आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त नेपाळ (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण अडीच वर्षांपूर्वी उत्तराखंड राज्यावर झालेली प्रलयंकारी ढगफुटी व शनिवारी नेपाळमध्ये झालेला जबरदस्त भूकंप या दोन ठळक दुर्घटना हिमालय रांगांमध्ये झालेल्या आहेत. हा काही योगायोग नाही. अशा नैसर्गिक आपत्ती या प्रदेशात येतच राहणार. कारण या प्रदेशातील पृथ्वीची संक्रमणावस्था अजून संपलेली नसल्याने हा प्रदेश मोठ्या क्षमतेच्या भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. पृथ्वीची वाटचाल अस्थैर्याकडून स्थैर्याकडे सुरू आहे. भूकंप होणे हे तिच्या स्थैर्याकडे चाललेल्या वाटचालीचा एक टप्पा आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, नेपाळला (हिमालय रांगा) ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षाही अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसू शकतो. कारण हा प्रदेशच भूगर्भ हालचालींच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. म्हणून मुख्य भूकंपानंतर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेपर्यंत वेगवेगळ्या तीव्रतेचे अनेक भूकंप धक्केही बसून गेलेले दिसून येतात.

या धक्क्यांची मूळ उत्पत्ती मुख्य भूकंप केंद्रातून होत असल्याने भूपृष्ठाखालची परिस्थिती अजून शांत झालेली नाही. भूगर्भशास्त्र असे सांगते की, पृथ्वीचे भूपृष्ठ घनतेच्या फरकामुळे भारतीय, युरेशियन, आफ्रिकन, अंटार्क्टिक, अमेरिका व पॅसिफिक अशा सहा प्रमुख व छोट्या तुकड्यां (प्लेट) मध्ये विभाजित झाले आहे. भारतीय तुकडा जमीन व सागर अशा दोन घटकांपासून बनलेला आहे व हा तुकडा युरेशियन तुकड्याला मागे रेटू पाहत आहे. या रेटण्याचा वेग प्रतिवर्ष सुमारे ४५ मिलिमीटर आहे. लाखो वर्षांपासून या रेटण्यामुळे हिमालय हा टप्प्याटप्याने घडीचा पर्वत झाला आहे व त्यातून जगाचे छप्पर समजले जाणारे तिबेटचे पठार निर्माण झाले आहे. भूतुकड्यांचे असे रेटणे अमेरिकेत सॅन अँड्ऱ्यूज भौगोलिक प्रदेशातही तितक्याच तीव्रतेने आढळून येत असल्याने ८० च्या दशकात लॉस एंजलिस शहराला बसलेला धक्का हा मोठाच होता. एकंदरीत पृथ्वीच्या जन्मापासून विविध पर्वतमालांच्या उत्पत्तीचा विचार करता भूपृष्ठाखाली चालणाऱ्या सततच्या हालचालींमुळे हिमालय पर्वताच्या रांगा सर्वात तरुण समजल्या जातात.

शनिवारी नेपाळला बसलेला भूकंप हे भारतीय व युरेशियन तुकड्यांमधील घर्षण होते. काठमांडू खोरे हे तसे भूकंपप्रवण क्षेत्रही समजले जाते. ८० वर्षांपूर्वी बिहार-नेपाळ भागात ८.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप तसेच १५ ऑगस्ट १९५० रोजी अरुणाचल प्रदेश-चीन सीमारेषेवर ८.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या दोन भूकंपांची तीव्रता पाहता शनिवारच्या भूकंपाचा धक्का थोडा कमी क्षमतेचा बसला आहे. शास्त्रज्ञांच्या मते या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली असली तरी या भूकंपातून बाहेर फेकली गेलेली ऊर्जा चार ते पाच टक्क्यांपेक्षा अधिक नाही. समजा ही ऊर्जा सात-आठ टक्क्यांवर पोहोचली असती तर संपूर्ण उत्तर भारत उद््ध्वस्त झाला असता, शेजारील देश पाकिस्तान-चीनलाही या धक्क्यांचा सामना करावा लागला असता. हिमालय पर्वतरांगांमध्ये ९ किंवा १० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार ९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला असता तर त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या ३०-४० भूकंप धक्क्यांएवढी झाली असती व त्याचा होणारा परिणाम आपण कल्पना करू शकत नाही इतका झाला असता.

शनिवारच्या भूकंपाचे धक्के आपल्याकडे १९ राज्यांना बसले. थोडक्यात, अरुणाचल प्रदेश ते हिंदुकुश पर्वत असा सुमारे अडीच-तीन हजार किमी अंतराचा प्रदेश हा भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने निसर्गाच्या अशा कोपाला कसे सामोरे जायचे, याचा विचार युद्धपातळीवर करण्याची वेळ आली आहे. भारताने एक मित्रराष्ट्र म्हणून नेपाळला ताबडतोब मदत देणे क्रमप्राप्त होते व तसे प्रयत्नही केंद्र सरकारने केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक वेगाने होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. या भूकंपाने नेपाळला उद््ध्वस्त केले आहेच व मृतांचा आकडा १० हजारांहून अधिक जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काठमांडू असो वा आसपासच्या भागातील मानवी वस्ती असो, ही प्रामुख्याने माती, विटांच्या घरातच राहणारी आहे.

नेपाळ हा देश गरीब असून पारंपरिक शेती व पर्यटनावर या देशाची अर्थव्यवस्था चालत असल्याने तेथे नैसर्गिक दुर्घटनांचा सामना करणारी अशी कोणतीही यंत्रणा विकसित झालेली नाही. त्यामुळे भारत, चीन व अन्य देशांकडून मिळणाऱ्या मदतनिधीवर, पुनर्वसन योजनांवर नेपाळला पुन्हा उभे राहावे लागेल. आपणही अशा आपत्तींपासून दूर नाही. कारण हिमालय रांगांच्या विस्तीर्ण प्रदेशात येणाऱ्या भारतातील लक्षावधी लोकसंख्या पक्क्या व भूकंपनिरोधक वस्त्यांमध्ये राहत नाही.मोठ्या भूकंपांनंतर साधारण दोन-तीन महिने छोटे-मोठे भूकंप होत असतात. त्यामुळे नेपाळलगतच्या भारतीय प्रदेशात भूकंपाचे धक्के बसू शकतात. ही भीती लक्षात घेऊन नियोजन आतापासून आखले पाहिजे. नेपाळवर आलेल्या अस्मानी संकटातून आपण धडा घेतला पाहिजे.