आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदाचे बोहल्यावर चढा! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसचा पार धुव्वा उडवला. या निवडणुकीत काँग्रेसला लोकसभेच्या फक्त ४४ जागांवर विजय मिळविता आला. नेमके त्या वेळी राहुल गांधी यांचे वय ४४च होते! राष्ट्रीय स्तरावरच्या काँग्रेस पक्षाचा आकार राहुल गांधी यांनी स्वत:च्या वयाइतका लहान केला, अशी बोचरी टीका झाली होती. पण काँग्रेसने ही टीका अजिबात मनाला लावून घेतलेली नाही! काँग्रेस पक्षाला सत्ता फक्त गांधी घराण्यातील व्यक्तीच मिळवून देऊ शकतात, असा काँग्रेसजनांचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेस महासमितीच्या बैठकीत सोमवारी राहुल गांधी यांनाच पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत कोणतेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याच बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची या पदाची मुदत डिसेंबरमध्ये संपत असून त्यामुळे त्यांना अजून एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महासमितीने घेतला. तरीही महासमितीच्या बैठकीचा मूळ उद्देश हा राहुल गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची वाट मोकळी करून देणे हाच होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीस सोनिया गांधी अनुपस्थित होत्या. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत यासाठी ज्या प्रकारे गळ घातली गेली तसेच प्रकार प्रादेशिक पक्षांमध्येही घडताना दिसतात. २००३ मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्याचा राज ठाकरे यांनी जो ठराव मांडला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथे उपस्थित नव्हते. हा ठराव काही अचानक वगैरे नव्हे तर पूर्वनियोजन करून मांडण्यात आलेला होता व शिवसेनाप्रमुख उपस्थित नसताना शिवसैनिकांनी एकमुखाने तो मंजूर केला, असे लोकशाहीवादी चित्र उभे केले गेले. या दोन्ही उदाहरणांवरून घराणेशाही बहुतांश पक्षांच्या नसानसांत किती भिनली आहे हेही दिसून येईल. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास आपण सज्ज असल्याचे सांगितले आहे. कदाचित ते या वर्षीच्या अखेरीपर्यंत या पदावर विराजमान होतील. मात्र, त्यातही एक मेख आहेच. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी ते अध्यक्ष झाले व दुर्दैवाने त्या राज्याच्या निवडणुकांत काँग्रेसचे पुन्हा पतन झाल्यास हे पक्षासाठी हात दाखवून अवलक्षण केल्यासारखेच होणार आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये १० वर्षांच्या कारकीर्दीत इतके घोटाळे उजेडात आले की त्यामुळे यूपीएला पुरेपूर बदनाम करण्यासाठी आयते कोलीत भाजपसहित सर्वच विरोधी पक्षांच्या हातात मिळाले. मनमोहनसिंग हे अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असले तरी त्यांना आपल्या घोटाळेबाज सहकाऱ्यांना आवर घालणे फारसे जमले नाही. सोनिया व राहुल गांधी हे मनमोहनसिंग यांना कारभार करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देत नसल्याचेही चित्र निर्माण झाले होते. हा केवळ विरोधकांचा अपप्रचार होता असे समजण्याचे कारण नाही, तर काँग्रेस पक्षातील वातावरणही तसेच होते. या सगळ्या अनागोंदीचा फायदा भाजपने घेऊन नरेंद्र मोदी हा हुकमाचा पत्ता पुढे केला. “अच्छे दिन आने वाले हैं’ अशी भूलभुलैया घोषणा देऊन नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. मोदींनी निवडणूक प्रचारात जी भरमसाट आश्वासने दिली होती ती पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत, हे गेल्या दोन वर्षांच्या कारभारातून मतदारांच्या लक्षात आलेले आहे. मोदींच्या कारभाराचे अत्यंत चाणाक्षपणे वाभाडे काढून त्यांच्या विरोधात रान उठविण्याचे काम काँग्रेस पक्षाने अग्रक्रमाने करायला हवे होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाच्या दणक्यातून सावरायला काँग्रेस अजूनही तयार नाही. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड यांच्याबरोबर केलेल्या युतीचा फायदा मिळून काँग्रेसला विधानसभेच्या २७ जागा जिंकता आल्या. या निवडणुकीची सारी प्रचारधुरा राहुल गांधींनी हातात घेतली होती, त्यामुळेच हे यश मिळाले, असे विधान करणे मात्र धाडसाचे होईल! यामुळेच मुख्य प्रश्न हाच उठतो की राहुल गांधींच्या हाती पक्षाची धुरा सोपविल्यामुळे काँग्रेसचे खरोखर भले होईल का? याचे कारण गेल्या १२ वर्षांत राहुल गांधींनी कोणतीही कल्पकता दाखविलेली नाही. ना सरकारमध्ये, ना पक्षामध्ये! वागण्याबोलण्यातही हा माणूस कल्पक नाही. प्रामाणिक मात्र जरूर आहे. पण देश चालवायला तितके पुरेसे नाही. देशातील बदललेली मानसिकता, समाजव्यवस्था या बाळाला कळली आहे, असे का दिसत नाही? राजीव गांधींच्या नजरेत नवी दिशा होती. पन्नाशी आली तरी ती राहुल गांधींमध्ये दिसत नाही. यामुळेच १९७० मधील टेप वाजवत काँग्रेसचे घोडे दामटण्याचा प्रयत्न युवराज करीत असतात. हे वास्तव असले तरी काँग्रेसलाही गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. गांधी घराणे नसेल तर पक्ष टिकणार नाही. यासाठी तरी युवराजांनी पक्षाध्यक्षपदाच्या बोहल्यावर चढायला हवे.
बातम्या आणखी आहेत...