आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फास्ट अँड फ्युरियस (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूड ही अ‍ॅक्शन चित्रपटांची, सुपर हीरोंची जन्मभूमी आहे. हॉलीवूडमध्ये अ‍ॅक्शनपट ही एक स्वतंत्र अशी अब्जावधी डॉलर उलाढालीची बाजारपेठ आहे. या अ‍ॅक्शनपटांचा बाज वेगळा आहे. त्यांचे रसायन वेगळे आहे, प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. अशा चित्रपटांमध्ये अभिनय नव्हे तर स्टंटबाजीला महत्त्व असते. कथा नव्हे तर कॅमे-याच्या हाताळणीला महत्त्व असते. संगीत नव्हे तर कट-कारस्थानाला महत्त्व असते. हॉलीवूडचे असे चित्रपट पाहणा-यांची संख्या जगभरात लाखोंनी आहे. हा प्रेक्षक चोखंदळ आहे. त्याला चित्रपटातील अ‍ॅक्शन-सुपर हीरोचे वर्तन आपलेसे वाटते. तो असल्या हीरोंशी तादात्म्य पावणारा असतो. शनिवारी अशीच एक दु:खद घटना घडली. अमेरिकेतल्या लॉस एंजलिसमध्ये एका कार अपघातात चाळीस वर्षांचा प्रसिद्ध अ‍ॅक्शन हीरो पॉल वॉकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्यावर प्रेम करणारे जगभरातील लाखो तरुण-तरुणी शोकसागरात बुडून गेले. त्याचा अनपेक्षित आणि चटका लावून जाणारा मृत्यू इतका धक्कादायक होता की दुस-या दिवशी (रविवारी) जगातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी, न्यूज चॅनल्सनी त्याच्या मृत्यूची बातमी अग्रस्थानी प्रसिद्ध केली. पॉल वॉकर हे गेल्या दहा वर्षांतील हॉलीवूडमधील अजब आणि अतर्क्य असे रसायन होते.
ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियामध्ये पॉलला श्रद्धांजली वाहणा-या लाखो तरुणांच्या मते, पॉल हा त्यांच्या पिढीचा अभिनेता होता. पॉल पडद्यावर जे काही अशक्यप्राय स्टंट करत असे, ते स्टंट त्यांच्या तरुण रक्ताला ऊर्जा देणारे होते. त्याचे पडद्यावरील साहस नेहमीच साहसवादाला प्रोत्साहन देणारे होते, अशी या तरुणांची प्रतिक्रिया होती. पॉल हा काही उत्तम अभिनय करणारा अभिनेता नव्हता किंवा त्याच्या अभिनयाची चिकित्सा समीक्षकांनी केली नव्हती (पॉलला त्याच्या कारकीर्दीत एका संस्थेमार्फत दोन वेळा सर्वात वाईट अभिनयाचे पारितोषिक देण्यात आले होते!); पण पॉलकडे साहसाचे जे विलक्षण कसब होते, त्याला समीक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतले. पॉलची ‘फास्ट अँड फ्युरियस’ ही सात भागांची चित्रपट मालिका समीक्षकांसाठी तशी नावडतीची कथाच होती. त्यामुळे त्याच्या चित्रपटांना कितीही कमी स्टार दिले तरी बॉक्स ऑफिसवर गल्ला लाखो डॉलरमध्ये होत असे. चित्रपट ही प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी कला आहे, असे मानणारे काही समीक्षक पॉलच्या चित्रपटांना हॉलीवूडमधील स्टंट मालिकांमधील विलक्षण साहसकथा म्हणत आणि ते बदलत्या हॉलीवूडचे उदाहरण म्हणून सांगत. पॉलने ‘फास्ट आणि फ्युरियस’ या सात चित्रपटांपैकी सहा चित्रपटांमध्ये काम केले. एक पोलिस ऑफिसर, अमेरिकेतील टोळीयुद्ध, माफियांच्या विरोधात लढण्यासाठी (सर्व माफिया उत्तम कार चालवत असतात) त्या माफियांच्याच टोळीत शिरतो (अंडर कव्हर एजंट) आणि या टोळीचा एक भाग होऊन तो दुष्टांचा कारभार उद्ध्वस्त करतो, अशा वन लाइन सांगणा-या त्याच्या चित्रपटाच्या कथा असत. पॉल हा स्वत: उत्कृष्ट कार चालवणारा होता तसेच तो उत्तम स्टंटबाजही होता. कार रेसिंग तर त्याचा छंद होता. या छंदामुळे त्याच्याकडे जगातील उत्तमोत्तम कारही होत्या.
विशेषत: तासाला तीनशे-चारशे किमी वेगाने पळणा-या कार त्याच्या ताफ्यात असत. पोर्श, निसान, 1964 शेवर्ले इम्पाला यासारख्या कार त्याच्या ताफ्यात असल्याने तरुणांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. 2001 मध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपट मालिकेतील पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर पॉलची लोकप्रियता रातोरात पसरत गेली. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेत युनिव्हर्सल पिक्चर या चित्रपट वितरण कंपनीने या चित्रपटाची मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्याचे सात भाग प्रदर्शित झाले. प्रत्येक भागात अंगावर रोमांच आणणारे अमेरिकेच्या सुपर हायवेंवरचे पाठलागांचे थरारक प्रसंग, वेगवान मोटारींच्या रेस असा सगळा मसाला असायचा. 2001 मध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ला मिळालेले यश हे त्या काळात हॉलीवूडसाठी तशी संजीवनी होतीच. कारण साधारण 2000 सालापर्यंत हॉलीवूडमधील हॅरिसन फोर्ड, अर्नोल्ड श्वार्झनेगर, स्टीव्हन सिगल, ब्रुस विलिस, सिल्व्हेस्टर स्टॅलोन, टॉम क्रुझ, मेल गिब्सन, वेस्ली स्निप्स या अ‍ॅक्शन हीरोंची सद्दी संपत आली होती. त्यांचा करिश्मा ओसरू लागला होता. वय झाल्याने हे नट स्टंट करू शकत नव्हते, तसेच त्यांना उपयुक्त ठरतील अशा पटकथाही तयार होत नव्हत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, हॉलीवूडमध्ये अ‍ॅक्शन हीरोंची जागा अ‍ॅनिमेशन पट, कॉम्प्युटर ग्राफिक्सवर आधारित जगबुडी दाखवणा-या चित्रपटांनी घेण्यास सुरुवात केली होती. हे नवे सुपर हीरो एकाच वेळी अंतराळ आणि पृथ्वीवर दुष्टांचे निर्दालन करत असत.
जगभरात बॉक्स ऑफिसवर विक्रम रचणा-या ‘अ‍ॅव्हेंजर’ या चित्रपट मालिकेतील आयर्न मॅन, थॉर, ब्लॅक विडो, लोकी ही पात्रे; ‘ट्रान्सफॉर्मर’ या चित्रपटातील ऑप्टिमस प्राइमसारख्या कॉम्प्युटर ग्राफिक्स तंत्रज्ञानातून उभा केलेला सुपर हीरो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. हॉलीवूडची बाजारपेठही या नव्या सुपर हीरोंमुळे नफ्यात आली होती. पण सर्वसामान्य प्रेक्षकांना भावणारी अ‍ॅक्शन, स्टंटबाजी या चित्रपटांमधून दिसत नव्हती. अशा काळात पॉलचा सुपर कॉप प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसला होता. त्याच्या प्रत्येक भागात दिसणारी स्टंटबाजी ही पहिल्या चित्रपटापेक्षा वेगळी, जीवघेणी व थरारक होती. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांना त्याचे कार अपघातात जाणे धक्का देणारे होते. 2008 मध्ये ‘बॅटमॅन’ सिरीजमधील ‘डार्क नाइट’ या चित्रपटात जोकरची भूमिका वठवणारा हिथ लेजर याचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. हिथ लेजरला उत्कृष्ट सहअभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूनंतर पॉलचा हा असा दुर्दैवी मृत्यू ही हॉलीवूडसाठी धक्कादायक घटना आहे. पॉलचे लाखो चाहते या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. पण ज्या गोष्टी अचाट आणि अवास्तव वेगाने जातात, त्या तितक्याच वेगाने भन्नाटपणे कुठेतरी जाऊन आदळतात आणि नष्ट होतात. मग ते चित्रपटात असो वा राजकारणात -‘फास्ट अँड फ्युरियस’ शैलीचा अंतही तसाच होतो!