Home | Editorial | Agralekh | editorial on new year 2013

दोन शून्य एक तीन... (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Jan 01, 2013, 12:42 AM IST

हे नव्या वर्षा...! त्या त्या वर्षाला नाव ठेवण्याची रीत पाडली आहे आम्ही माणसांनी. आज दिनकराच्या आगमनाने तू नवे नाव घेऊन आला आहेस.

  • editorial on new year 2013

    हे नव्या वर्षा...! त्या त्या वर्षाला नाव ठेवण्याची रीत पाडली आहे आम्ही माणसांनी. आज दिनकराच्या आगमनाने तू नवे नाव घेऊन आला आहेस. 2013. दोन शून्य एक तीन. तुझे स्वागत असो. 2012 नंतरचे आणि 2014 पूर्वीचे एक वर्ष. या अनंत अवकाशात आणि काळात आपला साथीदार आहे का कोणी आणि जगण्याची काही वेगळी, चांगली रीत आहे का, याचा शोध घेताना तुला दिलेले एक नाव. आम्ही भोगत असलेला एकटेपणा आणि जगण्यातला गुंता संपण्याच्या प्रतीक्षेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, की तो टप्पा आता कुठे सुरू झाला आहे, हे आताच नाही सांगता येणार. आतापर्यंत म्हणजे अशी नावे द्यायला लागल्यापासून अशी अनेक वर्षे आली आणि गेली. मात्र त्याचा अजून म्हणावा तेवढा उलगडा झाला नाही. हे नव्या वर्षा, पण आम्ही नाही हार मानली. आम्ही नव्या दमाने अवकाश, काळ आणि जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहिलो. या प्रवासातला प्रत्येक टप्पा आम्हाला महत्त्वाचा वाटला, तसाच हा आजचा टप्पाही आम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणूनच हे नव्या वर्षा, तुझे आम्ही आंनदाने स्वागत करतो. आम्हाला परिपूर्ण माणसापर्यंत, त्याच्या अर्थपूर्ण जीवनापर्यंत पोहोचण्याची आणि हे ब्रह्मांड समजून घेण्याची आणखी एक संधी दिली आहेस तू! हे नव्या वर्षा, आजच नाही सांगता येणार की तुझ्यापुढील 365 दिवसांची सकाळ, संध्याकाळ आणि रात्र मागील अनंत सकाळ, संध्याकाळ आणि रात्रींशी कशी नाळ जोडणार आहे? किंवा भविष्यातील अनंत सकाळ, संध्याकाळ आणि रात्रींशी कसे नाते सांगणार आहे? पण इतिहासाला विसरून आणि भविष्यकाळाचा वेध न घेता माणसाला वर्तमानात अर्थपूर्ण जगता येत नाही, हे आम्हाला पटले आहे. जीवन कसे जगावे याविषयीचे तत्त्वज्ञान मांडणारी मंडळी माणसांना वर्तमानात जगण्याचा सल्ला देतात. निखळ माणसाचे आयुष्य जगायला सांगतात. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा, नाहीतर भूत-वर्तमानाची भुतावळ आमच्या मानगुटीवर बसते आणि वर्तमानच जगण्याचे विसरून जातो आम्ही. एक मात्र कबूल केले पाहिजे, आजच्या वर्तमानात विकास, समृद्धी, प्रगती, आधुनिक आणि अत्याधुनिक अशा वजनदार शब्दांची भर घालूनही त्याविषयी आमचे एकमत होऊ शकलेले नाही. माफ कर, पण हेही समजून घे, की आम्ही प्रत्येक पळभर त्यासाठी लढतो आहोत. शाश्वत आणि सर्वांना आनंद, समाधान देणारी सकाळ, संध्याकाळ आणि रात्र शोधतो आहोत. म्हणजे ती आम्हालाच निर्माण करायची आहे, याची स्वत:लाच जाणीव करून देत आहोत. शाश्वत आणि सर्वांना आनंद देणारे असे काही निर्माण करणे, उभारणे एवढे सोपे नाही महाराजा. अंतराळाचे आपण नंतर पाहू. केवळ या पृथ्वीचा विचार करू. या पृथ्वीतलावरील माणसाच्या अन्न, पाणी, शरीर आणि मनाच्या भुका आहेत आणि काही केल्या त्या भागत नाहीत. हजारो वर्षांत किती उभारणी झाली आणि अजून किती राहिली, हे सांगता येणार नाही; मात्र भुका काही संपत नाहीत. कधी समुद्रलाटा, कधी वादळवारे, कधी हलणारे भूमंडल, कधी आमच्याच भुकांमुळे पसरलेली रोगराई, कधी आकाश फाटावे असा वर्षाव तर कधी भट्टी तापल्याचा अनुभव. निसर्गाला वाटते तेव्हा तो आमची परीक्षा घेतो आणि त्याच्याविषयी आमची काही तक्रार असण्याचे कारणच नाही. आम्ही असे मानतो की तो आम्हाला सुधारण्याची एक संधीच देत असतो. पण आमच्यातल्या संघर्षातून होणारी पीछेहाट कोणाला सांगायची? होत्याचे नव्हते झालेले आणि अन्न, पाणी, शरीर आणि मनाचे आक्रोश तुझ्या भावंडांनी पाहिले आहेत. अनुभवांती आम्हीच तयार केलेल्या शब्दांचेच अर्थ बदलून गेले, इतका आक्रोश, लाचारी आणि मुजोरी भूतकाळाने पाहिली आहे आणि आज वर्तमानातही पाहावी लागते आहे. सत्तासंपत्तीची मुजोरी आता या थराला गेली आहे की ती आपलाच घात करते आहे, याचेही भान आम्हाला राहिलेले नाही. नाही म्हणायला पुन:पुन्हा एक भावना प्रबळ होते की भूतकाळात आपले काहीतरी चुकले आहे आणि त्यात काहीतरी दुरुस्ती करायलाच हवी. असा विचार वर्तमानात प्रबळ होतो आणि भविष्यात मात्र असे काही होणार नाही, अशा आणाभाका आम्ही घ्यायला लागतो. अधिवेशने, परिषदा होतात. लाखोंनी माणसे एकत्र येतात. नवे चांगले काही सापडल्याचा जयजयकार होतो आणि मान शरमेने खाली घालावी, असेही बरेच काही घडते आहे. मग तूच येतोस आमच्या मदतीला. सांगतोस की एक वर्ष सरले आणि दुसरे वर्ष सुरू झाले आहे. मग आम्ही पुन्हा खडबडून जागे होतो. अरे, आणखी एक वर्ष संपले आणि आपला स्वशोधाचा प्रवास तर अजूनही संपला नाही. आपण त्या प्रवासाला खरोखरच निघालोय ना, याची पुन्हा चाचपणी करतो आणि मग लक्षात येते की केवळ संकल्प केल्याने भागणार नाही. स्वत:ला पुन:पुन्हा तपासात राहावे लागेल. वर्ष, महिने, आठवडे आणि दिवस... सगळेच महत्त्वाचे वाटायला लागतात. आम्ही पुन्हा कामाला लागतो. काळाचे हे चक्र समजून घेण्याचा आणि जगण्याला अर्थ मिळवून देण्याचा हा प्रवास पुन्हा सुरू होतो. हे नव्या वर्षा, आतापर्यंत तुझी भावंडे उभी राहिली तसाच तू आज अचानक उभा राहिला आहेस. आणि माणसाच्या जगाला आठवण करून देतो आहेस की आणखी एक संपले तसेच आणखी एक सुरूही झाले आहे. आता तरी स्वत:ला ओळखा. माणसाच्या जन्मात निसर्गाने जे झुकते माप टाकले आहे, ते आता तरी ओळखा. अन्न, पाणी, शरीराच्या भुकांच्या पलीकडे जाऊनच माणसाला हा प्रवास करायचा आहे. हे, दोन शून्य एक तीन... आम्ही तुझ्या साक्षीने पुन्हा संकल्प करतो की स्वशोधाचा हा प्रवास आम्ही अर्ध्यावर टाकणार नाही.

Trending