आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे स्मार्ट वर्ष (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013ला निरोप देऊन 2014च्या स्वागताला आता जग सज्ज होत आहे. मागील वर्ष हे भारतीय राजकारणासाठी अत्यंत संस्मरणीय वर्ष ठरले. प्रामाणिकपणे राजकारण करता येणे शक्य आहे, अशी घोषणा देत दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने काँग्रेसची तेथील सत्ता ‘झाडू’ने साफ केली. मोदींच्या तथाकथित लाटेवर स्वार होऊन तीन राज्यांत जरी भाजप सरकार आले, तरी दिल्लीत मात्र फुललेल्या कमळाऐवजी आम आदमीने टोकदार झाडूलाच पसंती दिली. ‘आप’ आणि भाजपच्या टकरीत आम आदमीचा नारा देणा-या काँग्रेसला आम आदमीनेच हात द्यायचे नाकारले.
विधानसभेच्या निवडणुका या येत्या जूनमध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकांची सेमीफायनल असल्याचा गवगवा करण्यात आला होता. तो जर खरा मानला तर येती फायनल ही काँग्रेससाठी अवघड ठरणार आहे. कदाचित त्यामुळेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपले मौन सोडायची हीच योग्य वेळ आहे, असे वाटले असावे. कारण 3 जानेवारीला ते एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याची घोषणा तर ते करणार नाहीत ना, अशी जोरदार चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. कारण 17 जानेवारीला काँग्रेस पक्षातर्फे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या या पटलावर सध्या तरी राहुल गांधींसोबत मोदी आणि केजरीवाल यांच्यावरच सा-यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकांच्या क्षितिजावर या तीन नक्षत्रांपैकी कोणाचे चांदणे फुलणार आहे, ते मतदारांच्या मतावर अवलंबून असेल. ही निवडणूक महत्त्वाची यासाठी; की प्रथमच भारतीय राजकारणात मतदारांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या क्षोभाला वाट मोकळी करून दिली. विधानसभा निवडणुकांच्या आधी ‘आप’ने सोशल मीडियाच्या मदतीने देशात व परदेशातही आपल्या पक्षासाठी पाठिंबा मिळवला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनेही याच सोशल मीडियाचा उपयोग करत मोठी मुसंडी मारली. मोदी यांच्या ऑनलाइन सभा, मतदारांशी थेट संपर्क याचा मोठा प्रभाव पडला, हे नाकारण्यात अर्थ नाही. ‘सिटिझन अ‍ॅक्टिव्हिझम’ ही संकल्पना या निवडणुकांच्या आधी व दरम्यान प्रत्यक्षात उतरल्याचे आपण पाहिले आहे. पण या हायटेक प्रचारात काँग्रेस पक्ष मात्र मागे पडला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर तोंडसुख घेत त्याची टिंगलटवाळी केली होती. आता मात्र त्यांना उपरती झाल्याचे चित्र दिसत आहे. विरोधाभास हा की ज्या राजीव गांधींनी भारतात तंत्रज्ञानाची क्रांती रुजवण्यात पुढाकार घेतला, त्यांचाच पक्ष आणि मुलगा मात्र तंत्रज्ञानाची शक्ती ओळखण्यास कमी पडले.
नवीन वर्ष आत्तापासूनच तंत्रज्ञानाचे वर्ष राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. 2013 हे स्मार्टफोनचे वर्ष होते, तर 2014 हे स्मार्टवॉचचे वर्ष ठरणार आहे. स्मार्टफोनच्या सोबतीला स्मार्टवॉच आल्याने संगणकावर काम करण्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. आता ई-मेल्स, एसएमएस, कॉल्ससाठी दरवेळी फोन बघण्याची गरज भासणार नाही. तुमच्या हातावरील स्मार्टवॉच आता या सा-यांचे संकेत देणार आहे. गेल्या वर्षी स्मार्टफोन्सनी तब्बल साठ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय केला होता. या वर्षी स्मार्टवॉचेसही इतकाच व्यवसाय करण्याची शक्यता आहे. याशिवाय आरोग्य, शिक्षण, रोजचे चलनवलन, कामांतील वेळेची बचत आणि वाढीव कार्यक्षमता या सर्वांसाठी अनेक अत्याधुनिक गॅजेट्स येऊ घातली आहेत. या सर्वांमध्ये लोकेशन बेस्ड सेन्सर्सचा वापर करण्यात येणार आहे, जे तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करतील.
तंत्रज्ञानाच्या या लाटेतून आता कोणीही अस्पर्श असणार नाहीत. दुर्दैवाने जगभरातील दहशतवादीही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्यासोबत लढणे आता अधिकाधिक कठीण होत असल्याचे दिसून येत आहे. अशात अफगाणिस्तानातून अमेरिका सैन्य मागे घेणार आहे. 2001 मध्ये अफगाणिस्तानातील युद्ध सुरू झाल्यापासून 2,300 अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेत अतिशय वादग्रस्त ठरले. सोशल मीडियावासी आणि तंत्रज्ञानप्रेमी अमेरिकन नागरिकांच्या रोषामुळे ओबामांना हा सैन्य माघारीचा निर्णय घ्यावा लागत आहे, हेही एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे तिथे निर्माण होणारी परिस्थिती सांभाळण्याची ताकद सध्याच्या करझाई सरकारमध्ये आहे की नाही, यावर भारतीय उपखंडातील शांतता मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहील. अल कायदा आणि तालिबानसारख्या कट्टर परंपरावादी परंतु हायटेक दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सा-या घटना वरवर पाहता परस्परविरोधी दिसत असल्या तरी त्या एकमेकांशी निगडित आहेत आणि तंत्रज्ञान हा यातील समान धागा आहे.
भारत आता जगातील तिस-या क्रमांकाचा इंटरनेट वापरणारा देश बनला आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे लोकांमधील कनेक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. खरा भारत आता खेडेगावांत राहतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण आता या खेड्यांचेच ‘इंडियनायझेशन’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आपली पसंती स्पष्ट केली आहे. दिल्लीतील सत्तापरिवर्तनात तर सोशल मीडियाचा थेट संबंध होता. त्यामुळे येत्या वर्षांत तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा मूलभूत घटक होणार आहे. आपल्या मनातील भावना सत्ताधा-यांना सांगायच्या असो वा दहशतवादाचा मुकाबला करायचा असो, तंत्रज्ञानाच्या सक्रिय आणि सकारात्मक उपयोगाने या गोष्टी अधिक सुकर होणार आहेत. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या तद्दन व्यावसायिक चित्रपटातील एक डायलॉग आहे- ‘डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ द कॉमन मॅन!’ आम आदमी पक्षाने आम आदमीची ही ताकद वेळेवर ओळखली आणि त्याचा फायदाही त्यांना झाला. आम आदमीनेही आपली ही पॉवर ओळखली आणि मतांच्या माध्यमातून आपल्याला हवा तो बदल घडवून आणण्यासाठी तिने विक्रमी प्रमाणात मतदान केले. निवडणुका असो, दहशतवादाशी लढाई असो की व्यक्तिगत आयुष्य अधिक सुखमय करणे असो, या सा-यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘जादुई दिवा’ आपल्या मदतीला असणार आहे. याच्या प्रकाशात आम आदमीचे जगणे खास होवो, अशा सदिच्छेसह सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!