आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारक निर्णय (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक मुंबईच्या महापौर निवासस्थानाच्या परिसरात उभारण्यास परवानगी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगल्या तत्त्वांना मारक ठरणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी होऊन ते पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यानंतर सत्ता स्थापन करताना भाजपने हीन वागणूक दिल्यानंतरही शिवसेना सत्तेत आशाळभूतपणे सहभागी झाली. सरकारमध्ये असूनही शिवसेनेचे वर्तन कायम विरोधी पक्षासारखेच राहिले. अगदी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह अन्य ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्यात हे दोन्ही ‘मित्र’पक्ष एकमेकांच्या उरावर बसले होते. हा पराकोटीला पोहोचलेला तणाव निवळण्यासाठीच व आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा मंजूर केली. दादर चौपाटीलगत असलेले मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान हे पुरातत्त्व कायद्यानुसार ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित झालेले आहे. अशा वास्तूमध्ये काही फेरबदल करायचे असतील किंवा त्याच्या परिसरात काही बांधकामे करायची असतील तर त्यासाठी पुरातत्त्व खात्याची संमती मिळणे आवश्यक असते. तसेच हे निवासस्थान समुद्रालगत असल्याने सीअारझेड कायद्याचे बंधनही आहेच. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरातत्त्व व सीआरझेड कायद्याच्या कचाट्यातून नेमकी काय पळवाट काढली, याचा तपशील जनतेसमोर उघड झाला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्यात आली त्याला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेला विरोध योग्यच आहे. मात्र, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देणाऱ्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीही तशीच भव्य जागा निवडायला हवी, ही राज ठाकरे यांनी केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. इंदू मिलची जागा ही काही ऐतिहासिक वारसा वास्तूमध्ये समाविष्ट नव्हती. दादरला चैत्यभूमी असल्याने त्याच्यालगतच डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी इंदू मिलची जागा अत्यंत योग्य अशीच आहे. मात्र, दादरचे महापौर निवासस्थान भायखळा येथील जिजामाता उद्यान परिसरात हलवून त्या जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यास परवानगी देणे हा निर्णय अयोग्य आहे. मुंबई महानगरपालिका, राज्य व केंद्र शासनाकडे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचे अनेक भूखंड ताब्यात आहेत. त्यापैकी एखादा भूखंड शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी दिला असता तर कोणीही आक्षेप घेतला नसता. शिवसेनाप्रमुखांवर शिवाजी पार्कमधील ज्या जागेत अंत्यसंस्कार झाले ती जागा आता शक्तिस्थळ म्हणून ओळखली जाते. त्यापासून जवळच पुन्हा शिवसेनाप्रमुखांची स्मृती जागवणारी दुसरी वास्तू उभारणे हे चुकीचेच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागे लागले आहेत. महाराष्ट्रात फडणवीस सरकार शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या उभारणीसाठी झटत आहे! त्यामुळे फडणवीस यांची ओळख यापुढे ‘स्मारक उभारणी मुख्यमंत्री' अशी होण्यास वाव आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक करायचेच असेल तर ते जनतेतून गोळा केलेल्या निधीतून भूखंड खरेदी करून उभारणे हाही एक चांगला पर्याय होता.
कन्याकुमारी येथील विवेकानंदांचे स्मारक एकनाथ रानडे यांनी लोकवर्गणीतून उभारले होते. या स्मारकासाठी सरकारी मदतीची याचना रानडेंनी कधीही केली नव्हती. मार्मिक, शिवसेनेचा जन्म दादरमध्येच झाला. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक दादरमध्येच व्हावे अशी शिवसेनेची भावना असल्यास ते चुकीचे नाही, पण त्यासाठी दादरमधील सार्वजनिक मालमत्तेवर डोळा ठेवू नये. महापौर बंगल्यालाच लागून असलेल्या सावरकर स्मारकाचे काम रखडले होते, तेव्हा त्या जागेत व्यावसायिक बांधकाम करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय तेथील विश्वस्तांनी घेतला. त्या वेळी ‘सावरकर स्मारक परिसरात व्यावसायिक बांधकाम झाले तर मुंबई महानगरपालिका ती जागा ताब्यात घेईल,' असा इशारा शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. मात्र, पुढे सावरकर स्मारकात व्यावसायिक बांधकामे होऊन स्मारकाचे कामही पूर्णत्वाला गेले व शिवसेनाप्रमुख आपलाच इशारा सोयीस्करपणे विसरले होते! दादरला महात्मा गांधी जलतरण तलाव नव्याने बांधल्यानंतर तिथे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा आढावा घेणारे एक कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या या प्रदर्शनाची आता हेळसांड सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यासाठी झटणाऱ्यांच्या दिव्याखालील हा अंधार आहे. तो अंधार डोळ्यांत खुपणाऱ्या सुजाण जनतेने डोळे उघडे ठेवून शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर निवासस्थानी होण्यास विरोध करायला हवा.