आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासुपरमॅन मोदी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जगभरच्या चित्रपटगृहांमध्ये नवा ‘थ्रीडी’ सुपरमॅन एकदम जोरात सुरू आहे. सर्व आबालवृद्ध प्रेक्षक सुपरमॅनच्या अचाट सामर्थ्यावर, कौशल्यावर, वेगवान चपळाईवर आणि विलक्षण बुद्धिचातुर्यावर फिदा झालेले आहेत. परंतु आपल्या देशातील कट्टर रजनीकांतवादी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून सुपरमॅन तितका अचाट नाही. रजनीकांत हा सुपरमॅनपेक्षा कितीतरी अधिक समर्थ आहे, असे त्यांचे मत आहे. आता मात्र सुपरमॅन आणि रजनीकांत दोघांना काखोटीत घेऊन हनुमानापेक्षाही अधिक सामर्थ्यशील असा ‘महासुपरमॅन’ जगभर आपले चमत्कार दाखवत फिरू लागल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोघेही चिंताग्रस्त झाले आहेत. त्या दोघांनी आता सिस्टिम हॅकर एडवर्ड स्नोडेन याच्या संबंधातील मतभेद बाजूला ठेवून या नव्या महासुपरमॅनशी कसा सामना करायचा याचा संयुक्तपणे विचार सुरू केला आहे. नरेंद्र मोदी नावाचा हा महासुपरमॅन आज ना उद्या अमेरिकन महासत्तेला महाग पडेल, हे त्या देशाने केव्हाच ओळखले होते. या ‘नरेंद्रा’ला एकदा व्हिसा दिला की तो (इतर अनेक अनिवासी भारतीय-गुजरात्यांप्रमाणे!) परत गांधीनगरला जाणारच नाही आणि थेट व्हाइट हाऊसच काबीज करेल, अशी धास्ती अमेरिकनांना वाटत होती म्हणूनच त्यांनी मोदींना व्हिसा नाकारला. पण आता अमेरिकनांना वाटू लागले आहे की, हा नरेंद्रभाई त्याच्या अचाट सामर्थ्यामुळे व्हिसा न घेताच अमेरिकेत येऊन व्हाइट हाऊसवर दावा सांगेल. ज्याप्रमाणे भारतात निवडणुका होण्यापूर्वीच त्याने स्वत:ला पंतप्रधान म्हणून घोषित केले आहे, त्याचप्रमाणे तो एखाद्या दिवशी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचीही शपथ घेईल. मोदी नावाचा हा महासुपरमॅन रजनीकांतपेक्षा पॉवरबाज झाला तेव्हाच जगाने त्याचे सामर्थ्य ओळखले आणि अमेरिकेने नवा सत्तासमतोल निर्माण करण्याचे ठरवले. डॉ. मनमोहनसिंग तर इतके हादरले की त्यांनी एकाच वेळेस जपान, चीन, रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबर नव्याने वाटाघाटी सुरू केल्या. भारताचे पंतप्रधान जेव्हा जपानला गेले तेव्हा अनेक भाष्यकारांना वाटले की, चीनला शह द्यायला म्हणून ते तिकडे गेले आहेत. पंतप्रधानांनी अमेरिका भेट ठरवली तेव्हा पंडित मंडळींना वाटले की, महासत्तेला हाताशी धरून आपले दक्षिण आशियातील महत्त्व वाढवण्याचा त्यांचा उद्देश होता. परंतु हे कुणाच्याही लक्षात आले नाही की या सर्व भेटीगाठी आणि वाटाघाटी सुरू झाल्या त्या महासुपरमॅन मोदींच्या महागुजरात या नव्या महासत्तेला शह देण्यासाठी! मोदींचा महागुजरात आता भारताचे एक राज्य म्हणून ओळखले जात नाही, तर भारत हे महागुजरातमधील एक राज्य म्हणून ओळखले जाते. महंमद अली जिना हे गुजरातचे होते. लालकृष्ण अडवाणींनी त्यांची प्रशंसा केल्यामुळे पाकिस्तानला नैतिक बळ प्राप्त झाले होते. परंतु मोदींनी एका झटक्यात अडवाणी व पाकिस्तान दोघांना काटशह देऊन नवीन डाव टाकला आहे. या खेळीनुसार पाकिस्तानच महागुजरातमध्ये विलीन होईल आणि गुजरातच्या सीमेवरचा भारत-पाकिस्तान वाद कायमचा संपुष्टात येईल. पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय यांनी त्यांचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न विचारताच महागुजरातमध्ये विलीन व्हायचा निर्णय घेतला, असे परवाच मोदींच्या पब्लिक रिलेशन एजन्सीने जाहीर केले. परिणामी नवाझ शरीफ हे आता मोदींच्या हाताखालचे एक मंत्री म्हणून पाकिस्तानचा कारभार पाहतील, ज्याप्रमाणे भारताचा कारभार डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडेच तूर्तास ठेवण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. या सप्टेंबरमध्ये डॉ. मनमोहनसिंग यांच्या वयाची 81 वर्षे पूर्ण होतील. त्या दिवशी त्यांना निवृत्त करून अमित शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा मोदींचा मानस आहे. राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देऊन गुजरातप्रमाणे ‘मºहाटी’ राज्याचे नवनिर्माण करण्याचा फतवाही मोदींनी काढला आहे. उद्धव ठाकरेंनी काही गडबड केल्यास त्यांचा पुरता बंदोबस्त करण्याचे आदेशही राज ठाकरेंना मिळालेले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. परंतु महाराष्ट्रात कोणताही उद्योग-प्रकल्प आणायचा झाल्यास मोदींकडून ‘एनओसी’ आणावी लागेल, असे बंधन राज ठाकरेंवर आहे. अंबानी, अदानी, टाटा इतकेच काय, सर्व विदेशी उद्योगपती सर्वप्रथम ‘व्हायब्रंट गुजरात’साठी भांडवल व तंत्रज्ञान आणतील. काही उरलेसुरले भांडवल राज ठाकरेंकडे दिले जाईल. मुंबई शहर महाराष्ट्राला मिळाल्यापासून गुजरातची महाराष्ट्रावर खुन्नस आहे. ‘मुंबई तुमची, पण भांडी घासा आमची’ अशी म्हणही एकेकाळी गुजराती समाजात लोकप्रिय होती. महाराष्ट्रातील बहुसंख्य उद्योग-व्यापारच नव्हे, तर शेअर बाजारही गुजराती-मारवाडी दलालांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्राचा जो काही विकास झाला आहे तो गुजराती-मारवाडी भांडवलदारांमुळे झाला आहे, असे त्यांचे मत आहे. साहजिकच मोदींचेही तेच मत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला महागुजरातचे एक उपराज्य म्हणून मानले जावे, असाही प्रस्ताव मोदींपुढे आहे. म्हणजेच राज ठाकरे यांना मोदींचे एक अंकित सुभेदार असे स्थान मिळेल.
एकदा महागुजरात या राज्याची भारतीय उपखंडातील एक महासत्ता म्हणून स्थापना झाली की मोदी त्यांचे लष्कर, नौदल व हवाई दल उभारायला घेतील. सध्याची भारताची ही सर्व दले महागुजरातच्या सेना दलात विलीन होतील. महागुजरातला राष्ट्रपती असणार नाही. मोदींची नियुक्ती महासुपरमॅन महामंत्री म्हणून होईल. ही नवी राजवट किती उत्तम प्रकारे कारभार करेल याची झलक मोदींनी उत्तराखंडमधील महापुराच्या अरिष्टसमयी दिली आहे. मोदींनी केवळ 70-75 इनोव्हा कार उत्तराखंडच्या अतिशय दुर्गम भागात नेल्या होत्या, पण त्या कार आणि त्यांच्या सरकारची हेलिकॉप्टर्स यांचा वापर करून त्यांनी पंधरा हजार गुजराती माणसांना सुरक्षित स्थळी हलवले. बलाढ्य अमेरिकन हवाई दल, लष्कर व नौदलही असा विक्रम करू शकत नाहीत. त्यामुळे मोदींची ही अचाट कार्यक्षमता ऊर्फ ‘गव्हर्नन्स’ पाहूनच वर म्हटल्याप्रमाणे ओबामांनी पुतीन यांची भेट घेतली होती. उत्तराखंडच्या पुरात देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक यात्रेकरू व पर्यटक अडकले होते. त्यातून नेमके गुजराती यात्रेकरू शोधून त्यांना वाचवणे सोपे नव्हते. काही संकुचित विचारांची माणसे (उदा. उद्धव ठाकरे) असे विचारतात की, मोदींनी फक्त गुजराती लोकांनाच का वाचवले? उत्तर स्पष्ट आहे. गुजरात वाचला तरच महागुजरात आणि पर्यायाने ‘महा-भारत’ निर्माण होईल. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश हे सर्व अकार्यक्षम, दरिद्री आणि लोकसंख्येचे अधिक ओझे असलेले प्रदेश आहेत. एक-एक गुजराती माणूस किमान 100 भारतीयांच्या समान आहे. म्हणून मोदींनी त्यांना वाचवले. एकदा हा नवा सत्तासमतोल तयार होऊन महासुपरमॅनचा महागुजरात प्रस्थापित झाला की नरेंद्र मोदी नवे कॅलेंडर बनवणार आहेत. मोदी-पूर्व आणि मोदी-उत्तर असे कालमापन केले जाईल. शालिवाहन शक वगैरे कायमचे इतिहासजमा होईल!