आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकला मराठी बाणा (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महाराष्ट्राची राजधानी. त्यामुळे मुंबई जिंकली की महाराष्ट्र पादाक्रांत केला, असे नरेंद्र मोदींना वाटणे स्वाभाविक होते. शिवाय शिवाजी महाराजांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी सुरतेची वखार लुटल्यापासून गुजराती व्यापारी मराठी माणसावर खुन्नस ठेवून आहेत. महाराष्ट्राला पाण्यात बघण्याची वा मराठी माणसाची खिल्ली उडवायची एकही संधी ते सोडत नाहीत. खरे म्हणजे, सर्व सहा कोटी गुजराती माणसे अशी नाहीत. शेकडो मराठी नाटके, कादंबर्‍या, कथा, कविता गुजराती भाषेत रूपांतरित झाल्या आहेत. भाषांतरित मराठी नाटकांचे प्रयोगही गुजरातमध्ये होतात. सुमारे सात लाख मराठी माणसे गुजरातमध्ये वास्तव्य करून आहेत. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा दबदबा जसा गुजरातेत आहे, तसाच महाराष्ट्रातही आहे. बडोदा-अहमदाबादमध्ये महाराष्ट्र मंडळे आहेत आणि तेथे मराठी साहित्य संमेलनेही होतात. परंतु हे झाले सांस्कृतिक संबंध. त्यांना समांतर आहेत व्यापारी संबंध. गुजराती व्यापारी वृत्ती-प्रवृत्ती अशा साहित्य-कला वृत्ती-प्रवृत्तींना छेद देतात. मुंबईच्या शेअर बाजारातील बहुसंख्य दलाल गुजराती आहेत. बाकी मारवाडी आहेत. मराठी ब्रोकर नावापुरतेच. मुंबईच्या आता अस्तंगत झालेल्या कापड गिरण्या गुजराती किंवा मारवाडी मालकीच्या; पण कामगार मात्र सर्व मराठी. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात भांडवलदार-कामगार असा वर्गसंघर्ष उभा राहिला होता. भांडवलदार वर्गाला मुंबई महाराष्ट्रात येऊ द्यायची नव्हती आणि कामगारवर्गाला ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ हवा होता. महाराष्ट्राला अतिशय तेजस्वी असा सांस्कृतिक वारसा आहे आणि लढाऊ-स्वाभिमानी अशी परंपरा आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम आणि शिवाजी महाराज असे दोन्ही प्रवाह मराठी माणसांच्या नसानसात आहेत. त्यातूनच ‘मराठी बाणा’ नावाचा स्वभावविशेष निर्माण झाला आहे. महाराष्ट्राने गुजरातला कधीही कमी लेखले नाही. उलट त्यांच्या व्यापारी साहसाचे कौतुकच केले. पण त्या मराठी मनाच्या औदार्याचा चुकीचा अर्थ काही मतलबी गुजराती समाजाने लावला. त्यातूनच ‘मुंबई तुमची-तर भांडी घासा आमची’ अशी उद्दाम प्रवृत्ती त्यांच्यापैकी काही जणांमध्ये निर्माण झाली. त्याच उद्दामपणाचे दर्शन मराठी-मुंबईकरांना व पर्यायाने महाराष्ट्राला रविवारी झाले. नरेंद्र मोदींनी ज्या वांद्रे संकुलात त्यांची विराट सभा घेतली, तो परिसर बाळासाहेब ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. बाळासाहेबांना जाऊन जेमतेम एकच वर्ष झाले. पण नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांच्या अचाट लोकप्रियतेला ना दाद दिली ना त्यांचा उल्लेख भाषणात केला. किंबहुना सभेला आलेल्या लोकांना मोदीमहाशयांनी गुजरात कसा कर्तबगार आहे, गुजराती समाज कसा श्रीमंत आहे आणि महाराष्ट्र कसा मागासलेला व कर्मदरिद्री आहे, याबद्दलच सुनावले. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचा असा पाणउतारा केला, म्हणून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे. अजून तरी राज ठाकरेंनी मोदींचा त्या मुद्द्यावरून समाचार घेतलेला नाही. ऊठसूट मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती याबद्दल गर्जना करणार्‍या दोन्ही सेना तशा मूग गिळून गप्पच बसल्या, असे म्हणावे लागेल. उद्धव ठाकरेंची टीका अगदीच शाकाहारी होती. राज ठाकरेंनी तर अमिताभ-मिलन सभेत मराठी अभिमान गुंडाळूनच ठेवला. नरेंद्र मोदींच्या पक्षातील बर्‍याच जणांना देशभरचा मांसाहार बंद करायचा आहे. मुंबईच्या काही भागात तसेच गुजरातमध्ये काही प्रदेशात त्यांनी ‘शाकाहारी हिंदू जिल्हे’ तयार करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपबरोबर आघाडी केल्यावर त्यांची भाषाही शाकाहारी व्हावी, हा मराठी बाण्याचा कणा वाकल्याचे चिन्ह आहे. परंतु शाकाहारी मोदींची भाषा मात्र विरोधकांवर टीका करताना ‘मांसाहारी’ असते! म्हणजे, शाकाहारी गुजराती व्यापारी महाराष्ट्राला तुच्छ लेखताना कसा मांसाहारी होऊ शकतो, हे मुंबईने रविवारी पाहिले. उद्धव आणि राज यांच्या मोदींसमोरील या बोटचेपेपणाने मराठी माणूस मात्र अस्वस्थ झाला आहे. बाळासाहेबांनी मोदींच्या या उन्मत्त भाषणाचा दुसर्‍याच दिवशी समाचार घेतला असता आणि उमेद असती तर शिवाजी पार्कवर मेळावा भरवून संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचे स्मरण दिले असते. सभेच्या ठिकाणी गुजराती व्यापारी शामियान्यात आणि सोफ्यावर; पण मराठी माणूस मात्र दुपारच्या टळटळत्या उन्हात. या अपमानित उपेक्षेलाही त्यांनी ‘मांसाहारी’ उत्तर दिले असते. मोदींच्या भाषणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून रेल्वे, बसेस, इनोव्हामधून आणलेली माणसे थकूनभागून परत आपापल्या गावी गेली, पण मोदीप्रणीत भाजपवर पूर्ण नाराज होऊन! एवढी विराट सभा पण तासाभरात मैदान रिकामे झाले. कारण माणसे जशी आणली तशीच परत नेली गेली. उत्स्फूर्तपणे कुणी आलेच नव्हते. मुंबईकर मराठी माणूस तर सभेत नव्हताच. भाजपच्या मुंबई विभागाने जमा केलेले आणि पार्ले-दादरमधील उच्चवर्णीय-मध्यवर्गीय लोक सभेत होते; पण बाळासाहेब ठाकरे वा पूर्वी कॉम्रेड डांगे वा आचार्य अत्रेंच्या सभेत येणारा सर्वसामान्य मराठी कामगार-कर्मचारी मात्र गर्दीत कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे गर्दी प्रचंड, पण महाराष्ट्राच्या राजधानीत येऊनही तो साधा मराठी सुसंस्कृत कष्टकरी मात्र कुठे दिसला नाही. त्यामुळेच मोदी आले आणि परत गेले. चौपाटीवरची वाळू जशी पुन्हा एका लाटेत समुद्रात विलीन होते, तशीच मोदींची सभा एका लाटेत विरून गेली- आणि तीही समुद्रात नव्हे तर वांद्र्याच्या बुजवलेल्या खाडीत. साहजिकच मुंबईच्या भाजप कार्यालयात चर्चा चालू आहे की, पन्नास कोटी रुपये खर्च करून मोदींची पालखी आली आणि गेली; पण साधले काय?