आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जॅक’ ऑफ ऑल ट्रेड्स (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिकी पाँटिंग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर या 13 हजारांवर धावा काढणा-या खेळाडूंच्या पंक्तीतला एक अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण निवृत्त होत असताना त्याची 115 धावांची दमदार खेळी (45 शतके) त्याच्यावर प्रेम करणा-या लाखो रसिकांसाठी आनंदाचा क्षण होता. त्याची फलंदाजीतील 55 ची सरासरी आजच्या युगातील सर्वोत्तम फलंदाजांची सरासरी मानली जाते. संघाला अडीअडचणीत मदतीला धावून येणारी त्याची मध्यमगती गोलंदाजी जगातील कोणत्याही नियमित गोलंदाजांपेक्षाही प्रभावी ठरली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कॅलिस संघात असताना कधीही पाचवा गोलंदाज खेळवण्याची चिंता पडली नाही. फलंदाजी आणि निव्वळ गोलंदाजी या बळावर कोणत्याही दर्जेदार संघात स्थान मिळवू शकणारा कॅलिस म्हणजे एकाच क्रिकेटपटूमध्ये दोन उत्तम गुणवत्तांचा अभूतपूर्व मिलाफ, असेच म्हणावे लागेल. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करणारा हा क्रिकेटपटू तब्बल दीड तप दक्षिण आफ्रिकेचा आधारस्तंभ बनून राहिला. गतशतकाच्या अखेरीस आणि या शतकाच्या प्रारंभी जगातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये तो अग्रेसर होता. सलग पाच कसोटींमध्ये शतके झळकावून तो सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्य पंक्तीत बसला.
भरभक्कम बचाव आणि परिस्थितीनुसार आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता यामुळे कॅलिस दक्षिण आफ्रिका संघाचा मर्यादित षटकांच्या आणि कसोटी क्रिकेटचाही आधारवड बनला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर येण्याचे स्वप्न साकारता आले. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने आपल्या संघाला अग्रस्थानाच्या नजीक आणून ठेवले आहे. सचिन तेंडुलकरप्रमाणे त्याचेही स्वप्न आहे की, आपल्या संघाला विश्वविजेतेपद एकदा तरी मिळवून द्यायचे. त्या ओढीनेच त्याने आपली गुणवत्ता 2015 च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत आपल्या देशाच्या चरणी वाहण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा हा निर्णय होता. कारण सचिन तेंडुलकरने आधी ट्वेंटी-20 नंतर एकदिवसीय क्रिकेट आणि शेवटी कसोटी क्रिकेट सोडले. द्रविडनेही तेच केले होते. मात्र कॅलिसने तो क्रम बदलला. कसोटी क्रिकेटवर अधिक ताकद, वेळ वाया घालवण्यापेक्षा एकदिवसीय क्रिकेटवर यापुढे लक्ष केंद्रित करून त्यासाठीचा फिटनेस राखण्याचा निर्णय त्याने घेतला.
2015 चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला मिळवून देणे, या एकमेव ध्येयाने त्याने हा निर्णय घेतला आहे. खरे तर अजूनही तो कसोटी क्रिकेट खेळण्याइतपत तरुणांसारखाच तंदुरुस्त आहे. त्याची आयपीएलमधील 2000 धावा व 50 बळी ही कामगिरी जगातल्या कोणत्याही क्रिकेटपटूला अजून जमलेली नाही. त्याची कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी व गोलंदाजीची कामगिरी एकत्रितपणे कोणत्याही खेळाडूला करता आली नाही. त्याच अष्टपैलुत्वाचा आपल्या संघाला लाभ देण्यासाठी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मात्र टाळली. संघाला कोणत्याही भूमिकेत उपयोगी पडू शकणारा हा खेळाडू ख-या अर्थाने अष्टपैलू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फटकेबाजीला आवर घालून अनेक पराभवांपासून दक्षिण आफ्रिकेला वाचवले. विजयाचा पाया रचून देताना तो खेळपट्टीवर खंबीरपणे उभा राहिला, तर गोलंदाजीमध्ये त्याने अनेकदा चमत्कार केले. प्रमुख गोलंदाजांना जेव्हा जेव्हा विकेट घेणे जमले नाही तेव्हा कप्तानाने त्याच्या हाती विश्वासाने चेंडू सोपवला. प्रत्येक वेळी तो कप्तानाच्या विश्वासास पात्र ठरला. जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा शतकवीर विराट कोहलीला बाद करतानाही त्याने आपल्या गोलंदाजीतील कर्तृत्वाचा तोच करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला.
वयाच्या नवव्या वर्षीच आईचे छत्र हरपलेल्या जॅक कॅलिसला त्याच्या वडिलांनी फुलासारखे जपले. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीत त्याच्या वडिलांचे स्थान सर्वोच्च होते. वडिलांना कर्करोग झाल्याचे कळताच तो हादरला होता. त्याने आजारी वडिलांची सेवा करण्यासाठी काही काळ क्रिकेट खेळणेच बंद केले. वडिलांच्या मृत्यूनंतर कॅलिस पुन्हा जिद्दीने मैदानावर आला. दरम्यानच्या काळात त्याच्या क्रिकेटच्या प्रगतीचा वेग किंचित मंदावला होता. त्यामुळे आज 166 कसोटींनंतर त्याच्या नावावर असलेली 13 हजार 289 धावा, 45 शतके, 292 बळी आणि 200 झेल ही मिळकत आणखी मोठी दिसली असती. स्लिपमध्ये भरवशाचा झेल टिपणारा क्षेत्ररक्षक, वयाच्या 38 व्या वर्षीही 140 किमी वेगात चेंडू टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज आणि परिस्थितीनुसार संघासाठी फलंदाजी करू शकणारा फलंदाज सापडणे आजच्या क्रिकेटमध्ये तरी दुर्मिळ आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्यांच्या देशात तो जन्माला आला असता तर आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असता. त्याच्या अष्टपैलू गुणवत्तेचे वारेमाप कौतुक झाले असते. अष्टपैलुत्वाच्या बाबतीत खरे तर त्याची सर गारफील्ड सोबर्स यांच्याशीच तुलना होऊ शकेल. सोबर्सप्रमाणे कॅलिसकडे बॅकफूट व फ्रंटफूटवर जाऊन खेळ करण्याची क्षमता होती. भात्यात ड्राइव्हज, फ्लिक, हूक, स्वीपपासून काही स्वत:चेच खास असे फटके होते. परिस्थितीनुसार आपल्या खेळाचे ‘गिअर’ बदलण्याची कला त्याला अवगत होती. काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट डागाळले गेले होते. हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीनंतर तर क्रिकेट विश्वाचा दक्षिण आफ्रिकेवरचा विश्वासच उडायला लागला होता. त्या कठीण कालखंडात जॅक कॅलिस नावाचा खंबीर मनोवृत्तीचा क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेला मिळाला. त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा अधिकृतपणे वाहिली नाही, परंतु कोसळणा-या विश्वासाचा डोलारा सावरून धरला.
दक्षिण आफ्रिका संघाबाबतची विश्वासार्हता निर्माण केली. क्रिकेटच्या मैदानावर यशाची चव दक्षिण आफ्रिकेला चाखायला लावली. यशाच्या अशा एकेक पाय-या चढत त्याने दक्षिण आफ्रिकेला आज कसोटी क्रिकेटच्या अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. 2015पर्यंत त्याला एकदिवसीय क्रिकेटचे सर्वोच्च स्थान दक्षिण आफ्रिकेला मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी वैयक्तिक जीवनात कधीही स्थैर्य न लाभलेला दक्षिण आफ्रिकेचा ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ क्रिकेटच्या मैदानावर मात्र खंबीरपणे वनडे सामन्यांमध्ये उभा राहणार आहे.