आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवयुगाचा नामदेव(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माणूस मोठा होण्यासाठी तो अगोदर मरावा लागतो, मगच मराठी माणूस त्याला ‘मोठा’ म्हणून ओळखतो’, नामदेव ढसाळ यांनी मराठी माणसाचे सांगितलेले हे व्यवच्छेदक लक्षण होते अण्णाभाऊ साठेंच्या संबंधातले! पण आज ते ढसाळांच्या ‘मोठेपणालाच’ लागू पडते आहे. नामदेव ढसाळांना कवी म्हणून सर्व जण ओळखतात. ‘दलित’ कवी अशी उपाधी लावून कधी कधी त्यांची ‘जागा’ही दाखवायचा प्रयत्न होतो; परंतु ढसाळ हे विचारवंत होते, स्वयंप्रकाशी प्रज्ञावंत होते आणि अगदी लौकिक अर्थाने व्यासंगी-विद्वान होते, असे सर्वसाधारणपणे कुणी सांगत नाही. त्यात ‘विचारवंत’ ही संज्ञा सध्या मराठी उच्चभ्रू वर्तुळात काहीशी टिंगल-टवाळीसाठीच वापरली जाते. शिवाय व्यासंगी, विद्वान, विचारवंत अशी विशेषणे मुख्यत: उच्चवर्णीय आणि अलीकडे पाश्चिमात्य साहित्य-तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणा-यांसाठी राखून ठेवलेली असतात.
टॉम वुल्फ यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध कादंबरीत (रॅडिकल शीक) अमेरिकेतील ‘लेफ्ट इंटलेक्चुअल्स’ कसे शहाजोग आणि स्वयंभू शहाणे असतात, याचे चित्रण केले आहे. युरोप-अमेरिकेत जात नसली तरी अशी विभागणी आणि उतरंड असतेच! हा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे, नामदेव ढसाळ हे कोणत्याही साहित्य वा तत्त्वज्ञानाच्या प्रतिष्ठित प्राध्यापकांच्या परिषदेत त्यांना सहज लाजवू शकले असते आणि त्यांचा विचारवंती बुरखा फाडू शकले असते. ढसाळांचा व्यासंग तत्त्वज्ञान, मार्क्सवाद, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र, अस्तित्ववाद, वास्तववाद, मानसशास्त्र, अमूर्तवाद अशा अनेक शाखांमध्ये होता. ते एखाद्या कवीवर वा कवितेवर भाष्य करतानाही अशा अनेक वैचारिक हिंदोळ्यांवर बसून करीत. स्वत: सर्जनशील कवी-लेखक असूनही ते भल्याभल्या समीक्षकांपेक्षा वेगळी, पूर्णपणे अपारंपरिक अशी समीक्षा करू शकत असत. कारण त्यांचा तत्त्वज्ञानाचा आणि साहित्याचा प्रकांड अभ्यास आणि स्वतंत्र चिंतनशीलता. आपल्या, विशेषत: मराठी साहित्यनिर्मितीबद्दल आणि साहित्यिकांच्या संकुचित विश्वाबद्दल त्यांनी एकदा उद्वेगाने म्हटले होते, ‘पाश्चिमात्य देशांमध्ये मनुष्यत्व जपण्यासाठी ललितकला आणि वैश्विक वाङ्मयाच्या चळवळी हातात हात घालून घडत जात असतात... या उत्थानाचे जाहीरनामे तिथे एखादा कवी लिहितो, एखादा चित्रकार लिहितो (वा पेंट करतो). आपल्याकडे हे घडताना दिसत नाही... साहित्य-कला-प्रक्रिया प्रयोगांचे उगमस्थान कधी रशिया असते, कधी जर्मनी, कधी फ्रान्स, तर कधी ग्रीक-रोमन संस्कृतीच्या शिल्पाच्या अंगाने, तर कधी युरोपातील इतर देश चित्रकला आणि कवितेच्या अंगाने इंप्रेशनिझम, सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्युबिझम, फ्यूचरिझम असे करत करत अगदी पॉप व रॅप आर्टलाही कवेत घेतो.
परंपरावाद्यांच्या जाचक प्रभावामुळे मराठी साहित्यात असे काही घडू शकले नाही.’ हा परिच्छेद केवळ नमुन्यादाखल उद्धृत केला. ‘दलित कवी’ असा शब्दप्रयोग रूढ झाला; पण ‘दलित इंटलेक्च्युअल’ अशी संज्ञा मात्र रूढ झाली नाही. एक प्रकारे ते बरे झाले; कारण कवी वा विचारवंत हा त्याच्या जातीवरून, रंगावरून वा वंशावरून ओळखला जाता कामा नये; परंतु समाजप्रक्रियेच्या एका टप्प्यावर हे जगभर झाले आहे. अमेरिकेतही ‘ब्लॅक लिटरेचर’ वा ‘नेटिव्ह अमेरिकन वर्ल्डव्ह्यू’ या संज्ञा रूढ झाल्या. त्या अर्थाने एक समांतर, वेगळा, प्रभावी प्रवाह म्हणून दलित साहित्य स्फोटक पद्धतीने पुढे आले. नामदेव ढसाळ आणि त्यांचे सवंगडी ज. वि. पवार, भाई संगारे, दया पवार, अविनाश महातेकर, राजा ढाले अशी एक मोठी कवींची फौज सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला एखादा आकस्मिक स्फोट व्हावा, अशा रीतीने प्रगट झाली. या मंडळींनी प्रस्थापित दलित नेतृत्वाबद्दल फक्त गंभीर आक्षेपच घेतले नाहीत, तर अंतर्गत बंडाचा झेंडाच फडकावला. ते बंड म्हणजेच ‘दलित पँथर’! पँथरची अधिकृत घोषणा 1972मध्ये झाली असली तर साठीच्या दशकाच्या उत्तरार्धातच प्रक्षोभाचे सुरुंग फुटू लागले होते. साठीच्या त्या काळात म्हणजे मुख्यत: 1966 ते 1970/72 या काळात देशाच्या अनेक ठिकाणात जे उद्रेक झाले, त्यालाच समांतर असा हा दलित पँथर्सचा उद्रेक होता. नक्षलवादाचा उठावही त्याच काळातला. महाराष्ट्रात एका बाजूला युक्रांद आणि दुस-या बाजूला शिवसेना हे प्रक्षोभही साठीच्या दशकातले. खरे म्हणजे असे उद्रेक जगभर होत होते.
चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती, फ्रान्समधील युवा आंदोलनाचा उग्र आविष्कार, अमेरिकेत वंशद्वेषाचे वातावरण आणि त्या विद्वेषी वातावरणात झालेली कृष्णवर्णीय नेता मार्टिन ल्यूथर किंगची निर्घृण हत्या अशा अनेक घटना घडत होत्या. हा कॅन्व्हास होता ‘ब्लॅक पँथर्स’च्या जन्माचा. अमेरिकेतील लढाऊ कृष्णवर्णीयांनी पुकारलेला तो संघर्ष जगभर अनेकांना स्फूर्तिदायक ठरला. ‘दलित पँथर्स’ हे नाव या लढाऊ, तरुण कवींनी घेतले ते ‘ब्लॅक पँथर्स’वरूनच. या पार्श्वभूमीवर अनेक ‘ब्लॅक’ कवी, लेखक, नाटककार भारतात वाचले जाऊ लागले. त्या काळात टीव्ही, मोबाइल, आयपॅड असे काहीही नसताना या समांतर ‘ब्लॅक लिटरेचर’चा आणि ‘ब्लॅक पँथर्स’चा प्रसार प्रचंड झपाट्याने झाला. या तरुण, लढाऊ, दलित कवींनी त्यांची समांतर कवी संमेलने भरवायला सुरुवात केली. त्यापैकी अनेकांनी मार्क्सवादाचा अभ्यास सुरू केला. काही जण मार्क्सवादाच्या दिशेने गेले, तर काही मार्क्सवाद-विरोधाच्या. काहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्स यांच्यात समान सूत्र सापडले, तर काहींना बौद्धविचारात मार्क्सवादाची बीजे सापडली. नामदेव ढसाळ यांचा व्यासंग सुरू झाला तो त्या चर्चांमधून, बौद्धिक मंथनातून आणि वादविवादातून. जे जे काही प्रस्थापित विचार आहेत त्यांचा आणि जे जे प्रस्थापित-विरोधी आहे त्याचा अभ्यास करायला हवा, असे ढसाळ यांना वाटत असे. महाराष्ट्रातील संतसाहित्याचा पुनश्च आणि नव्याने अभ्यास सुरू झाला आणि त्यातील बंडखोरी प्रत्ययास येऊ लागली, तीही याच काळात. ‘सत्यकथे’च्या पठडीत वाढलेल्या साहित्यिक- समीक्षकांना ही नवी दलित कविता म्हणजे एक ऊटपटांग टपोरीगिरी वाटली.
हळूहळू त्यांना त्यातील साहित्ययुग दिसू लागले. नारायण सुर्वे आणि बाबूराव बागूल हे तसे अगोदरच्या पिढीतले; पण त्यांनी दलित पँथर्सचे स्वागत केले आणि प्रचारही केला. काही समाजवादी व कम्युनिस्ट नेते व अभ्यासकही पँथर्सच्या बाजूने या सांस्कृतिक संघर्षात उतरले. मुंबईतील बीडीडी चाळ प्रदेश हा या लढ्याचा बालेकिल्ला झाला. या सर्व संघर्षपर्वाचे अनभिषिक्त सम्राट होते नामदेव ढसाळ. पुढे काही वर्षांनी अशा उत्स्फूर्त चळवळींचे जे होते तेच झाले. दलित पँथर्स ही रिपब्लिकन पक्षातील प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देऊन जन्माला आली होती. पुढे त्यांच्यापैकी काही पँथर्सवर ‘नवे प्रस्थापित’ म्हणून टीका होऊ लागली. डॉ. आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर रिपब्लिकन चळवळ फुटली होती- आता दलित पँथर फुटू लागली. त्यांच्यातील कविता जिवंत राहिली; पण उद्रेकातील उत्स्फूर्तता कमी होऊ लागली. नामदेव ढसाळ या उद्रेकाचे सर्वात प्रगल्भ उद््गाते होते, पण ते आता एकाकी होऊ लागले. त्यांनी शिवसेनेची साथ केल्यावर त्यांच्यावर टीकाही झाली; पण शिवसेनेतील तरुणांच्या उत्स्फूर्ततेला ते दाद देत होते. ढसाळांनी हिंदुत्ववादी तत्त्वज्ञानाचा (वा मोदीवादाचा) पुरस्कार कधीही केला नाही आणि शिवसेनेची साथ सोडली नाही. डॉ. आंबेडकर यांच्या एकूण तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास सखोल होता आणि त्याचबरोबर इतरही जगभरच्या समांतर तत्त्वज्ञानाचा. त्यामुळे महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर हा ढसाळांच्या दृष्टिकोनातून पुरोगामी जप नव्हता, तर ते जीवनाचे सार होते. वैश्विकतेचा अर्थ लावण्यासाठी आणि ते सार अधिक प्रभावी करण्यासाठी कार्ल मार्क्सपासून अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची मदत घ्यायला हवी, असे ते म्हणत. विचार व साहित्य संकुचित असून चालणार नाही, हे सूत्र त्यांनी जपले आणि प्रचारातही आणले. ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ या कवितासंग्रहात त्यांनी त्यांची अखेरची वेदना मांडली आहे.
‘हे हात कुणाचे, कलावंताचे की विध्वंसकाचे
रचनाकारांचे की विनाशकर्त्यांचे
फिरतो आहे चाकावर पाणीदार
लवचिक मुलायम मातीचा गोळा
हे निर्मात्यांनो, हे सर्जकांनो
नका घडवू आता नव्याने-मनुष्यजातीचा पुतळा...’