आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठे गेला पैसा ? (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्‍ट्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत डझनभर महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयांमुळे सरकारवर किती कोटी रुपयांचा बोजा पडणार, हे स्पष्ट झाले नसले तरी सरकार सध्याचाच बोजा पेलू शकत नाही, हेही त्यानिमित्ताने समोर आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी असे एक विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे की, सध्याच अर्थसंकल्पीय खर्चात 20 टक्के कपात करावी लागते तेव्हा कोठे सरकारचे भागते. आता 100 टक्के कपात करावी लागेल, असे त्यांनी सूचित केल्याचे म्हटले आहे. म्हणजे आता जनतेने कशाची तयारी ठेवायची हेही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले असते तर बरे झाले असते. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असे कसे म्हणू शकतात, हा खरा प्रश्नच आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा तेवढाच महत्त्वाचा असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे निर्णय तरी त्यांनी कसे होऊ दिले, असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.
एकमेकांच्या स्पर्धेत असलेले सत्ताधारी पक्ष राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवताना कोणत्या थराला जाऊ शकतात हेच यावरून दिसते. दिल्लीतील विजेचा प्रश्न सोडवायचा तर नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हाच प्रश्न विचारतात. ‘पण पैसा गेला कोठे?’ महाराष्‍ट्रात आणि देशभर टोल लावण्याचा किंवा काढण्याचा प्रश्न येतो तेव्हाही हाच ‘पैसा गेला कोठे’ प्रश्न पुन:पुन्हा समोर येतो. एवढेच काय, देशभरातील विकासकामे मार्गी लागत नाहीत तेव्हाही हाच प्रश्न समोर उभा ठाकतो. त्याचे उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मात्र, असेही दिसते की, 12 सिलिंडरसाठी सबसिडी मंजूर होते, अन्न सुरक्षेसाठी पैसा उपलब्ध होतो, त्याच न्यायाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी मिळते, अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर एक लाखाची मदत मिळू शकते, कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘कायम’ शब्द वगळून अनुदान देण्याचा निर्णय होऊ शकतो, पुष्पसंवर्धन संशोधन संचालनालयास मंजुरी मिळू शकते, ग्रामपंचायतींना उत्पन्न आणि लोकसंख्येनुसार अनुदानाचा निर्णय होऊ शकतो आणि बेरोजगार भत्त्यात वाढही होऊ शकते. एवढेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर होऊ शकतात. त्यातील महाराष्‍ट्रासंबंधीचे निर्णय तर एका दिवसात होऊ शकतात. मग इतके दिवस ते का होऊ शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतोच.
आश्चर्य म्हणजे त्याचेही उत्तर ‘पैसा कोठे गेला होता’ असे प्रतिप्रश्नाच्या रूपातच येते. तो कोठे गेला होता आणि आता एवढा खर्च करण्यासाठी तो कोठून आला, असे कळीचे प्रश्न पुढे येतात. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मायबाप राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारच देऊ शकतील. एक मान्य केले पाहिजे की, शिक्षण आणि आरोग्यासारख्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रातून स्वत:ची सुटका करून घेण्याचे कितीही प्रयत्न सरकारने केले तरी या प्राथमिक गरजा सरकारनेच भागवल्या पाहिजेत, हा जनतेच्या मनातील समज सरकार अजून दूर करू शकलेले नाही. जनतेची क्रयशक्ती इतकी कमी आहे की, तिला आताच खासगी क्षेत्राच्या हवाली करून आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत याची जाणीव सरकारला आहे, हेच बुधवारच्या निर्णयांनी सिद्ध केले आहे. जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी अजून खूप संपत्ती निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारांनी झपाटून काम करण्याची गरज आहे. जे हक्काचे आहे, ते वेळच्या वेळी जनतेच्या पदरात पडायला हवे. ते असे भिकेचे तुकडे टाकल्यासारखे दिले जाते, हे मानवी प्रतिष्ठेच्या दृष्टीने अपमानास्पदच आहे. मात्र, वेळच अशी आली आहे की, जे द्यायचे ते ताणून द्या. त्याचे महत्त्व वाढवून द्या. आणि उपकाराच्या भावनेने द्या, हा शिरस्ताच झाला आहे. मूळ प्रश्न आहे तो सरकारकडे पुरेसा महसूल जमा होत नाही. त्यामुळे सरकार सातत्याने कर्ज काढून सण साजरे करते आहे. बरे, सणाला कर्ज काढणे एकवेळ समजू शकतो; पण आता तर दररोजचे भागवण्यासाठीही कर्ज काढण्याची वेळ आलेली दिसते आहे. (संदर्भ - अजित पवार यांचे विधान) हे काही बरे नाही.
आमच्या माहितीनुसार सरकारने शिलकी अर्थसंकल्प सादर केला होता. असे असताना खर्चात 20 टक्के कपात करावी लागते, म्हणजे सरकारचा योजनाबाह्य खर्च जास्त झालेला आहे, हे उघडच आहे. खरे काय आहे ते त्यांचे त्यांनाच माहीत; पण या निर्णयांनी चार गोष्टी साधल्या. पहिली म्हणजे महाराष्‍ट्र सरकार म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, असा जो समज आहे तो या आठवड्यात खोटा ठरला आहे. दुसरे म्हणजे देशात विकासात आघाडीवर असलेले हे राज्य नेमके कसे चालले आहे, याविषयीचे कुतूहल जागे झाले आहे आणि तिसरे म्हणजे निवडणुकांची अधिसूचना आता कधीही निघू शकते. चौथे म्हणजे फार फार महत्त्वाचे म्हणजे बाकी काहीही असले तरी सरतेशेवटी सगळे कसे आलबेल आहे!