आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवतांची मंत्रशक्ती; ‘नमो’चा जागर (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदींचा झंझावात अखेर मुंबईच्या आखातात येऊन थडकला. आता तो अरबी समुद्रामध्ये विरून जातो की दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचतो, हे आणखी पाच महिन्यांनी स्पष्ट होईल. त्यांच्या मुंबईतील महाप्रचंड सभेमध्ये मराठी मुंबईकर जरी सामील झालेला दिसला नाही तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून रेल्वे आणि बसेस भरून जे मराठी लोक सभेला भाजपच्या आयोजकांनी आणले, त्यामुळे मराठी माणसे सभेमध्ये दिसली. नरेंद्र मोदींच्या महागर्जना ऐकायला मुंबईच्या 70 टक्के झोपडपट्ट्यांमधील माणसे नव्हती, परंतु गुजराती-मारवाडी-मराठी मध्यमवर्ग मात्र भक्तिभावाने हजर होता. व्यासपीठावरती एनडीएचे चेअरमन लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील नेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेचे नेते अरुण जेटली नव्हते आणि शिवसेना-मनसेला निमंत्रणच नसल्याने उद्धव वा राजही नव्हते. परंतु त्यांची अनुपस्थिती ही अपेक्षितच होती. कारण आता दोन संघ भाजपच्या प्रचाराचे आयोजन करतात. एक मोदी स्वयंसेवक संघ (एमएसएस) आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस). गेल्याच आठवड्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी लालकृष्ण अडवाणी यांना राजकीय जीवदान दिले होते, पण मोदी स्वयंसेवक संघाने त्याला मान्यता दिलेली नाही हे मुंबईतील सभेत दिसून आले. सरसंघचालकांच्याच (म्हणजे भागवतांच्याच) आदेशावरून अडवाणींना अंतर्धान केले गेले होते. परंतु पुनश्च मंत्रजागर करून अडवाणींना राजकीय रंगमंचावर प्रकट होण्याचे संकेत दिले गेले आहेत. भागवत यांनी असे शीर्षासनसदृश आयाम का केले असावे बरे? सतत मुद्दे शोधत असणार्‍या मीडियाला या भागवती शीर्षासनाने खाद्य पुरवले आहे. सत्यस्थितीपेक्षा अफवा, वास्तवापेक्षा कुजबुज आणि वादापेक्षा वितंड, हाच सध्या माध्यमांचा आधार झाला असल्यामुळे असे काही खाद्य मिळाले की मीडिया (विशेषत: न्यूज चॅनल्स) खुश असतात. परंतु मोहन भागवतांच्या या मंत्रजागराची आणि अडवाणींच्या राजकीय जीवदानाची बातमी झळकू लागता-लागताच देवयानी खोब्रागडेंच्या वादग्रस्त आणि सनसनाटी बातमीने वृत्तमाध्यमे व्यापली गेली. त्यापाठोपाठ नरेंद्र मोदींच्या मुंबईतील ‘महागर्जना’ महासभेच्या बातम्या ऊर्फ प्रचाराने टीव्हीचे पडदे व्यापले जात होते. भागवतांनी राजकीय जीवदान देऊनही मुंबईच्या ऐतिहासिक सभेच्या व्यासपीठावर येण्याचा ‘व्हिसा’ अडवाणींना मिळालेला नव्हता. त्याचप्रमाणे मोदींचे जीवश्च कंठश्च मराठी अनुयायी राज ठाकरे यांनाही निमंत्रण नव्हते. भाजपचा अधिकृत मित्रपक्ष शिवसेना आणि सेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनाही बोलावले गेले नाही. म्हणजेच ही महागर्जना फक्त मोदींचीच असणार, हे त्यांनीच (म्हणजे नरेंद्रभार्इंनीच) ठरवले होते. नाहीतरी मोदींच्या व्यासपीठावर भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि चार-दोन इतर पुढारी वगळता त्यांच्या फळीतील कुणीही अन्य कर्तबगार पुढारी दिसत नाहीत. भोपाळच्या सभेत अडवाणी प्रगटले होते; पण तिथे त्यांनी शिवराज चौहानांवरच आशीर्वादाचा हात ठेवला होता. बाकी सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंतसिंग, इतकेच काय; अरुण जेटली (अपवाद वगळून) दिसत नाहीत. कुणाला केव्हा अदृश्य करायचे आणि कुणाला केव्हा प्रकाशात आणायचे, हे फक्त मोदीच ठरवत आहेत. हे जेव्हा भागवत संप्रदायाने पाहिले, तेव्हा सरसंघचालक आपले मंत्रसामर्थ्य घेऊन मैदानात उतरले असावेत. भाजपतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या फळीतील बड्यांना आता अशी धास्ती वाटू लागली आहे की, मोदी इतर सगळ्यांनाच मोडीत काढणार! (बाळासाहेब ठाकरेंनी हे ओळखून नरेंद्रभाईंनाच 'Modi'त काढले होते. बाळासाहेब कधीही मोदींच्या व्यासपीठावर गेले नाहीत. असो.) मोहन भागवत यांच्या अडवाणींबद्दल वाटणार्‍या आकस्मिक सौहार्दाची ही पार्श्वभूमी आहे. परंतु इतरही काही नवे संदर्भ व निकष दिले जात आहेत. त्यापैकी एक आहे, भाजपला लोकसभेत किती जागा जिंकता येतील याबद्दलच्या शक्यतेचा वा अंदाजाचा. खुद्द मोदींनी तमाम ‘न्यू-सोशल मीडिया’वरून गर्जना केली आहे, (जिचा उल्लेख ते अशा महागर्जना सभांमध्ये करतात) की ‘नमों’च्या अचाट करिष्म्यामुळे, अजस्र प्रचार यंत्रणेमुळे आणि अफाट खर्चामुळे त्यांना 272हून अधिक जागा मिळतील आणि भाजप स्वत:च्या बळावर लोकसभेत बहुमत प्राप्त करील. मग मित्रपक्षांची गरजच उरणार नाही! कोण उद्धव, कोण राज, आणि कोण जयललिता? कदाचित म्हणूनच जयललितांनी असे सूचित केले आहे की, आता देशाचा पंतप्रधान तामिळ व्यक्तीच (म्हणजे अर्थातच जयललिता) होणार. मोदींना वाटते की जयललिता त्यांना पाठिंबा देतील. पण करुणानिधींनी अनपेक्षितपणे मोदींची इतकी प्रशंसा केली की जयललितांनी एकदम पवित्रा बदलला. लगेच द्रमुकनेही जाहीर केले की, द्रमुक-भाजप अशी आघाडी होईलच असे नाही. संघ परिवाराने स्वत:चे एक सर्वेक्षणही केले. त्या सर्वेक्षणानुसार भाजपची लोकसभेतील सदस्यसंख्या 175 च्या वर जात नाही. म्हणजे, जवळजवळ 100 जागा मिळणार त्या इतर मित्रपक्षांबरोबर तहाचे करार करून. परंतु अकाली आणि शिवसेना सोडून मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला कुणीच जाण्याची शक्यता नाही. (खुद्द शिवसेनाही मोदींबरोबर जाईल अशी मोदींनाच खात्री वाटत नाही. शिवाय ‘मराठी माणूस’ गुजराती माणसाच्या ‘अंकित’ दर्जात जायला तयार होणार नाही, अशी दोन्ही सेनांमधली भावना आहे.) म्हणजे, एनडीए ऊर्फ राष्ट्रीय लोकशाही आघाडी निर्माण करायची तर मित्रपक्ष लागणार. लालकृष्ण अडवाणी हे अजूनही एनडीएचे चेअरमन आहेत. युनायटेड जनता दलापासून ते बिजू जनता दलापर्यंत अनेकांनी भाजपला संकेत दिले आहेत की, अडवाणी जर पंतप्रधान झाले तर आपण त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजेच लोकसभेत 175 च्या आसपास जागा मिळाल्या आणि तरीही मोदी पंतप्रधान होत नाहीत असे चित्र निर्माण झाले; तर अडवाणींना पुढे करता येईल, अशी ती भागवती खेळी आहे. त्याचप्रमाणे संघातील काहींना अशीही धास्ती वाटते की, मोदी जर खरोखरच पंतप्रधान झाले - 225 जागा मिळवून - तर भाजपच्या नेत्यांबरोबर संघालाही विंगेत जावे लागेल. ती केविलवाणी अवस्था पक्षावर व संघावर येऊ नये, म्हणून अडवाणींची अंतर्धानावस्था दूर करण्याचा आदेश सरसंघचालकांनी दिला असावा! आता मोदींचा चमत्कार आणि भागवतांची मंत्रशक्ती यावरच आपल्याला विसंबावे लागणार, असे दिसते.