आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करचे ‘मूक’नायक

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चित्रपटसृष्टीचे, विशेषत: बॉलीवूडचे दिवास्वप्न होऊन बसलेल्या ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडता झाला. तसे पाहता यंदाच्या ऑस्करमध्ये कोणता चित्रपट आणि कलावंत बाजी मारणार हे ब-यापैकी अपेक्षित होते, तरीही अंतिम घोषणांची उत्कंठा जपत जगभरातील प्रेक्षकांना या सोहळ्याने वेड लावले. एका अर्थाने अलौकिक प्रतिभेच्या, सर्जनशीलतेचा परमोच्च बिंदू गाठणा-या देशोदेशीच्या कलावंतांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा याही वेळी ऑस्कर निवड समितीने कटाक्षाने जपली. म्हणजेच तुम्ही ऑस्कर मिळवण्याची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्हाला दि आर्टिस्ट, ह्यूगो, डिसेंडंट, द सेपरेशन, रँगो आणि महिला अत्याचारांसारख्या संवेदनशील विषयावरील ‘सेव्हिंग फेस’सारख्या केवळ तांत्रिकदृष्ट्याच दर्जेदार नव्हे, तर आशय-विषय आणि मांडणीत गर्भश्रीमंत असलेल्या कलाकृती निर्माण कराव्या लागतील आणि मेरिल स्ट्रिप, जॉन दुजाँदेन,ऑक्टिव्हिया स्पेन्सर यांच्या उंचीचा अभिनय करावा लागेल, असा संदेश पुन्हा एकदा यंदाच्याऑस्कर सोहळ्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील इच्छुक कलावंतांना दिला. एरवी आपली प्रकृती भपक्याला भुलण्याची आणि विषयबाह्य घटकांचे उथळपणे रसग्रहण करण्याची असल्याने यंदासुद्धा उद्योगपती अनिल अंबानी सोहळ्यात दिसले म्हणून अनेकांना विनाकारण हर्षवायू झाला. परंतु ज्या चित्रपटांनाऑस्कर सन्मानाने नावाजले गेले आहे ते नेमके कशामुळे,ऑस्करप्राप्त चित्रपटांचे वेगळेपण आणि खासियत काय हे जाणून घेण्यात आपल्याला (पक्षी : बॉलीवूड) एरवी फारसा रस नसतो. या वर्षी ज्या ‘दि आर्टिस्ट’ नावाच्या चित्रपटाला तीनऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, त्यात तंत्र आणि सर्जनशीलतेबरोबरच वैचारिक संकल्पनाधिष्ठित धाडसाचा वाटा निश्चितच मोठा आहे. अर्थपूर्ण संवाद हा कोणत्याही दर्जेदार चित्रपटांचा प्राण मानला जावा, अशा काळात ब्लॅक अँड व्हाइट मूकपटाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सूत्रबद्ध निर्मितीचा निर्णय घ्यायचा, या ‘आऊटऑफ बॉक्स’ विचाराला कृतीचीही जोड द्यायची आणि ते करताना आशय-विषयाच्या व्याप्ती आणि खोलीचेही भान सुटू द्यायचे नाही, हेच मोठे धाडस होते, जे ‘दि आर्टिस्ट’च्या निर्मात्यांनी केले. आपल्याकडे अथपासून इतिपर्यंत चित्रपटनिर्मिती हा एक ‘जुगार’असतो. कारण आपल्याला नेमके काय साधायचे आहे आणि कसे साधायचे आहे हेच मुळात बहुतांश वेळा सुस्पष्ट नसते. दिग्दर्शक, नट-नट्या आणि इतर कलावंत यांची निवड पटकथेच्या मागणीनुसार नव्हे, तर प्रभावी नट-नटी वा निर्माता-दिग्दर्शकाच्या मर्जीनुसार ठरते, असो. तर मुद्दा हा की, मूकपट ते बोलपटाच्या स्थित्यंतराच्या काळात आघाडीच्या नटाच्या आयुष्यातील आंदोलने टिपणारा ‘दि आर्टिस्ट’सारखा चित्रपट ही गुणवान कलावंतांनी एकत्र येऊन केलेली एक सूत्रबद्ध निर्मिती होती आणि त्याचे फळ तिला तीनऑस्कर मिळाल्याने प्राप्त झाले. उद्या कदाचित या चित्रपटापासून ‘ प्रेरणा’ घेऊन बॉलीवूडमधल्या कुणाला मूकपट बनवण्याची हुक्की येईलही; पण समजा असे धाडस भारतीय आशय-विषय घेऊन कुणी यापूर्वी केले ( ऐंशीच्या दशकात कमल हासन अभिनीत ‘पुष्पक’ नावाचा मूकपट आला होता, पण त्याचे श्रेय दाक्षिणात्य निर्मात्याचे होते) असते, तर निर्माता मंडळींनी त्याला धक्के मारून हाकलून लावले असते. यंदा ‘दि आर्टिस्ट’नेऑस्करचे ‘मूक’नायक म्हणून मिळवलेले यश लक्षणीय आहे. असगर सरहदी या इराणी दिग्दर्शकाच्या ‘द सेपरेशन’लाऑस्कर समितीने दिलेला बेस्ट फॉरेन फिल्मचा पुरस्कारही तितकाच कौतुकास्पद नि धाडसी म्हणायला हवा. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका-इराण यांच्यात अणुप्रकल्पावरून वाढलेला तणाव सध्या शिगेला पोहोचलेला आहे. किंबहुना अमेरिका आणि इस्रायल ही दोन कुरापती मित्रराष्टेÑ इराणला नामोहरम करण्याच्या अनेक विघातक खेळी खेळताहेत. परंतु या संघर्षाचे पडसादऑस्कर समितीच्या निर्णयावर उमटलेले नाहीत किंवा ‘व्हाइट हाऊस’मधूनऑस्कर समितीला फोनही गेलेला नाही वा कुणा इराणविरोधी गटाने निदर्शनांचे नाटकही वठवलेले नाही. कलेबाहेरच्या क्षेत्रात अमेरिकेचे जगाशी कसेही संबंध असले तरीहीऑस्करने आपला आब आणि धाकही सोडलेला नाही, हेच या घटनेतून दिसून आले. आता असे जबरदस्त वलय असलेल्याऑस्करच्या स्पर्धेत उतरण्यासाठी स्पर्धकही तितकाच तोलामोलाचा हवा, परंतु याचे भान येड्यांची जत्रा, दबंग,सिंघम यांसारखे तद्दन पैसावसूल चित्रपट देणा-या मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत अभावानेच आढळते. म्हणूनच ‘लगान’ आणि ‘श्वास’ या दोन अत्यंत दुर्मीळ घटना होत्या, याचा विसर पडूनऑस्कर मिळण्याच्या अतिरंजित अपेक्षेभोवती परिसंवाद-चर्चासत्र असले कार्यक्रम सातत्याने होत राहतात. रहमानलाऑस्कर मिळाले, मग आपल्याला का नाही, असले तारे तोडले जातात. हिंदी सिनेमा ग्लोबल झाला असे म्हणण्याची तर अलीकडच्या काळात फॅशनच आलेली आहे. पण ग्लोबल झाला म्हणजे काय, त्याची प्रकृती बदलली का, तो आशय-विषय आणि मांडणीच्या बाबतीत हॉलीवूडच्या वरचढ झाला का, आदी प्रश्न बॉलीवूÞÞडला पडतच नसावेत, अशी एकूण गेल्या काही वर्षांतली परिस्थिती आहे. हिंदी सिनेमा ग्लोबल झाला हे एका अर्थी बरोबरच आहे, पण तो जगातल्या भारतीयांपर्यंत पोहोचला इतकेच. जागतिक चित्रपटांवर प्रभाव असलेल्या पाश्चात्त्य अभिजनांपर्यंत नव्हे. अर्थात एकदा भान सुटले की भ्रम व्हायला लागतात आणि त्या भ्रमाच्या प्रभावाखाली वर्तनही भरकटत जाते. मग भारतीय ज्युरींचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत समावेश झाला म्हणून कौतुक सोहळे होतात आणि हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये दोन-पाच मिनिटांच्या फुटकळ भूमिका साकारून जणू आपण आता हॉलीवूड जिंकणार, पर्यायानेऑस्करच मिळवणार, असा देखावा निर्माण केला जातो. पण सर्जनशील संकल्पनांचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागेल, तेव्हाच ख-या अर्थाने डॅनी बॉएलसारख्या पाश्चात्त्य कलावंतांच्या आधाराशिवायऑस्करला गवसणी घालण्याचे बॉलीवूडचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. तोवर आपण आपल्या कुवतीला जागूनऑस्कर सोहळा तेवढा डोळे भरून पाहावा आणि तोंडभरून त्याची स्तुतीसुद्धा करावी!