Home | Editorial | Agralekh | editorial on national science congress

अराजकाच्या धिंगाण्यातील वैज्ञानिक स्थितप्रज्ञता ! (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Jan 05, 2013, 03:39 AM IST

गेली दोन-तीन वर्षे अराजकवाद्यांच्या धिंगाण्यामुळे आपल्या देशाची प्रकृती जरा अशक्त झाली आहे. एकीकडे देशाला महासत्ता बनवण्याच्या गोष्टी चालल्या आहेत, तर दुसरीकडे व्यवस्था परिवर्तनाच्या नावाने असंसदीय असा गोंधळ सुरू आहे.

  • editorial on national science congress

    गेली दोन-तीन वर्षे अराजकवाद्यांच्या धिंगाण्यामुळे आपल्या देशाची प्रकृती जरा अशक्त झाली आहे. एकीकडे देशाला महासत्ता बनवण्याच्या गोष्टी चालल्या आहेत, तर दुसरीकडे व्यवस्था परिवर्तनाच्या नावाने असंसदीय असा गोंधळ सुरू आहे. अशा गोंधळलेल्या वातावरणात 21 व्या शतकाच्या मध्यापर्यंत देश कसा असावा, अशी भविष्यवेधी मांडणी कुठल्याच राजकीय पक्षाकडून केली जात नाही. जे व्यवस्था परिवर्तनाच्या बाता करतात, आंदोलने करतात, त्यांच्यासमोर नवा देश कसा उभा करायचा, याची वैचारिक मांडणीही नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मात्र कोलकाता येथे सुरू झालेल्या इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसच्या 100 व्या अधिवेशनात नव्या भारताची ब्लूप्रिंट मांडली आहे. भारताला प्रगतीची फळे चाखायची असतील तर अणुऊर्जा प्रकल्प, जेनेटिकली मॉडिफाइड पिके आणि अवकाश कार्यक्रम हाती घेतल्याशिवाय तरणोपाय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले व हेच घटक देशाच्या प्रगतीचे मापदंड ठरतील, असे सूतोवाचही केले. वास्तविक डॉ. मनमोहनसिंग यांची प्रतिमा अर्थतज्ज्ञ अशी असली तरी त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिकाचा, संशोधकाचा व जगाचे आकलन असणारा असा सर्वसमावेशक आहे. त्यांच्या दृष्टिकोनात 21 व्या शतकाच्या भारताच्या प्रगतीचे जसे स्वप्न आहे, तसे वास्तवाचे भान आहे. या भानातून त्यांनी भारताची प्रगती अणुऊर्जा, जेनेटिकली मॉडिफाइड पिके आणि अवकाश कार्यक्रम अशा त्रिसूत्रीच्या परिघात होऊ शकते, असे ठामपणे नमूद केले. भारताच्या प्रगतीला विज्ञानाचा हातभार या संकल्पनेवर केंद्रित असलेले इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसचे हे अधिवेशन सध्याच्या अनागोंदीच्या वातावरणात प्रतिगाम्यांसाठी आत्मपरीक्षण करणारे तर देशाच्या प्रगतीबद्दल आशादायी असलेल्यांसाठी पर्वणी ठरावे असे आहे. या देशात 65 टक्के समाज अजूनही ग्रामीण भागात राहत असताना व सामाजिक विषमतेचे प्रश्न दाहक होत असताना समाजाच्या तळागाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान रुजल्यास अनेक सामाजिक-आर्थिक समस्या सोडवता येतील, असे मत डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडले. त्यांच्या या मतात बदलत्या जगाचे संदर्भ आहेत तसेच पंडित नेहरू यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावदेखील आहे. पं. नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थितिशील भारतीय समाजात मंथन घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातूनच पुढे देशभरात आयआयटी, विविध विज्ञान संशोधन संस्था, अवकाश तंत्रज्ञान संस्था, अणुसंशोधन संस्था सुरू झाल्या. पं. नेहरूंच्या या दूरदृष्टीमुळे देशामध्ये वैज्ञानिकांची एक फळी निर्माण झाली व त्यामुळे देश प्रगतिपथावर चालत राहिला. पं. नेहरूंनी जशा वैज्ञानिक संस्था उभ्या केल्या, तसे इंदिरा गांधी यांनी हवामान, दूरसंचार क्षेत्रात विविध उपग्रहांच्या मालिका हाती घेतल्या; त्याचबरोबर महत्त्वाकांक्षी अशी अंटार्क्टिका मोहीम हाती घेऊन वैज्ञानिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. राजीव गांधी यांनी तर आयटी क्रांतीवर स्वार होऊन देशाच्या मध्यमवर्गाची जीवनशैली बदलून टाकली, त्याचबरोबर ग्रामीण भारतालाही या क्रांतीत सामील करून घेतले. हा सगळा नेहरू घराण्याचा महिमा नाही तर मानवी सिव्हिलायझेशनमध्ये तंत्रज्ञानाचे असलेले अस्तित्व याला त्यांनी योग्य वेळी दिलेला प्रतिसाद आहे. या तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा हात धरून पुढे डॉ. मनमोहनसिंग यांनी 90 च्या दशकात उदारीकरणाची दारे उघडी केली व भारताला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील करून घेतले. आज 2013 पर्यंतचा सुमारे 20 वर्षांचा प्रवास डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून जवळून अनुभवला आहे. त्यांना देशातील समस्यांमधील अंतर्विरोध माहीत आहेत. देशाचे प्रश्न मिटवणारी जादूची कांडी आपल्याकडे नाही, याचीही त्यांना जाणीव आहे. पण हा देश आमूलाग्र बदलू शकतो, तो आर्थिक महासत्ता होऊ शकतो, असा दुर्दम्य आशावाद त्यांच्याकडे आहे. या आशावादातूनच त्यांनी आपल्या भाषणात नेहरूंचे ऋण मानून नव्या भारताच्या प्रगतीची ब्लूप्रिंट मांडली. या ब्लूप्रिंटमधील मुद्द्यांवरील चर्चा श्रद्धा, भावना, संशय व भीती यांच्या चौकटीतून नव्हे; वैज्ञानिक दृष्टिकोन व वास्तवाचे भान ठेवून निखळपणे केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे गेली दोन वर्षे अणुऊर्जा प्रकल्पांवरून मोठ्या प्रमाणात वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन सुरू आहे. ऊर्जेची गरज ही केवळ पाणी अडवून, धरणे बांधून, नैसर्गिक संसाधनांचा वापर करून होणार नाही; तर अपारंपरिक ऊर्जास्रोतातून ही गरज भागवली जाऊ शकते व प्राप्त परिस्थितीत हाच या प्रश्नावरचा तोडगा ठरू शकतो. पण अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा एवढा आरडाओरड सुरू आहे की या आरडाओरड्यात परिस्थितीचे भान असणा-यांचा, समाजाचे भले करणा-यांचा आवाज पद्धतशीर दाबला जात आहे. देशापुढे अन्नाचाही प्रश्न आहे. या प्रश्नांचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे. जेनेटिकली मॉडिफाइड पिकांच्या माध्यमातून देशात दुसरी हरित क्रांती आणली जाऊ शकते व या प्रश्नावर मात केली जाऊ शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा अध्याय आहे. तो नसता तर आज मनुष्य अजूनही जंगलात कंदमुळे खाऊन शिकार करत राहिला असता. पण मानवाने शिकारीसाठी भाला तयार करून तंत्रज्ञानाला जन्म दिला व पुढे त्याची मजल जेनेटिक क्रांतीपर्यंत येऊन ठेपली. आज देशाच्या आर्थिक विकासात व्यवस्था परिवर्तन नव्हे तर तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे. तिस-या जगातील सर्वच देशांनी त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. 20 वे शतक हे आयटीचे होते, तर 21 व्या शतकाचा पूर्वार्ध जैविक तंत्रज्ञानाचा (जेनेटिक टेक्नॉलॉजी) होता. या शतकाचा मध्य हा जेनेटिक मॉडिफाइड पिकांचा आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रगतीचे केवळ स्वप्न दाखवलेले नाही, तर हे स्वप्न साकार होऊ शकते याचा मार्गही दाखवला आहे. नव्या भारताची मांडणी आक्रस्ताळेपणाने करणा-यांनी या मार्गाबाबत देशभर मंथन केल्यास देशाचाच त्यात फायदा आहे.

Trending