त्वाच्या संदर्भखुणा म्हणून ठरल्या असल्या तरी प्रत्यक्षात दहशतवादाचे मळभ अधिकाधिक गडद होत जाण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने दहशतवादाविरोधात ‘ग्लोबल वॉर ऑन टेरर’ सुरू करून 12 वर्षे झाली आहेत. त्या जागतिक युद्धाचा भाग म्हणूनच अमेरिकेने अफगाणिस्तानवर घनघोर बॉम्बहल्ले चढवले. तेथील तालिबानी राजवट पद्धतशीरपणे पदच्युत करून तेथे करझाई सरकार बसवले. इराकवर आक्रमण करून लाखो इराकी ठार केले आणि सद्दाम हुसेन यांना फाशी दिले. आता इराणला ‘लक्ष्य’ केले आहे. याच क्रमात ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात शिरून अमेरिकन सैनिकांनी ठार केले. या घडीला पश्चिम आशिया (ऊर्फ मध्यपूर्व आशिया) प्रचंड राजकीय उलथापालथींनी ढवळून निघत आहे. इजिप्त, सिरिया, लिबिया व त्यापूर्वी अफगाणिस्तान, इराक या सर्व देशांत लोकशाही प्रस्थापित करण्याच्या मिषाने अमेरिकेने सशस्त्र हस्तक्षेप केला; पण गेल्या 12 वर्षांत स्थिर लोकशाही कुठेही प्रस्थापित झालेली नाही. मूलतत्त्ववादी राजकीय विचार वणव्याप्रमाणे पसरतो आहे. विशेष म्हणजे 1979 ते 1989 या दशकात अमेरिकेनेच अफगाण मुजाहिदीन, तालिबान आणि आयएसआय यांना शस्त्रास्त्रे, अर्थसाहाय्य आणि राजकीय पाठिंबा दिला होता. आता बिबा उतला आहे आणि दहशतवादाचा भस्मासुर अमेरिकेसह सर्व जगाच्याच डोक्यावर हात ठेवून जगाला भस्मसात करू पाहत आहे. अर्थातच जगातील सात अब्ज लोक आणि जवळपास दोनशे देश भस्मसात होणार नाहीत. जगातील महासत्तांची दादागिरी, नवसाम्राज्यवाद, नवभांडवलशाहीचे जागतिक बाजारपेठीकरण, विषमतेची वैश्विक विद्रूपता, दारिद्र्य आणि उपेक्षा या गोष्टी दहशतवादाच्या भस्मासुराला आहार पुरवत असतात. म्हणूनच दहशतवादाविरुद्धचे जागतिक युद्ध तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा या सर्व गोष्टींवर मात केली जाईल. नजीकच्या काळात तशी शक्यता नाही. किंबहुना या दशकात व कदाचित पुढच्याही दशकात दहशतवाद वाढतच जाणार आहे.

पुढील वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिका आपले सैन्य मागे घेणार आहे. त्यानंतर जी ‘पोकळी’ तयार होईल त्यात हिंसाचक्र वाढत जाणार आहे. कारण मग तालिबानी अतिरेकी भारतीय उपखंडात हिंस्र धिंगाणा घालायला मोकळे होतील. बोस्टन ते बंगळुरू साखळी ही त्यानजीकच्या भविष्याची नांदी आहे. बोस्टनला झालेला बॉम्बस्फोट हा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चालू असताना झाला आहे. दहशतवादी हल्लेखोर हे फक्त अमानुष नसतात, तर विकृत, हिंस्र आणि सर्वार्थाने विध्वंसकही असतात. अनेकदा त्यांना इतरांच्याच नव्हे, तर स्वत:च्या जिवाचीही पर्वा नसते. ते निश्चित अशा कोणत्याही उद्दिष्टासाठी, ध्येयासाठी, देशासाठी, धर्मासाठी वा आदर्शासाठी प्रेरित होऊन लढत नसतात. त्यांना फक्त दहशत बसवायची असते. त्यासाठी विध्वंस घडवायचा असतो. म्हणूनच ते अशा जागा व वेळ दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडतात की, ज्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव सार्वत्रिक रूप धारण करील. बोस्टनमधील हल्ल्यातील मृतांची संख्या ‘9/11’ किंवा ‘26/11’ पेक्षा कमी असली तरी मॅरेथॉनच्या जागी बॉम्बस्फोट करून आपण जागतिक उत्सवी वातावरण उद््ध्वस्त करू शकतो, हे त्यांना अधोरेखित करायचे होते. कर्नाटकातील वातावरण सध्या निवडणूकमय झाले आहे. नेमके त्याच वेळेस, तेही भाजप कार्यालयाच्या बाहेर बॉम्बस्फोट करून ते दहशतीला देशव्यापी करू शकतात. अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर धमक्या येतच होत्या. हैदराबाद आणि बंगळुरू येथील बॉम्बहल्ल्यांना ते परिमाण आहेच. अफझल गुरूला फाशी दिली नसती तरीही त्यांनी असे हल्ले केलेच असते. भारतात दहशतवादी हल्ले करणा-यांचे उद्दिष्ट देशात हिंदू-मुस्लिम दंगे घडवणे हे आहे. तसे हल्ले झाले की धार्मिक मूलतत्त्ववाद वाढतो. त्यातून तेढ वाढते. त्यातूनच दंगे पेटतात आणि अशा असहिष्णू वातावरणात जातीयवादी पंथांचे फावते. अतिरेकी मुस्लिम संघटना वा दहशतवादी त्याचप्रमाणे आयएसआय यांना तेच हवे आहे. काही अतिरेकी हिंदुत्ववाद्यांनाही विद्वेषाचे वातावरण हवे आहे. म्हणूनच सर्वांनी सावध राहायला हवे. हेही लक्षात ठेवायला हवे की, दहशतवाद्यांचे कारस्थान जातीय सलोखा आणि सामाजिक समंजस अभिसरण यामुळेच पराभूत होऊ शकते!