आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करार संबंधांचे अर्थशास्त्र (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या युगात मालक-कामगार कराराचे स्वरूप बदलून ते अधिक व्यापक झाले आहे. म्हणजे ते ग्राहक-उत्पादक असेही झाले आहे. उदा. आपण एखाद्या विमा कंपनीकडून अपघातानंतर नुकसान भरपाईची पॉलिसी घेताना त्या कंपनीशी एक करार करतो. अपघात झाल्यास त्या कंपनीने भरपाई द्यावी असा तो करार असतो. पण असा करार करताना आपण अपघात करण्यास मोकळे आहोत असाही एक अर्थ निघू शकतो किंवा ती विमा कंपनी तुम्हाला अपघात करण्यास प्रवृत्त करते किंवा तुमच्या जिवाची काळजी करते असाही अर्थ निघू शकतो. अशा करारांमध्ये संदिग्धता असते. नफा ही भांडवलशाहीतील अध्याहृत बाब आहे; पण त्याच्या मुळाशी करार संबंध (काँट्रॅक्ट थेअरी)असतात. गेल्या पाच दशकांमध्ये अर्थशास्त्रात करार संबंधांवर सखोल अभ्यास करताना कोणते करार कोणत्या पद्धतीने आखल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो, याचा ऊहापोह झाला आहे. सोमवारी नोबेल कमिटीने अर्थशास्त्रातील मेमोरियल पुरस्कार जाहीर करताना ब्रिटिश अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट व फिनलंडचे अर्थतज्ज्ञ बेंट होमस्ट्रॉर्म यांच्या करार संबंधांतील चार दशकांच्या चिंतनाचा गौरव करताना आधुनिक जगात करार संबंधांमध्ये झालेले बदल यांची दखल घेतली आहे. करार संबंध आता केवळ भांडवलदार-कामगार इथपर्यंत राहिलेले नाहीत तर ते अर्थशास्त्र ते राज्यशास्त्र, विमा कंपन्या ते गुंतवणूकदार कंपन्या, सरकार व सरकारबरोबर काम करणाऱ्या कंपन्या, शाळा, तुरुंग, रुग्णालये, बड्या कॉर्पोरेट कंपन्या, खासगी करार अशा विविध क्षेत्रांत कळीचा मुद्दा बनले आहे. करार, त्याचा आकृतिबंध व त्यातून दोन्ही पक्षांना मिळणारे लाभ यांचा विचार करताना समाजाला आवश्यक असणाऱ्या सेवा या सरकारने द्याव्यात की त्यांचे खासगीकरण करावे याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. कर्मचाऱ्याचे वेतन स्थिर असावे की ते त्याच्या कामगिरीच्या अनुषंगाने बदलावे अशीही चर्चा सुरू झाली आहे. करार संबंधांवरील ऑलिव्हर हार्ट व बेंट होमस्ट्रॉर्म यांच्या संशोधनामुळे या विषयावर अंतिम उत्तर मिळालेले नाही. पण करारमदार करताना दोन्ही पक्षांचे फायदे अधिकाधिक होतील या अनुषंगाने या संशोधकांनी जी प्रतिमाने सुचवली आहेत त्याने बरेच संघर्ष कमी होतील, असे नोबेल कमिटीला वाटते.
हार्ट व होमस्ट्रॉर्म यांनी चार दशकांची मांडलेली निरीक्षणे लक्ष वेधून घेणारी आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, आपल्या कामगाराला त्याच्या कामाचे (श्रमाचे) योग्य मोल दिले जाते, असे जरी एखाद्या भांडवलदाराला वाटत असले तरी त्याचा अर्थ असा नसतो की, तो कामगार आपल्या मिळणाऱ्या पगारावर खुश आहे. अनेकदा आपल्या कामाच्या दर्जाचे मूल्यमापन मालक करत नाही अशी तक्रार कामगाराची असते. महिन्याचे निर्धारित वेतन देऊन पडेल ते काम देण्याच्या मालकाच्या वृत्तीवरही कामगार खुश नसतो. काही कंपन्या आपल्या सीईओला भरभक्कम सहासात आकडी पगारावर ठेवतात व त्याच्याकडून कंपनीच्या भरभराटीची अपेक्षा करतात. प्रत्यक्षात चित्र उलटे होऊ शकते, भरभक्कम पगार देऊनही कंपनीचा व्यवसाय वृद्धीचा आलेख घसरत जातो. २००८ मध्ये अमेरिकेत वारेमाप गृहकर्ज दिल्यामुळे जी महामंदी आली त्यामागील अनेक कारणांमागे एक कारण हे होते की, कर्ज देणाऱ्या बहुसंख्य कंपन्यांच्या वरिष्ठांना गलेलठ्ठ पगार दिले जात होते. पण प्रत्यक्षात कर्जवसुली न झाल्याने या कंपन्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती. म्हणजे मालक-कर्मचारी करार संबंधात अनेक त्रुटी असल्याचे हे संशोधक सांगतात. होमस्ट्रॉर्म यांनी ७०-८०-९० या तीन दशकात “इन्फॉर्मेटिव्ह प्रिन्सिपल्स’, “मल्टीटास्किंग मॉडेल’ तयार केले होते. कॉर्पोरेट कंपन्या त्वरित नफा कमवण्याच्या निमित्ताने किंवा तेजीत असलेल्या शेअर बाजारातील घडामोडींच्या आधारावर गलेलठ्ठ पगार देऊन सीईओ नेमतात. पण अशा उपायांनी कंपनीला नफा मिळेलच याची खात्री नसते. शेअर बाजार गडगडला तर कंपनीसमोर आर्थिक संकट तर उभे राहते; पण करार संबंधही धोक्यात येतो. कॉर्पोरेट कंपन्यांमधील वेतनश्रेणीतील फरक हा नव्या काळातला कामगार-कंपनी संघर्षाचा एक मुद्दा असल्याकडेही ते लक्ष वेधतात. ऑलिव्हर हार्ट यांनी “इनकम्प्लिट काँट्रॅक्ट्स’ या प्रतिमानात मालमत्ता करारातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. कोणतेही करार संबंध हे अपूर्ण असतात. कारण या करारांची योग्यायोग्यता अचूकपणे मोजता येत नाही. हार्ट यांनी एखाद्या कंपनीचा नफा केवळ स्पर्धेमुळे वाढत नाही तर दुसऱ्या कंपनीशी केलेल्या करारामुळेही वाढत असतो, असे दाखवून दिले आहे. आज जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने जात असताना करार संबंधांची जी चिकित्सा होत आहे ती आधुनिक समाजासाठी महत्त्वाची आहे.
बातम्या आणखी आहेत...