आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा मंडेला(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी व ते शाबूत राखण्यासाठी प्रत्यक्ष संघर्षभूमीवर ठामपणे पाय रोवून उभे राहिलेल्या नेल्सन मंडेला यांच्या निधनाने मानवमुक्तीच्या संघर्षपर्वातील एक पर्व संपले आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना श्वेतवर्णीयांकडून जी अमानुष वागणूक मिळत होती, त्यामुळे महात्मा गांधी अस्वस्थ झाले होते. ही वर्णविद्वेषी वृत्ती मुळापासून उखडून काढण्यासाठी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू केले. त्यातूनच सत्याग्रह या प्रभावी अस्त्राचा जन्म झाला. महात्मा गांधींनी भारतात ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे बीज दक्षिण आफ्रिकेतील ज्या वर्णविद्वेषविरोधी लढ्यातून रोवले गेले, त्याच देशात मंडेलांनी वर्णभेदाविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला, हा योगायोग नक्कीच नव्हता. स्वप्रगतीचा ढोल बडवणा-या अमेरिकेमध्येही कृष्णवर्णीयांना हीन दर्जानेच वागवण्यात येत होते. त्याविरोधात तेथे मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर उभे ठाकले. त्यांनी कृष्णवर्णीयांना नागरी हक्कमिळवून देण्यासाठी जो यशस्वी लढा दिला, त्यामागे गांधीजींच्याच कृतिशील विचारांची प्रेरणा होती.
1963 मध्ये वॉशिंग्टन येथे मार्टिन ल्यूथर किंग यांनी ‘आय हॅव ए ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण दिले. त्यातून प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वास संपादित केलेले एक व्यक्तिमत्त्व जागतिक पटलावर पुढे वलयांकित ठरले, ते म्हणजे नेल्सन मंडेला. महात्मा गांधी यांना आदर्श मानणा-या नेल्सन मंडेला यांना भारताविषयी ममत्व होते. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या अलिप्ततावादी धोरणाचेही ते खंदे समर्थक होते. कृष्णवर्णीयांना नागरी हक्क मिळवून देण्यासाठी गांधीजी, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला हे ज्या प्राणपणाने लढले, त्या त्यागातूनच निर्माण झालेल्या समानतेच्या उर्ज्ज्वस्वल भूमीवर भक्कमपणे पाय रोवून बराक ओबामा, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होऊ शकले. ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ या 1994 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात नेल्सन मंडेला यांनी हा सारा जीवनप्रवास नादमय शब्दांत रेखाटला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या समाजकारण तसेच राजकारणातील तपोनिधी असलेल्या मंडेला यांचे सारे जीवनच संघर्षमय होते. गौरवर्णीयांच्या वर्णविद्वेषी वृत्तीविरोधात नेल्सन मंडेला यांनी पुकारलेला लढा हा दक्षिण आफ्रिकेतील तत्कालीन सत्ताधा-यांच्या दृष्टीने राजद्रोहच होता. या गुन्ह्यासाठी मंडेला यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्यापायी तब्बल 27 वर्षे कारावास भोगल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकारने अखेर 1990 मध्ये मंडेला यांची मुक्तता केली.
एकेकाळी अमेरिका व ब्रिटनने मंडेलांची ‘दहशतवादी’ अशा शब्दांत संभावना केली होती. मात्र सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अनेक जागतिक परिमाणे बदलली व महासत्तांना उपरती झाली. मंडेलांच्या मुक्ततेनंतर वर्णविद्वेषाच्या विरोधातील लढ्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार पडला होता. परंतु सत्तेची सूत्रे हाती घेऊनच त्या देशातील कृष्णवर्णीयांना समतेचा न्याय अधिक उत्तम प्रकारे देता येणार होता. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस सर्वशक्तिनिशी दक्षिण आफ्रिकेतील पहिल्यावहिल्या निर्भय वातावरणातील सार्वत्रिक निवडणुकांच्या रिंगणात उतरली. निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून 1994 मध्ये नेल्सन मंडेला हे त्या देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले. आपल्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या हितरक्षणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. श्वेतवर्णीयांबद्दल मनात जराही आकस न ठेवता त्यांचे कृष्णवर्णीयांशी मनोमिलन घडवून दक्षिण आफ्रिकेला प्रगतिपथावर नेण्यासाठी मंडेला यांनी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र राष्ट्राध्यक्षपदाच्या दुस-या कारकीर्दीसाठी त्यांनी जराही प्रयत्न केले नाहीत. राष्ट्राध्यक्षपदाची झूल खाली ठेवताच एड्सविरोधातील जागृती मोहिमेची धुरा त्यांनी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. राजकारण ते समाजकारण असा अनेकांना खडतर वाटू शकेल असा प्रवास मंडेला यांनी सहजी केला. 1993 मध्ये नेल्सन मंडेला यांना जागतिक शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2004 सालापासून तर त्यांनी सार्वजनिक जीवनातून संपूर्ण निवृत्ती स्वीकारली होती.
समाजकारण, राजकारण ते क्रीडा जगत या सर्व क्षेत्रांमध्ये मनापासून रमणा-या नेल्सन मंडेला यांना त्यांची द्वितीय पत्नी विनी मंडेला यांच्यामुळे जसा भक्कम मानसिक आधार मिळाला होता, तसाच कालांतराने मनस्तापही भोगावा लागला. मंडेला यांनी राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर विनी मंडेला यांची कला, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान खात्याच्या मंत्रिपदी नियुक्ती केली होती. मात्र तेथील कारभारात भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाल्याने विनी यांना मंडेलांनी कठोरपणे मंत्रिपदावरून दूर केले. विसंवाद व मतभेदांची दरी अधिकच रुंदावल्याने नेल्सन यांनी विनी मंडेला यांना 1996 मध्ये घटस्फोट दिला, तरीही त्या देशाच्या संघर्षपर्वातील लढाऊ दांपत्य म्हणून या दोघांचेही स्थान अद्यापही तेथील कृष्णवर्णीय जनतेच्या मनात अढळ राहिले. नेल्सन मंडेला हे फक्त लोकहितासाठीच जगले. समानता हा त्यांचा धर्म होता. तो धर्म त्यांनी आयुष्यभर कसोशीने पाळला. तुरुंगवास, छळ आणि बहिष्कार या व्यक्तिगत आणि त्यांच्या समाजावरील अनंत अत्याचारांना न जुमानता 20व्या आणि 21 व्या शतकाला गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने जोडले. तो दुवा आता निखळला आहे...