आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रीय शेरेबाजी! (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत नावाच्या महाकाय देशाकडे सा-या जगाचे लक्ष असताना कोणी विषाची शेती करते आहे, कोणी सत्तेला विष म्हणते आहे, तर कोणी कोणाच्या पोटात विष अधिक आहे, याचा हिशेब मांडते आहे. अशा राजकीय विधानांकडे एरवी दुर्लक्षच केले पाहिजे, मात्र ही सर्व मंडळी या देशाचे नेतृत्व करणारी असल्याने त्यांची विधाने अशी सोडून देता येणार नाही. गेल्या आठ दिवसांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांची सवंगतेकडे जाणारी राजकीय विधाने देशातील सुजन मतदारांना चिंतेत टाकणारी आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते एकमेकांना किती विष पाजतात, हे त्यांचे तेच ठरवणार आहेत. मात्र, या देशात आगामी निवडणूकही मूलभूत मुद्द्यांवर झाली नाही तर 125 कोटी जनतेला आणखी किती दिवस हे राजकीय विष पचवावे लागेल, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. निवडणूक सभा गाजवणारे हे राष्‍ट्रीय नेते देशासमोर आपल्या पक्षाचा अजेंडा ठेवण्यासाठी का कचरत आहेत, याचाही विचार यानिमित्ताने झाला पाहिजे.
दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी पुन:पुन्हा इतिहासाचे दाखले देऊन मतदारांना भावनिक आवाहने करत आहेत, तर त्यांचे पुत्र राहुल गांधी इतिहासात झालेल्या सर्वच घटनांना मला जबाबदार धरता येणार नाही, अशी आपली सुटका करून घेत आहेत. त्यांना ‘सिस्टिम’ म्हणजे व्यवस्था बदलायची आहे, म्हणूनच त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत ‘सिस्टिम’ हा शब्द तब्बल 73 वेळा वापरला; पण ती बदलायची म्हणजे काय करायचे, हे ते सांगू शकले नाहीत. त्यांच्या आतापर्यंतच्या अनेक विधानांवरून ते सध्याच्या व्यवस्थेला वैतागले आहेत, असे दिसते. मात्र, त्याच व्यवस्थेचे ते लाभधारक आहेत तसेच म्होरके आहेत, हे ते सोयीस्कररीत्या विसरतात. खरे म्हणजे व्यवस्था बदलायची म्हणजे काय करायचे, हे समजून घेण्यासाठी राहुल गांधींनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांच्याकडे शिकवणी लावायला हवी होती. एखादी जुनी गोष्ट पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन प्रयोग करू शकत नाही, असे फार चांगले विधान त्यांनी केले आहे. अर्थात ही जुनी गोष्ट म्हणजे काय आणि नवी गोष्ट म्हणजे काय, हे त्यांनी सांगितलेले नाही. 2009मध्ये काँग्रेसने सत्तेवर येण्याऐवजी विरोधी बाकावर बसायला हवे होते, यूपीए-2चे नेतृत्व करण्याचा काँग्रेसचा निर्णय धोरणात्मकदृष्ट्या चुकला, आघाडी सरकारमुळेच सरकार योग्य दिशेने आणि वेगाने काम करू शकले नाही, अशी सर्व प्रांजळ कबुली त्यांनी देऊन टाकली आहे. फरक एवढाच की, त्या सरकारची कारकीर्द संपताना त्यांना हा शहाणपणा सुचला आहे. व्यवस्था बदलाचे काम किती आमूलाग्र असते आणि त्याची देशाला किती गरज आहे, याचे आकलन द्विवेदी यांना आहे, एवढाच काय तो दिलासा. एवढे सगळे असताना मुद्द्यांवर भर देण्याचे धाडस खरे तर नरेंद्र मोदी करू शकतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी अर्थव्यवस्था, कररचनेसारखे महत्त्वाचे विषय मांडून तशी सुरुवातही केली होती. मात्र, त्यांच्या मेरठ येथील ‘विजय शंखनाद’ सभेतील भाषणाने तेही राजकीय कोट्या करण्यात अडकले आहेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. ते वापरत आहेत तशी अत्याधुनिक यंत्रणा वापरून राजकीय सभेत उत्तर दिलेच पाहिजे, याविषयी दुमत नाही; मात्र त्यात किती अडकायचे, हेही ठरवले पाहिजे. देशातील तरुणवर्ग आणि नवमतदार देशातील सर्वच बदलांकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. या देशात काही मूलभूत बदल व्हावेत आणि आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे, अशी आशा त्याच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच मोदी व्यवस्थेतील बदलाविषयी बोलायला लागल्याने तो त्यांच्याकडे आकर्षित झाला. हे लक्षात आल्यावर व्यवस्था बदलाचा मुद्दा राहुल गांधींनीही पुन:पुन्हा मांडण्यास सुरुवात केली. देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती जाणार आहे, अशा एकमेकांच्या विरोधात असलेल्या नेत्यांचे या एका कळीच्या प्रश्नाविषयी एकमत आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्यासाठी ही जी शेरेबाजी चालली आहे, ती तेवढीच निषेधार्ह आहे. अशा शेरेबाजीतून जनतेचे मनोरंजन जरूर होते; मात्र आपण मनोरंजनासाठी देशाचे राजकारण करत नाही, याचे भान या राष्‍ट्रीय नेत्यांनी ठेवले तर व्यवस्था बदलाच्या दिशेने जाणा-या एका ऐतिहासिक निवडणुकीचा प्रचार देशात सुरू आहे, असे जग म्हणू शकेल. जागतिकीकरणानंतर देशात प्रचंड संपत्ती निर्माण झाली, मध्यमवर्गात मोठी भर पडली, काहींचे जीवनमान सुधारले आणि त्या माध्यमातून सुजन मतदार तयार होण्याची प्रक्रिया गतिमान झाली. दिल्लीतील बदल त्याचीच प्रचिती आहे. आता त्या सुजन मतदाराच्या भावनांना आवाहन करणारा अधिक परिपक्व प्रचार अपेक्षित आहे. आगामी निवडणुकीत तरी मागणीनुसार घोषणा आणि भाषणांचा सवंग पुरवठा करण्याऐवजी देशाला काय हवे आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहून राजकारणाला नवी दिशा देण्याची गरज आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांना मतदारांनी धडा शिकवला. आता तरी मुद्द्यावर या, असा इशारा दिला. तो इशारा या पक्षांच्या राष्‍ट्रीय नेत्यांनी गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. निवडून येण्यासाठी यापुढे सवंग चिखलफेक, हेच प्रचाराचे सूत्र राहिले तर ती मतदारांशी आणि या देशाशी राष्‍ट्रीय नेत्यांनी केलेली प्रतारणा ठरेल.