Home | Editorial | Agralekh | Editorial On mohan bhagwat

सांस्कृतिक दारिद्र्य (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jan 07, 2013, 04:00 AM IST

मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. संघ परिवार असे मानतो की ते ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’चे प्रचारक आहेत.

  • Editorial On mohan bhagwat

    मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. संघ परिवार असे मानतो की ते ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’चे प्रचारक आहेत. परंतु खुद्द सरसंघचालक भागवत हे भारतीय संस्कृतीबद्दल इतके अनभिज्ञ असू शकतील, असे अनेक भाजप समर्थकांनाही वाटले नसेल. ‘अनभिज्ञ’ हा शब्द आम्ही संघ परिवारासाठी वापरला. खरा शब्द आहे ‘अडाणी’! परंतु मोहन भागवत यांना ‘अडाणी’ म्हटलेले सुसंस्कृत-सुशिक्षित मध्यमवर्गीयांनाही कदाचित रुचणार नाही, म्हणून ‘आम आदमी’चा अडाणी हा शब्द आम्हा सामान्यांसाठी वापरला आणि मोहनरावांसाठी ‘अनभिज्ञ’ हा शब्द उपयोजिला. मोहनराव असे म्हणाले की, बलात्कार ग्रामीण भारतात होत नाहीत; कारण तेथे ‘भारतीय संस्कृती’चा प्रभाव आहे. स्त्रियांवरील हे अत्याचार शहरांमध्ये होतात; कारण तेथे ‘पाश्चिमात्य संस्कृती’चा अंमल आहे. ज्या वेळेस भागवत त्यांचे सांस्कृतिक अनभिज्ञतेचे तारे तोडत होते, तेव्हा मध्य प्रदेशातील एक ज्येष्ठ मंत्री कैलाश विजयवर्गीय स्त्रियांना असा उपदेश करत होते की, त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली की काय होते हेच अशा घटनांवरून दिसून येते. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, दिल्लीच्या त्या दुर्दैवी तरुणीने ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली म्हणून तिच्यावर असा निर्घृण बलात्कार झाला! किंवा कुणी भाजपच्या मंत्रिमहोदयांच्या वक्तव्याचा असाही अर्थ लावेल की, अशी ‘लक्ष्मणरेषा’ कुणा महिलेने ओलांडलीच तर जणू पुरुषांना अत्याचाराचा अधिकारच आहे!

    शहरे म्हणजे ‘इंडिया’ आणि ‘ग्रामीण’ म्हणजे ‘भारत’ अशी मोहनरावांनी व्याख्या करावी आणि त्याअनुषंगाने ‘पाश्चिमात्य’ व ‘भारतीय’ संस्कृतीचा उद्धार करावा, यावरून त्यांना देशातील शहरे आणि खेडी यापैकी कुठल्याच जीवनाचा गंध नाही, असे म्हणावे लागेल. कारण खेड्यांमध्ये आजही काही जमीनदार पुरुष स्त्रियांवर; मुख्यत: गरीब, दलित, शेतमजूर स्त्रियांवर कसे अत्याचार करतात, हे त्यांच्या गावीही नाही. खेड्यांमध्ये कित्येकदा पोलिस पाटीलही अशा अत्याचारांमध्ये सहभागी असतात. खेड्यांमध्ये मीडिया नसतो किंवा ब-याच वेळेस असला तरी तो अशा घटनांना तोंड फोडू शकत नाही. मीडियाही त्या खेड्यांमधील जाचक व्यवस्थेने बांधलेला असतो. प्रत्यक्षात सर्वात जास्त अत्याचार खेड्यांमध्ये होतात; परंतु ते प्रकाशात येत नाहीत, तेथील दादागिरीने तेथेच दडपले जातात. खरे म्हणजे शहरातील वा खेड्यातील बलात्कारही दडपले जातात.

    पोलिसांनीच केलेल्या एका अभ्यासात हे आढळून आले आहे की, 95 टक्के बलात्कार खेड्यात वा शहरात हे नात्यातील पुरुषांकडून, ओळखीपाळखीच्या माणसांकडून, परिचयातील शेजारीपाजारी पुरुषांकडून होतात. हे सर्व अत्याचार, ‘भारतात’ असो वा ‘इंडिया’त हे बहुतांश हिंदू समाजातच, हिंदूंकडूनच होतात. कारण देशातील 80 टक्के लोक विविध जातींमध्ये विभागलेले हिंदूच आहेत. खैरलांजीमधील हिंस्र बलात्कार आणि खून यांना देशव्यापी प्रसिद्धी मिळाली नाही, त्यावर टीव्ही पॅनल्सनी चर्चा केली नाही, परंतु ते अत्याचार मोहन भागवतांच्या ‘भारता’त झाले होते. त्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव कणमात्र नव्हता. शिवाय बलात्कार हे पाश्चिमात्य संस्कृतीचा आविष्कार आहेत, असा अगाध शोध लावणा-यांचे अनुयायी आज (खटला न चालवता) आठवडा- पंधरवड्यात आरोपीला फासावर लटकवावे, अशी मागणीही करत आहेत. सौदी अरेबिया, इराण वा तालिबानी अफगाण हे जी शिक्षा देतात तीच (तशीच रीतसर खटला न चालवता) भारतातही दिली जावी, अशी मागणी ही मंडळी करत आहेत. त्यांची भाषणे ऐकून व त्यांचे तथाकथित विद्वत्ताप्रचुर लेख वाचून या मंडळींना ‘हिंदू शरिया’ कायदा आपल्या देशात आणायचा आहे, हे उघड आहे. मुख्य म्हणजे हीच संस्कृतिसंपन्न हिंदुत्ववादी मंडळी हिंदू हा जन्मत:च सहिष्णू आहे आणि हिंदू ‘धर्म’ व संस्कृती हे स्वभावत:च उदारमतवादी आणि ‘सेक्युलर’ आहेत, असे म्हणतात! म्हणजे इस्लामी शरिया (जो असहिष्णू व अमानुष आहे) तोच हिंदू शरिया म्हणून लावल्यास आपोआप सुसंस्कृत होतो, असे त्यांचे मत आहे. असे सर्व अनैतिहासिक आणि अस्सल असंस्कृत विचार ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या मुशीतून येतात, हेच जागतिक मानवी संस्कृतीला लांच्छनास्पद आहे. याशिवाय भारतीय संस्कृतीत जशा अनेक उदात्त गोष्टी आहेत, तशाच कमालीच्या अश्लाघ्य कथाही आहेत.

    ज्या लक्ष्मणरेषेच्या गोष्टी भाजपच्या मंत्रिमहोदयांनी केल्या, त्यांना हेही माहीत असायला हवे की, सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडली ती ‘मर्यादा’ सोडून नव्हे तर एका भिक्षुक साधूला भिक्षा देण्यासाठी. म्हणजे दयाबुद्धीने. तो साधू रावण होता हे खरे, पण तो का आला? तर राम-लक्ष्मणांनी त्याच्या बहिणीचा घोर अपमान केला होता म्हणून. शिवाय या सर्वच कथा आहेत, इतिहास नव्हे! आणि जरी तो इतिहास मानला, तरी त्यातील सर्व गोष्टी अनुकरणीय नाहीत. राम एकपत्नीव्रती होता, पण त्यानेच सीतेला अग्निपरीक्षा करायला लावली, रावण राक्षस होता; पण त्याने सीतेच्या अंगाला हातही लावला नाही, हे सीतेनेच स्पष्ट केले. तिकडे द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू होताना तिचे पाचही पती तिची विटंबना पाहत बसले, हासुद्धा त्याच भारतीय संस्कृतीचा भाग आहे. मुद्दा हा आहे की काळाचे, परिस्थितीचे संदर्भ सोडून बेतालपणे उदाहरणे देऊन सद्य:स्थितीला जोडणे हे अडाणीपणाचेच नव्हे तर मूर्खपणाचेही आहे. परंतु सध्या, गेले तीन आठवडे मीडियामध्ये चर्चेच्या नावाखाली जो बेतालपणाला ऊत आला आहे, त्यामुळे आता खरे म्हणजे ‘बौद्धिक अत्याचार’ हाही एक गुन्हा मानावा की काय, असा विचार पुढे येऊ लागला आहे. पण सध्याच्या काळात बौद्धिक अत्याचार हाच मुळी ‘भाषण-लेखन स्वातंत्र्या’चा आविष्कार, असे मानले जाऊ लागले आहे. प्रगत संकल्पना व उदात्त विचारांचे विडंबन कसे करावे, हे आज आपण पाहत आहोत. हा काळाचा महिमा नाही, तर आपल्या सांस्कृतिक दारिद्र्याचा आविष्कार आहे.

Trending