आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जी-२०' परिषदेचे फलित (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रबळ अर्थव्यवस्था असलेल्या जगातील भारतासह २० देशांचा समूह जी-२०
नावाने ओळखला जातो. तुर्कस्तान येथील अंत्याला शहरात १५ व १६ अॉक्टोबर रोजी पार पडलेल्या जी-२० गटाच्या दहाव्या वार्षिक परिषदेमध्ये जगातील अर्थव्यवस्थेवर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ती झाली. जी-२० देशांची एकत्रित आर्थिक उलाढाल ही जागतिक ठोकळ उत्पन्नाच्या ८५ टक्के इतकी आहे. त्याचप्रमाणे जगातील दोनतृतीयांश लोकसंख्या जी-२० देशांमध्ये एकवटलेली आहे. या गोष्टींमुळे जगाला भेडसावणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांचे पडसाद या गटाच्या परिषदेमध्ये उमटणे हे स्वाभाविकच होते. ही परिषद होण्याच्या आधी पॅरिसमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी जो भयानक नरसंहार केला त्यामुळे दहशतवाद हाच या परिषदेतील मुख्य मुद्दा बनला. जागतिक दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांनी विकसनशील देशांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना आजवर केलेल्या आहेत. मात्र, त्या तितक्या यशस्वी ठरल्या नाहीत, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दहशतवादविरोधी मुकाबल्यात प्रत्येक देश आपले हित जपण्याचा प्रयत्न करतो. अल कायदाची पकड कमी झाल्यावर ती पोकळी आता इसिस या संघटनेने भरून काढली आहे. सिरियात रशियाकडून होणाऱ्या लष्करी कारवाईमुळे सिरियन निर्वासितांचे लोंढे युरोपीय देशांत आश्रयासाठी येऊ लागले आहेत, असा आरोप युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष
डोनाल्ड टस्क यांनी केला, त्यात तथ्य आहे. सिरियामार्गेच दहशतवाद्यांनी युरोपात येऊन फ्रान्समध्ये हल्ले चढवल्याचा तपास यंत्रणांचा कयास आहे.
जी-२० देशांनी फ्रान्समधील हल्ल्याचा एकमुखाने निषेध केला आहे. मात्र, खरी गोम ही आहे की, दहशतवाद निपटून काढण्याच्या नावाखाली ज्या देशांत युद्धे करण्यात आली, तेथील दहशतवाद अजूनही पूर्णपणे निपटून काढता आलेला नाही. अफगाणिस्तान हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सिरियामध्ये इसिसच्या दहशतवादी तळांवर येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले चढवण्याचा इशारा फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांनी दिला आहे. या कारवाईला सर्वच पाश्चात्त्य राष्ट्रांनी एकमुखी पाठिंबा दिला असला तरी रशियाचा सूर मात्र वेगळा आहे. रशियाने ज्या प्रकारे युक्रेनवर आक्रमण केले होते, तोच पवित्रा त्यांनी सिरियामध्ये कारवाई करताना राखला आहे. बराक ओबामा यांनी जी-२०च्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्याशी चर्चा करताना रशियाच्या या आक्रमकतेला वेसण घालण्याची सूचना केली. त्या वेळी दहशतवाद्यांशी सामना करण्याची आमची पद्धत वेगळी आहे, असे सांगून पुतीन यांनी आमची चूल वेगळी असल्याचे प्रकर्षाने दाखवून दिले. इसिसला नष्ट करण्यासाठी आता दुप्पट प्रयत्न केले जातील, असा निर्धार बराक ओबामा यांनी व्यक्त केला असला तरी जगातील अन्य देशांच्या मदतीशिवाय आपल्याला कोणतीही परिणामकारक कारवाई करता येणार नाही याची अमेरिकेला जाणीव आहे. दहशतवादविरोधी लढ्यामध्ये पाकिस्तान हा आमचा विश्वासू साथीदार असल्याचे अमेरिका नेहमी सांगते. मात्र, पाकिस्तानला अमेरिकेकडून प्रचंड आर्थिक मदत दिली जाते. या अशा परस्परविरोधी वर्तनामुळेच अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांबाबत विकसनशील तसेच तिसऱ्या जगातील देशांमध्ये काहीसा अविश्वास निर्माण झाला आहे. त्याचे प्रतिबिंबही जी-२० परिषदेत उमटणे स्वाभाविकच होते. विकसित देशांच्या दुतोंडी भूमिकेमुळे दहशतवादविरोधी लढा काहीसा कमजोर झाला. नेमके हेच सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेत केलेल्या भाषणात वेगळ्या शब्दांत मांडले. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा, शस्त्रे, संपर्क साधने यांची रसद तोडण्यासाठी जी-२० देशांनी निश्चित धोरण आखले पाहिजे, या मोदींच्या वक्तव्यात तथ्य आहे. मुंबईमध्ये २००८ मध्ये झालेला हल्ला असो वा फ्रान्समध्ये आता झालेला हल्ला, त्यासाठी दहशतवाद्यांनी शस्त्रे, पैसा बेकायदा स्रोतांतून उभे केले. या सगळ्याचा उगम हा काळ्या पैशामध्ये आहे. त्यामुळे परदेशांतील बँकांत काळा पैसा ठेवलेल्या खातेदारांची खाती गोठवून त्यातील पैसा मायदेशी पाठवावा, हे जी-२० परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन योग्यच आहे. जी-२० देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांमधील पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जागतिक वित्तसंस्थांची फेररचना करतानाच या संस्थांमध्ये योग्य समन्वय राहील याची काळजीही घेतली पाहिजे. विकसित व विकसनशील देशांमध्ये आजही जी अनेक बाबतींत दरी दिसते ती मिटल्यास जागतिक आर्थिक प्रगती वेगाने होऊ शकेल. जागतिक बँकेची स्पर्धक म्हणून जिच्याकडे बघितले जाते ती ब्रिक्स बँक विकसित देशांना आता कर्जे देईल. हाही एक नवा प्रवाह पुढे आला आहे. दहशतवादाचा मुकाबला कठोरपणे केल्यास जागतिक आर्थिक प्रगतीतील मोठा अडसर दूर होईल, असा संदेश जी-२० परिषदेतून मिळाला आणि तेच या परिषदेचे फलित आहे.