आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दी गांधीवादी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीवाद हा विशिष्ट जीवनमूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. समस्त मानवतेच्या कल्याणाचा निस्सीम आग्रह धरतो. परंतु गांधीवाद केवळ जीवनमूल्ये वा जीवननिष्ठा रुजवत नाही तर समाज, देश आणि विश्वकल्याणाचा उदात्त हेतू प्रत्यक्षात आणण्यासाठी अत्यावश्यक अशी जिद्दही अंगी पेरतो. जीवनात कितीही खाचखळगे आले, कितीही आडवळणे आली तरीही ही जिद्द मुख्य ध्येयापासून हटू देत नाही. मोहन धारिया स्वभावत: असेच मुख्य ध्येयापासून कधीही न हटलेले जिद्दी गांधीवादी होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील होताना क्रांतीकारी विचारांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. मात्र वयपरत्वे गांधीजींच्या अहिंसक आचारविचारांचा खोलवर संस्कार झाला होता. या संस्कारात राजकारणापेक्षाही समाजकारण, पर्यायाने विश्वकारणाचा धागा सशक्त होता. याच सशक्त धाग्यात धारियांचे वनराई प्रकल्पाच्या माध्यमातून झालेले अराजकीय कार्य गुंफले गेले होते. म्हणूनच राजकारणात विशिष्ट उंची गाठूनही समाजनेता ही त्यांची ओळख ठळकपणे उठून दिसत होती.

गेली जवळपास 60-65 वर्षे पुण्याच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य घटक होऊन गेलेल्या धारियांचा मूळ पेशा वकिलीचा होता. मुंबई उच्च न्यायालयात अल्पकाळ वकिली केलेल्या धारियांनी जेव्हा राजकीय धारेत स्वत:ला झोकून द्यायचे ठरवले, तेव्हा गांधीवादी विचारांचे बोट न सोडता प्रजा समाजवादी पार्टीची निवड केली होती. तो काळ अर्थातच गांधी-नेहरूवादाने भारावून जाण्याचा होता, राजकारणाच्या इतर विविध प्रवाहांत वावरणा-यांनाही या प्रभावापासून फार काळ मुक्त राहणे शक्य नव्हते. कालांतराने धारियादेखील काँग्रेसच्या मुख्य धारेत सामील झाले होते. अंगी जशी जिद्द होती, तसाच संयमही होता. आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी पुणे नगरपालिकेपासून करणे हे त्यांच्या संयमी वृत्तीचे द्योतक होते. तळागाळातल्या माणसांशी जोडले गेल्याने राजकारणाची मुळे घट्ट रुजली होती. त्याच बळावर त्यांचा राजकीय प्रवास होणेही अपेक्षित होते. राज्यसभेचे सभासदत्व मिळाल्यामुळे साठच्या दशकाच्या मध्यावर त्यांची राजकीय कारकीर्द नव्या वळणाला लागली होती. दरबारी राजकारण करणे त्यांना सहज शक्य होते, परंतु जनसामान्यांशी नाळ जुळल्यामुळेच जनतेने निवडून दिलेला नेता ही ओळख अधिक महत्त्वाची आहे, हेही त्यांनी जाणले होते. राज्यसभेच्या अनुभवानंतर पाचव्या लोकसभेत ते निवडून गेले आणि पुढची जवळपास सात-आठ वर्षे त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या सर्वार्थाने वादळी घडामोडींची ठरली. याच काळात देशाच्या राजकारणात इंदिरा गांधींचा जम बसू लागला होता. बांगलादेशचे युद्ध, अन्नधान्य तुटवडा, संप, बेरोजगारी आदींमुळे जनतेमधील असंतोष वाढत चालला होता. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत इंदिराविरोधक सत्ताबदल घडवून आणण्याच्या हेतूने घातक योजना रचत होते.

धारिया या काळात केंद्रात राज्यमंत्रिपदी विराजमान होते. परंतु आणीबाणी लागू करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी घटनेत सुधारणा करवून घेतल्या. धारियांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्या क्षणापासून धारियांच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. जीवनाच्या एका टप्प्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जयप्रकाश नारायण यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे मोरारजीप्रणीत जनता सरकारात धारियांना केंद्रीय वाणिज्य मंत्रिपद मिळाले. परंतु हे ‘खिचडी’ सरकार फार काळ टिकले नाही. जनता पक्ष फुटला. अशा वेळी भारतीय जनसंघात जाण्याचा पर्याय धारियांपुढे खुला होता. परंतु सेक्युलरिझमवरील श्रद्धा ढळू न देता त्यांनी तो नाकारला. गांधीवादाने पेरलेली त्यांच्यातील जिद्द इथे प्रकर्षाने झळकली. एरवीही, आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कधीही जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. संधीसाधू वा भांडवलशाही विचारांच्या पक्ष-संघटनांशी स्वत:ला जोडून घेतले नाही. वा अनवधानाने त्यांची बाजूही घेतली नाही. ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी राजकीय क्षितिजावर ब-याच मोठ्या उलथापालथी घडत असताना, राज्याच्या सामाजिक क्षेत्रात, विशेषत: पाणलोट विकासक्षेत्रात पथदर्शी उपक्रम आकारास येत होते. त्यात एका बाजूला द्वारकादास लोहिया, विजयअण्णा बोराडे, गंगावणे ही मंडळी मराठवाडा, कोकण प्रांतात कार्यरत होती.

देशाच्या पर्यावरणविषयक चळवळीतले बिनीचे शिलेदार ठरलेले अनिल अग्रवाल यांनी उचलून धरल्याने अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी प्रकल्पाची चर्चा होत होती. अशा वेळी पुण्याचे कृषिशास्त्रज्ञ भागवतराव धोंडे यांनी धारियांमधील निष्ठावान गांधीवाद्यास आवाहन करून पाणलोट क्षेत्रात कार्य करण्याविषयी सुचवले. पर्यावरणीय दारिद्र्य आर्थिक दारिद्र्याला जन्म देते. किंबहुना, पाण्याच्या स्वातंत्र्यावरच आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून असते, ही त्यांच्यातील जाणीव धोंडेंच्या संपर्कात आल्यानंतर अधिक ठळक झाली. त्यातूनच वनराई या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. राजकीयदृष्ट्या अडगळीत जाण्याआधीच धारियांच्या कारकीर्दीला नवा आयाम मिळाला. टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या जवळपास अडीचशे खेड्यांत वनराईचे काम विस्तारले. वनीकरणापासून पशुपालन, साक्षरता, कुटुंब नियोजन, रोजगार आदी क्षेत्रांत संस्थेने आपले योगदान दिले. मुख्य म्हणजे, हे करताना शहरी लोकांत निसर्गविषयक जाणीव निर्माण करण्यातही त्यांना यश आले. एक प्रकारे गांधींजींनी पाहिलेले स्वयंपूर्ण खेड्यांचे स्वप्नच ते प्रत्यक्षात आणत होते. दरम्यान, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद त्यांना मिळाले. एका अर्थाने हा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा अत्युच्च क्षण ठरला. येथेच त्यांनी विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्य करणा-या डॉ. स्वामिनाथन, बंकर रॉय-अरुणा रॉय, सुंदरलाल बहुगुणा आदीं दिग्गजांशी स्वत:ला जोडून घेतले. जगण्याचा एक वेगळा पदर समजून घेतला. अखेरच्या दिवसापर्यंत धारियांनी स्वत:ला वनराईच्या कार्यात झोकून दिले. वृद्धत्व गोंजारत बसण्यापेक्षा या कार्यात ते व्यग्र राहिले. म्हणूनच सामान्यातला सामान्य माणूस त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अखेरपर्यंत त्यांच्याकडे येत राहिला आणि विश्वकल्याणाचा ध्यास मनी ठेवून एका जिद्दीने ते त्याची पाठराखण करत राहिले.