आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे बिहारी वळण (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार स्थापन होईपर्यंत अनेक राजकीय विश्लेषकांना जनता दल (सं.) व राजदमध्ये महत्त्वाच्या खात्यांवरून संघर्ष उडेल, असे वाटत होते. काहींनी राजदला मिळालेला अनपेक्षित विजय उन्मादात परावर्तित होईल, असे अंदाज बांधले होते. पण तसा कोणताही उन्माद विजयानंतर झालेला नाही हे महत्त्वाचे. बिहार बदलल्याचे हे निदर्शक आहे. बिहारचे विकास मॉडेल आता समजून घेण्याची गरज आहे. नितीशकुमार यांनी आपल्या विजयाचा व्यापक अर्थ शपथविधी कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित केला आहे. त्यांनी बिगर भाजप नेत्यांना आवर्जून बोलावल्याने देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता भाजपविरोधात सरकू लागला आहे. बिहारची निवडणूक ही मोदींसाठी महत्त्वाची होती व या निवडणुकांचा कौल कोणाच्याही बाजूने लागला असता तरी त्याचा अन्वयार्थ मोदींचा जय किंवा पराजय असाच घेतला गेला असता. भाजपने मुसंडी मारली असती तर मोदींची लोकप्रियता कळसाला पोहोचली असती. मोदींचे मौनही ब्रह्मवाक्य समजले गेले असते. बिहारमधील निवडणूक लालूप्रसाद यादव यांच्यासाठीही कसोटी होती. जातीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यापासून जागावाटपापर्यंत लालूंनी नितीशकुमार व राहुल गांधी यांच्याशी जुळवून घेतले. स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवत त्यांनी ठिकठिकाणच्या प्रचारात मोदी व संघ परिवार यांच्या राजकारणावर तोफ डागली. त्यामुळे राजदला जे अनपेक्षित व घवघवीत यश मिळाले त्याने हुरळून न जाता लालूंनी आपली संघ परिवाराविरोधातील लढाई देशव्यापी करणार असल्याचे जाहीर केले. देशात सर्वच राज्यांत ते दौरे काढणार आहेत. त्याचबरोबर बिहारच्या राजकारणात संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्याचा चाणाक्षपणाही लालूंनी दाखवला आहे.
सोशल मीडियात लालूंच्या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक पात्रतेवरून व त्यांच्या राजकीय अननुभवावरून बऱ्याच चर्चा झडत असल्या तरी प्रत्यक्ष सरकारचे काम सुरू झाल्यानंतर या नेत्यांचे मूल्यमापन करणे उचित ठरणार आहे. शैक्षणिक पदव्या किंवा वकूब व राजकारणातले चातुर्य यांचा तसा अर्थाअर्थी संबंध नसतो. राजकारणाच्या चौकटीच इतक्या अमर्याद, विशाल व व्यापक असतात की जनता कोणत्या मुद्द्यावरून नेत्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेईल किंवा त्याला जमिनीवर आणून आपटेल याचा अंदाज आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.
नेत्याच्या नैतिक वर्तनापासून त्याच्या संपत्तीपर्यंत, घराणेशाहीपासून शैक्षणिक पात्रतेपर्यंत कोणत्याच बाबतीत जनतेचे समज ठाम नसतात. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने समाजाची नेत्याविषयीची धारणा बदलत असते. लालूप्रसाद यादव हे असेच नेते आहेत, ज्यांच्याबद्दलच्या धारणा नेहमीच लंबकासारख्या हेलकावत होत्या. एक काळ असा होता की लालूंच्या गावरान शैलीवर मीडिया फिदा होता. त्या टीआरपीवर लालू नेहमी चर्चेत असायचे. त्यांची यूपीए-१ सरकारमधील रेल्वेमंत्रिपदाची कारकीर्दही नेहमी चर्चेत असे. हार्वर्डने वाखाणलेले लालूंचे रेल्वे मॉडेल मीडियानेच उचलून धरले होते. पण यूपीए-२ च्या कारकीर्दीत लालूंच्या पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्याने लालूंचे दिल्लीतील राजकीय महत्त्व एकाएकी लयास गेले. पुढे तर चारा घोटाळा प्रकरणात तुरुंगाची हवाही त्यांना खावी लागली होती. पण लालूंचा मीडियाशी असलेला दोस्ताना तुटला नव्हता. त्यांना गेल्या काही वर्षांतली इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाची ताकद लक्षात आली आहे. आपल्या बाजूने मीडिया नसतो याचे भान लालूंना पूर्वीही होते व बिहार निवडणुकीत जुन्या जंगलराजच्या कहाण्या पुन्हा पुनरुज्जीवित
झाल्याने लालूंचे कमबॅक किती यशस्वी होईल याबाबत साशंकता होती. पण बिहारच्या जनतेने नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला जवळ करत लालूंनाही घवघवीत यश मिळवून दिले. बिहारच्या जनतेने दाखवलेले हे औदार्य निश्चितच लालूंच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी तयार झालेली नैतिक चौकट आहे. कारण त्यांच्या दोन्ही मुलांच्या कारभारावर, त्यांच्या राजकीय कामगिरीवर आता मीडियापासून सर्वांचीच करडी नजर आहे. बिहारमधील उपमुख्यमंत्री व एक कॅबिनेट खाते लालूंच्या मुलांकडे आहे. लालूंच्या राजद पक्षाचा बिहारमधील चेहरा आता पुढे ही मुलेच असतील. नितीशकुमारांनी आपल्या नऊ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बिहारमध्ये सामाजिक सौहार्द टिकवण्याबरोबर देशातील सर्वाधिक आर्थिक विकास दर राखणारे राज्य असा मान पटकावला. त्याचीच दखल घेत जनतेने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवले. २०१४ च्या निवडणुकीत गुजरात मॉडेलची चर्चा झाली होती. आता २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बिहार मॉडेलची चर्चा व्हावी अशी कामगिरी नितीशकुमार व लालूप्रसाद यांच्या संयुक्त सरकारला करून दाखवावी लागेल. तसे घडावे अशी या दोन्ही नेत्यांची धारणा आजच्या घडीला तरी दिसत आहे.