आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी अम्मा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुद्धिमत्ता व सौंदर्य घेऊन अनेक जण जन्माला येतात; पण त्यातून करिष्मा उभा राहण्याचे भाग्य एखाद्यालाच मिळते. करिष्मा असूनही सत्ता मिळण्याचे भाग्य आणखीनच थोड्यांच्या वाट्याला येते. सत्ता मिळाल्यानंतर ती करारीपणेे राबवण्याचे धैर्य व चिवट स्वभाव त्याहून दुर्मिळ. या सर्व गुणांचा संगम असण्याचे महत््भाग्य तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना लाभले होते. आणि या गुणांना एकमेकांशी बांधणारे आणखी दोन गुण त्यांच्यापाशी होते. कमालीचा राजकीय स्वार्थ व टोकाचा अविश्वास. अशा परस्परविरोधी, पण प्रभावी रसायनांनी जयललिता यांचे व्यक्तिमत्त्व घडले होते. या विलक्षण रसायनामुळेच आयुष्यातील चढउतारांना यशस्वीपणे तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात आली आणि याच रसायनामुळे त्या कडवट व एकलकोंड्या बनत गेल्या. आयुष्यात मिळवण्यासारखे त्यांना भरभरून मिळाले. सौंदर्यापासून सत्तेपर्यंत सर्व वैभवाची लयलूट झाली. त्यांनी मिळवले खूप आणि सत्तेच्या मार्फत लोकांना दिलेही खूप. महाराणीच्या थाटात त्या जगल्या. महाराणीचे भागधेय घेऊन आपण जन्माला आलो आहोत हे त्या विसरल्या नाहीत आणि आपण महाराणी असल्याचा जनतेला विसर पडणार नाही याची दक्षता त्यांनी शेवटपर्यंत घेतली. जनतेसाठी त्या ‘अम्मा’ होत्या, परंतु ही अम्मा जनतेशी एकरूप झालेली नव्हती.

दक्षिणेच्या इंदिराजी अशी त्यांची तुलना केली जात असली तरी इंदिराजी व जयललिता यांच्या लोकप्रियतेत गुणात्मक फरक होता. सामान्य जनता व इंदिराजी यांच्यात कधीही मानसिक अंतर नव्हते. जयललिता मात्र अंतर राखून होत्या. या अम्माचा दरारा होता. पक्षाचे आमदार व मंत्र्यांवर तो अधिकच होता. राजाने उदारपणे कारभार केला की कोणत्याही देशातील जनता खुश असते. उदार राजाने पक्षांतर्गत लोकशाही टिकवली की नाही, नियम पाळलेत की नाही, कायदा मानला की नाही, बेहिशेबी संपत्ती केली का, अशा प्रश्नांशी जनतेला सोयरसुतक नसते. रोजच्या गरजा पुरवणारा उदार राजा वा राणी जनतेला हवी असते. जनतेच्या या गरजा जयललिता अतिशय कार्यक्षमतेने पूर्ण करीत होत्या. यामुळेच महाराणीचा बडेजाव राखत असूनही जनतेने त्यांना दूर केले नाही.

गुणवत्तेची चमक त्यांनी लहानपणीच दाखवली होती. पारंगत वकील होऊन कोट्यवधी रुपये कमावण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना सिनेमात शिरावे लागले. तेथेही अंगभूत गुणांवर त्यांनी अफाट यश मिळवले. एमजीआर यांच्यामुळे त्या राजकारणात आल्या. त्यांच्या बुद्धिमत्तेला राजकीय पैलू एमजीआर यांच्या सहवासात पडले. राजकारण नकोसे वाटते, असे म्हणणाऱ्या जयललितांनी पुढे कसलेल्या राजकारण्याप्रमाणे कारभार केला. कधी कुणाला जवळ करायचे व कधी नारळ द्यायचा याचे त्यांचे स्वत:चे गणित असे. हे गणित व्यक्तिगत सहकाऱ्यांपासून ते राजकीय आघाड्यांपर्यंत सर्वत्र वापरले जाई. त्या कधी काँग्रेसबरोबर जात, तर कधी भाजपबरोबर. तामीळ वाघांना विरोध करत ,तर नंतर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी देण्यासाठी दबाव आणत. स्वत:चा राजकीय स्वार्थ या एकमेव हेतूने त्यांचे राजकारण सुरू असे.

तामिळनाडूतील पुरुषसत्ताक राजकारणाने त्यांना खूप त्रास दिला, हीन पातळीवरून विरोध झाला. या पुरुषसत्ताक राजकारणाशी झगडत त्यांनी स्वत:ची पुरुषी मानसिकता घडवली आणि तामिळनाडूवर वर्चस्व प्रस्थापित केले. आपल्यातील या सामर्थ्याची जाण त्यांना तरुणपणीच आली होती. अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या पहिल्याच भाषणाचा मथळा, ‘पेनीन पेरूमाय’ म्हणजे ‘स्त्रीशक्तीचे श्रेष्ठत्व’ असा होता. या श्रेष्ठत्वाचा आविष्कार पुढे होत राहिला. हे श्रेष्ठत्व त्यांना जपता आले कारण करिष्म्याला कार्यकुशलतेची जोड देण्याची बुद्धिमत्ता जयललिता यांच्याकडे होती.

प्रशासनाकडून काम करून घेण्याचे कौशल्य होते. जनतेला खिरापत वाटण्याचा कारभार त्यांनी केला, असे टीकाकार म्हणतात. पण ती कल्याणकारी राजवट आहे असे म्हटले पाहिजे. गरिबांना तांदळापासून लॅपटॉपपर्यंत अनेक सोयी जयललिता यांनी मिळवून दिल्या. औषधे, पाणी, स्वस्त चित्रपटगृहांपासून इडली-डोश्यांपर्यंत सर्वकाही ‘अम्मा’च्या नावावर गरिबांना मिळत होते. ही मदत अत्यंत दर्जेदार राहील आणि सर्व योजना गरिबांपर्यंत पोहोचतील याकडे बारकाईने लक्ष देण्याची दक्षता त्यांनी घेतली. ‘अम्मा इसेन्शियल’ असे त्याचे वर्णन एका नागरिकाने केले. ते अतिशय सार्थ असून अन्य मुख्यमंत्र्यांनी त्यातून शिकण्यासारखे आहे. गरिबांना या खिरापती वाटताना राज्याची औद्योगिक संपत्ती वाढेल याकडेही त्यांनी लक्ष दिले. अन्य नेत्यांपेक्षा इथे त्यांचा वेगळेपणा ठशठशीत दिसतो. यामुळे त्यांचा लोकानुनय हा आतबट्ट्याचा कारभार होऊन तामिळनाडू दिवाळखोर झाले नाही. संपत्ती निर्माण करून त्यातून गरिबांचे जीवन सुलभ करण्याची कुशलता त्यांच्याजवळ असल्याने त्यांचा स्वार्थ, त्यांचा ताठा, त्यांचा अहंकार, त्यांची हुकूमशाही व त्यांचा पैशाचा सोस याकडे जनतेने दुर्लक्ष केले. राहणीमान महाराणीचे, पण कारभार अम्माचा, हे जयललितांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाला प्रणाम.
बातम्या आणखी आहेत...